सदाभाऊ खोत यांचे निर्देश
परभणी / प्रतिनिधी
जिल्ह्यातील दुष्काळाची झळ बसलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी गांभिर्याने व्हावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
परभणी जिल्ह्यातील दुष्काळ नियोजन आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री खोत बोलत होते. यावेळी आमदार मोहन फड, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी, महापालिकेचे आयुक्त रमेश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, अपर जिल्हाधिकारी अण्णसाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपस्थित होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पुरवठा योजनेतील कामांची माहिती खोत यांनी घेतली. ते म्हणाले, राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना तसेच जुन्या योजनांमधून ग्रामीण भागामधील कामे पूर्ण होणे गरजेचे होते. 23 प्रकल्पाची स्थिती व कामांचा आढाव्यासाठी मंत्रालयस्तरावर जिल्ह्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. तसेच यावर्षीच्या प्रस्तावित कामातील अडचणी दूर करुन कामे करावित. ग्रामीण जनतेला कामे उपलब्ध होण्यासाठी मग्रारोहयोमधून शेतरस्ता, पाणंद रस्ता, आदी कामे केली जावीत. यासाठी तलाठी, ग्रामसेवक आदींना उद्दीष्ट दिले जावे, असे राज्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले, पीकर्जवाटप, कर्जमाफीच्या रकमा, पीक विमा भरपाई शेतकर्यांना देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार बँकानी काम करावे यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी पीक विमा योजनेच्या कार्यवाहीचा आढावा घेतला तसेच दुष्काळासंबंधीउपाययोजनांची माहिती घेतली.
जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी दुष्काळ असलेल्या महसूल मंडळातील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत संरक्षित करुन पाणी पुरवठ्यासाठी करण्यात येत असलेलया कामाची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज, कृषी अधिकारी शिंदे आदींनी विविध योजनांची कामांची माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी पिनाटे यांनी जिल्ह्यातील जिल्हा दुष्काळ नियेाजनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी कृषी विभागांतर्गंत विविध योजनांचा लाभ मिळालेल्या शेतकर्यांना प्रमाणपत्र देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीनंतर राज्यमंत्री खोत यांनी पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील उपोषणादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकरी गंगाधर काळे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.