स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

0

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता शासन मदतीसाठी धावले आहे. अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते. शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2017 असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.

 

शेतकरी जनता अपघात विमा योजना

या योजनेचा लाभ सात-बारावरील नोंदीप्रमाणे 10 ते 75 वर्षे वयोगटातील राज्यातील एक कोटी 37 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेची मुदत 30 नोव्हेंबर 2015 रोजी समाप्त होत असल्याने ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन लाख रूपयांच्या विमा संरक्षणासाठी 27 कोटी 24 लाख 93 हजार रूपयांचा विमा हप्ता भरण्यात येणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना विहित कागदपत्रांशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.

योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या 24 तासासाठी ही योजना लागू राहणार असून शेतकऱ्यांना केव्हाही अपघात किंवा अपंगत्व आले तरीही या योजनेचा लाभ मिळणार आहे. विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या जीवित हानीसाठी दोन लाख रूपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्याकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. सर्व खातेदार शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासनाद्वारे भरण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध असणार नाही.

या योजनेचे लाभ स्वतंत्ररित्या मिळणार आहेत.

 

लाभ कधी मिळेल

मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची पत्नी, शेतकरी स्त्रीचा पती, अविवाहित मुलगी, आई, मुले, नातवंडे, विवाहित मुलगी या योजनेचे लाभ घेण्यासाठी वारसदार ठरणार आहेत. विम्याचा दावा प्राप्त करण्यासाठी अपघातग्रस्ताच्या नावाचा समावेश असलेला सात-बारा, फेरफार नोंद, वारसाची नोंद, अपघाताच्या स्वरुपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे यांची आवश्यकता आहे.

विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.

 

लाभ कधी मिळणार नाही

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.

 

अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.