भांडारात किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भांडार हे शास्त्रीय दृष्ट्या विचार करून बांधावे. सुधारित पद्धतीनुसार बांधलेल्या भांडारात साठविलेल्या बियांची अंकुरणक्षमता व जोम अधिक काळापर्यंत टिकून राहू शकतो.
1. हापूर कोठी : हापूर कोठी ही वर्तुळाकार आकाराची, पत्र्यापासून बनवली जाते. या कोठीमध्ये 2 ते 10 क्विंटलपर्यंत बियाण्याची साठवणूक होऊ शकते.
2. बांबूपासून तयार केलेली कोठी/कणगी : ही कणगी बांबूच्या चटयांपासून तयार केली जाते. बियाणे सुरक्षित राहावे म्हणून आतील बाजूस पॉलिथीनच्या कागदाचे अस्तर लावले जाते. कमी कालावधीसाठी व थोड्या प्रमाणात बियाणे साठवणुकीसाठी या कणगीचा उपयोग होतो.
3. मातीपासून तयार केलेली कोठी : या कोठीचा उपयोग बियाणे जास्त प्रमाणात (5 ते 10 क्विंटल) धान्य साठवण्यासाठी होतो. ही कोठी चिकणमाती, भाताचा पेंढा आणि गायीचे शेण 3:3:1 या प्रमाणात घेऊन बनवली जाते व नंतर ती भाजली जाते.
4. भाजलेले मडके किंवा कोठार : बियाणे कमी प्रमाणात व थोड्या कालावधीसाठी साठवायचे असल्यास या कोठाराचा उपयोग होतो.
5. पत्र्याची कोठी : लोखंडी किंवा अॅल्युमिनीअमच्या पत्र्यापासून ही कोठी तयार केली जाते. बियाणे सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी साठवायचे असल्यास या कोठीचा उपयोग होतो. पूर्वी ज्वालाग्रही पदार्थ साठवण्यासाठी पत्र्याचा टाकीचा उपयोग झाल्यानंतर रिकाम्या टाकीत बियाणे साठवले जात असत.
6. पेव : जमिनीत किंवा तळघरात पेवातून मोकळ्या, बियाण्याची एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी साठवणूक करता येते. परंतु तळघर किंवा पेवामध्ये जमिनीवरील पाणी शिरणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
7. पुसा कोठी : ही कोठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने तयार केलेली आहे. कोठीचा आकार आयातकृती असून ही जमिनीपासून 4 से.मी. उंच ओट्यावर कच्च्या विटांच्या साहाय्याने तयार केली जाते. या कोठीमध्ये 1 ते 3 टनापर्यंत बियाण्याची साठवणूक करू शकतो. कोठाराच्या तळाकडीला, छताकडील व दोन्ही बाजूस 700 मायक्रॉन गेजच्या पॉलिथीनचे अस्तर लावलेले असते. कोठाराच्या खालील बाजूस 15 से.मी. व्यासाची नळी बियाणे बाहेर काढण्यासाठी असते. तसेच कोठारात बियाणे भरण्यासाठी समोरील बाजूस 60बाय60 से.मी. ची जागा असते.
8. हेसन बॅग (पोते) : बियाणे मोठ्या प्रमाणावर साठवावयाचे असल्यास पोत्यात साठविले जाते. व्यापाराच्या दृष्टीने साठवण करण्यासाठी सोयीचे ठरते.
9. एच.डी.पी.ई. बॅग : 30 ते 50 किलो बियाणे साठवणुकीसाठी या बॅग (गोणी)चा उपयोग होतो.
10. प्लॅस्टिक ड्रम (टाकी)/पत्र्याचा टिप : 50 ते 100 किलो बियाणे एका टाकीत साठवले जाते. बियाणे साठवताना टाकीमध्ये पॉलिथिनची बॅग वापरल्यास बियाणे जास्त दिवसांपर्यंत अंकुरणक्षम राहते.
11. तिहेरी थर वातभेद्य साठवणूक : रिकाम्या गोणीत 80 मायक्रॉन गेजच्या दोन पॉलिथीनच्या पिशव्या ठेवल्या जातात. साठवणुकीचे बियाणे पहिल्या पिशवीत भरून त्याची चूड घट्ट बांधली जाते व त्यानंतर दुसर्या पिशवीचीही चूड घट्ट बांधली जाते. शेवटी गोणी काळजीपूर्वक शिवून घेतात. त्यामुळे ने-आण सोपी होते. यामुळे बियाण्यातील आवश्यक प्राणवायू कमी होऊन कार्बनडाय ऑक्साइचे प्रमाण वाढते आणि किटकांच्या श्वासोच्छ्वासास अडथळा निर्माण होऊन किडीचे नियंत्रण होते.
आधुनिक साठवणगृहाची मुलभूत तत्त्वे
* साठवणगृहाची फरसबंदी (तळ) आर्द्रतारोधक असावी. भिंती, विटा सिमेंटच्या व छत सिमेंट काँक्रीटचे व आर्द्रतारोधक असावे.
* साठवणगृहातील हवा खेळती असावी.
* पक्षी व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खिडक्यांना जाळी असावी.
* साठवणगृहाचा तळ जमिनीपासून एक मीटर उंच असावा.
* बियाण्याच्या बॅगा लाकडी रॅकवर ठेवाव्या.
* बाहेरील भिंतींना पांढरा रंग द्यावा.
* छताला फॉल्स सिलिंग असावे, ज्यामुळे आतील तापमान थंड राहील.