ससे पालन
कमी जागेत, कमी खर्चात, सहज होणारा व कुटुंबातील स्त्री, निवृत्त व्यक्ती किंवा अपंग व्यक्तींच्या मदतीने सहज हाताळता येईल, असा एक नाविन्यपूर्ण व्यवसाय म्हणजे मांसासाठी ससेपालन.
सशाचे मांस खाण्यावर कोणत्याही धर्माचे बंधन नाही. सशाची शिकार पूर्वापार केली जाते आहे. ससेपालनापासून वर्षभर उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतीपूरक किंवा एका स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही ससेपालन व्यवसायाकडे पाहता येईल.
ससेपालनातून अनेक प्रकारची उत्पादने मिळू शकतात व त्यामुळे अनेक प्रकारे उत्पन्न मिळू शकते. उदा. थंड हवेच्या ठिकाणी लोकरीसाठी ससेपालन, केसाळ कातडीसाठी विविध जाती विकसित झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मांस उत्पादनासाठी मोठ्या आकाराच्या जाती उपलब्ध आहेत. ससे औषधीनिर्मिती प्रयोगशाळेत तसेच शैक्षणिक कार्यासाठीही वापरतात.
वर उल्लेख केलेल्या उत्पादनाखेरीज ससेपालनाचे अनेक फायदे आहेत.
१) मादीची वर्षाकाठी अनेकदा विण्याची क्षमता असल्यामुळे वर्षभर मांस उत्पादन होऊन सतत आर्थिक लाभ घेणे शक्य आहे.
२) शरीरवाढीसाठी अन्नाचा जास्तीत जास्त वापर करून घेण्याची क्षमता असते.
३) सशाचे खाद्य म्हणून स्वस्त घास, गवत तसेच पालेभाज्यांचा टाकाऊ भाग इत्यादींचा सहज वापर करता येतो.
४) आंबोण व हिरवा चारा किंवा वाळलेला चारा या दोन्ही प्रकारच्या खाद्यावर ससे पाळता येतो. चारा नसेल तेव्हा केवळ पशुखाद्यावर तर भरपूर असेल तेव्हा केवळ हिरव्या चाऱ्यावर ससे पाळता येतात.
५) पूर्णवेळ व्यवसाय म्हणून किंवा पूरक व्यवसाय म्हणून ससेपालन शक्य आहे.
६) ससा आकाराने लहान व हाताळण्यास सोपा असल्यामुळे मांस उत्पादन व विक्रीच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर आहे.
७) सशापासून विविध रंगाची केसाळ कातडी मिळते.
८) सशाच्या मांसात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याला सुरक्षित मांस असे मानले जाते. ते अधिक प्रथिने व कमी चरबीमुळे तुलनात्मकदृष्ट्या अधिक सत्त्वयुक्त असते.
९) लोकर उत्पादनासाठी स्वतंत्र जाती उपलब्ध आहेत.
१) मादी एकावेळी अनेक पिलांना जन्म देते.
२) मादी वर्षातून अनेकवेळा विते. कारण तिची गर्भावस्था केवळ ३० दिवसांची असते. या दोन्ही कारणांमुळे एका मादीपासून वर्षाकाठी अनेक पिले मिळणे शक्य असते.
३) पिले जन्मल्यानंतर सुमारे १ महिना आईच्या दुधावरच जगतात. त्यामुळे त्यांच्या वाढीसाठी लागणारा खर्च कमी होतो.
४) अत्यंत कमी जागेत ससे पाळता येतात.
५) पिले वयाच्या केवळ १०-१२ आठवड्यातच कत्तलीस तयार होतात.
६) कत्तलीनंतर सशांमधून केसाळ कातडी मिळते त्यापासून सुंदर उपयुक्त वस्तू तयार करतात. असा फायदा कोंबडीच्या कत्तलीनंतर मिळत नाही.
शेतीवर अवलंबून न राहता शेतीबरोबर जोड व्यवसाय करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदयाचे ठरते.
- सशाच्या विविध जाती :
अपेक्षेपेक्षा वेगळ्या ( म्हणजे पांढऱ्या शुभ्र रंगाशिवाय ) इतर रंगाचे ससे आढळतात. जंगली सशांचा रंग चॉकलेटी असतो. पूर्ण काळा, काळा – पांढरा मिश्र, राखी व भुरकट अशा अनेक छटा आढळतात. विविध उत्पादन उद्दिष्टासाठी विविध जाती आढळतात.
अ) मांसल ससे, बेवरेन, कॅलीफोर्नियन, चिंचिल ग्रुप, डच, न्यूझीलंड व्हाईट, ग्रे जायंट, व्हाईट जाएंट स.
ब) चमकदार कातडीसाठी रेक्स, सॅटिन, अलास्का अर्जंट चेंपेन, हवाना, सॅबल इ.
क) प्रदर्शनीय सुंदर ससे : अलास्कार, ब्रिटीश जाएंट, अंगोरा, बेल्जियन, डच, फ्लेमिश जाएंट इ.
ड) तलम लोकरीसाठी अंगोरा.
- सशांचे रोग व त्यावरील प्रतिबंधक उपाय :
आपण उत्तम व्यवस्थापन करत असाल तर कळपात सहसा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही. सशांमध्ये मुख्यतः रक्ती हगवण, पोट फुगणे, कानाचे दुखणे, सर्दी निमोनिया, मायक्झोमॅटोसिस, एंटोरायटिस यासारखे धोकादायक रोग उद्भवू शकतात. या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता खालीलप्रमाणे उपाय योजावेत.
१) सशांचे पिंजरे नेहमी स्वच्छ आणि हवेशीर असावेत.
२) सशांचे खाणे-पिणे उत्तम दर्जाचे असावे.
३) पिंजय्रामध्ये प्राण्यांची गर्दी करू नये.
४) रागीट सशांना अलग ठेवणे.
५) माशा, गोमाशा किंवा डास यांचा त्रास टाळण्याकरिता कीटकनाशकांची फवारणी सभोवतालच्या परिसरात करावी.
शेतकरी मित्रांनो, आपण कमी खर्चात कमी वेळात अधिक उत्पन्न देणाऱ्या व्यवसाय सुरु केल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून वाचू शकतो.
- इतर माहिती :
१) एका युनिटमधील सशांची संख्या : २ नर आणि १० माद्या.
२) प्रथम प्रजननाचे वय : ६ ते ८ महिने.
३) गर्भकाळ : ३० ते ३२ दिवस.
४) एका मादीपासून एका वेळेस होणारी पिले : सरासरी सहा
५) समागम झालेल्या माद्यांमधील पिल्ले देणाऱ्या माद्यांचे प्रमाण : ९० टक्के
६) एका मादीपासून एका वर्षाला मिळणारी पिले = ६ पिले x ४ वेळा x १० माद्या = २४० पिले.
७) पिलांना मादीपासून वेगळे करण्याची वेळ : पिले झाल्यानंतर ५ आठवडे.
८) पुन्हा समागमाचा काळ : पिलांना मादीपासून वेगळे केल्यानंतर ८ आठवडा.
९) पिलांचे अपेक्षित मृत्यूचे प्रमाण : ३०%
१०) मांसाकरिता विक्रीयोग्य पिलांचे संख्या : १३४ ते १३६.
११) तीन महिने वयाच्या पिलांचे वजन : १.५ ते २ किलो.
१२) प्रौढ सशाचे अपेक्षित मृत्यू प्रमाण : ५ ते १०%
१३) प्रौढ सशांचे सरासरी वजन : ३ ते ३.५ किलो
१४) एका सशाला लागणारी जागा : ४५ x ४५ x ४५ से.मी.
१५) मांस उत्पादन प्रतिससा : १२ ते २४ आठवडे वयाचे : १ ते १.५ किलो. प्रौढ ससे – १.५ ते २ किलो.
१६) मांसाचा विक्री दर : ८० रु. प्रतिकिलो किंवा जास्त.
१७) चामडीचा विक्री दर प्रौढ ससा : ५० रु. प्रतीचामडी किंवा जास्त. १२ ते २४ आठवड्यातील : ३० ते ४० रु. १२ आठवड्यांपेक्षा कमी. २० ते ३० रु.
१८) खतापासून उत्पन्न : प्रौढ ससा : ६ रु. प्रतिवर्ष. १ ते २४ आठवडे वयाचे १ रु. ससा प्रतिवर्ष.
एका वर्षाला लागणारे खाद्य :
क्र. विवरण खुराक (कि.) गवत (कि.)
अ) दुध पाजणाऱ्या माद्या २८८.० ८६.००
ब) इतर ससे १७२.०० ५७.६००
क) पिले न देणाऱ्या माद्या १७२.०० ५७.६००
ड) ६ ते १२ आठवडे वयाची पिले ४८२.००१ ८०.९००
वरील माहितीनुसार व्यवसायाला सुरुवात केल्यास बेरोजगारांना अवश्य रोजगार उपलब्ध होईल.
https://krushisamrat.com/duck-rearing/
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.