रोपवाटिकेत लागणारी अवजारे व साधने – भाग-४

1

रोपवाटिकेमध्ये खालील स्वरुपाची कामे वारंवार अथवा नियमितपणे करावी लागतात.

 • खोदकाम – वाफे तयार करेणे, माती उकरणे इ.
 • ढेकळे फोडणे – सपाट वाफे या वरील ढेकळे फोडावी लागतात.
 • वाफे सफाट करणे.
 • माती / खत चाळणे.
 • खुरपी करणे.
 • रोपे स्थलांतरित करणे.
 • कुंड्यात माती खत भरणे.
 • रोपांची पाने काढणे.
 • डोळे भरणे.
 • कलमे उतरवणे.
 • डोळकाड्या काढणे.
 • बी रुजवणे.
 • बुरशी नाशके / कीटक नाशके वापणे.
 • खते, पोषक द्रव्ये, वापरणे.
 • खत-माती-कलम-रोपे जवळच्या जवळ हलविणे.

या प्रकारची कामे बहुतांश मजूराकरवी करून घेतली जातात. त्या कामासाठी योग्य तेच अवजार वापरावे.

हत्यारे-अवजारे यांची काळजी अशी घ्यावी :

१. कामे आटोपताच, अवजारे हत्यारे स्वच्छ करून ठेवावे.

२. लाकडी भागास रंग द्यावा.

३. स्प्रिंग इत्यादीस तेल वंगण द्यावे.

४. हत्यारे अवजारे उपलब्ध ठेवावे म्हणजे ऐनवेळी कामाचा खोळंबा होत नाही.

हत्यारे – अवजारे यांची संक्षिप्त माहिती.

१. टिकाव : खोडण्यासाठी उपयुक्त, वाफे करणे. बारमाही तणे काढणे, रोपे काढणे. रोपे काढणे इ. कामासाठी उपयुक्त यास दोन पाती असतात. १ पाते निमुळते व १ पाते पटाशी सारखे असते.

२. कुदळी : हलकी खंदणी करण्यास, माती-खत डेपो फोडून घेण्यास उथळ रोप हलविण्यास, गादीवाफे, सपाट वाफे इ. कामासाठी कुदाळीचा वापर होतो.

३.फावडे : वाफा सपाट करण्यासाठी तसेच गादीवाफ्याचा ओटा सपाट करण्यासाठी, पेरलेले बी मातीने झाकण्यासाठी, वाळत घातलेले बी, उलथेपालथे करण्यासाठी होतो.

४. खोरे : रुंद उभट आणि मोठ्या लोखंडी पात्यास लाकडी दांडा बसविलेला असतो. खत माती कालविण्यास गवत तासण्यास वाफे करण्यास खोऱ्याचा उपयोग होतो.

५. डीगिंग फोर्क : चार लोखंडी अणकुचीदार पात्याचे हे हत्यार जमीन उकरण्यास उपयुक्त.

६. डीबर किंवा डीबलर : लोखंडी, टोकदार असे लहान खुरे हत्यार आहे. बी टोकण्यास लहानसे भोक घेण्यास उपयोग होतो.

७. वरावरी : त्रिकोणी, लोखंडी, पत्यास लाकडी मुठ बसविलेले हे लहान खुरे हत्यार असून कडा व तणे काढण्यास उपयोग होतो.

८. गार्डन रेक : वाफ्यावर न फुटलेली ढेकळे, धसकटे गोळा करण्यासाठी लोखंडी दात्री असलेली आणि लाकडी किंवा पत्र्याच्या पाइपचा दांडा असलेले हे हत्यार आहे.

९. छाटनीचा चाकू : जाडसर फांद्या कापण्यासाठी याचा उपयोग होतो.

१०. ग्राफटिंग नाईफ : निरनिराळ्या कलम प्रकारात जे निरनिराळे काप द्यावे लागतात त्यासाठी या चाकुचा उपयोग होतो.

११. सिकेटर : छाटणी करण्यासाठी, बडस्टीक अलगदपणे काढण्यासाठी ही खास कात्री वापरली जाते.

१३. शीयर : गवत कापण्यासाठी कात्रीचा उपयोग होतो.

१४. हेज प्रूनर : जाड दांड्याची व मजबूत पात्याची ही कात्री हेज-कुंपण छाटन्यासाठी उपयुक्त आहे.

१५. ट्री प्रूनर : उंच झाडाच्या फांद्या कापण्यासाठी, तसेच आंब्यासारख्या मोठ्या झाडावरील बडस्टिक काढण्यासाठी उपयोग होतो.

१६. खुरपी : तणे काढण्यासाठी रोपांना कलमांना भर खत देण्यासाठी, कलमाच्या भोवतालची माती मोकळी करण्यासठी याचा उपयोग केला जातो.

१७. हातोडी व पटाशी : ही दोन हत्यारे वेगळी असून त्यांचा वापर एकत्रित होतो. मातृवृक्षाचे खोडावर जाड सालीचा तुकडा तेथे क्रमांक घालण्यास जागा करण्यासाठी हातोडीचा व पटाशीचा उपयोग होतो.

१८. बादली : औषधे, खते यांची द्रावणे करण्यासाठी वेगवेगळया आकाराच्या रंगाच्या  बादल्या उपलब्ध आहेत.

१९. चाळणी : रोपवाटिका बेड करण्यासाठी, तसेच कुंड्यातून भरण्यासाठी मातीचे बारीक असे मिश्रण हवे असते ते चाळून घेण्यासाठी याचा उपयोग होतो.

२०. नेम बोर्ड : रोपवाटीकेचे बाह्य व दर्शनी बाजूस नाम फलक असावा. त्यावर ठळकपणे नाव तपशील लिहून ठेवण्यास उपयोग होतो.

 रोपवाटिकेत वापरावयाची माध्यमे व साधने ;

माध्यम निवडताना पुढील बाबी ध्यानात घ्याव्यात .

१. माध्यम बर्यापैकी दाट व घट्ट असावे कि जेणेकरून त्यात बिया, फाटे, कंद व्यवस्थित रुजू शकतील.

२. माध्यम हवा, पाणी, यांचा समन्वय साधणारे असावे.

३. माध्यमात क्षारता किंवा एखादा हानिकारक घातक नसावा.

४. माध्यमातून किडी, रोग यांची लागण होऊ नये.

५. माध्यम हलके नसावे.

६. माध्यमाची उपलब्धता जवळपास असावी.

७. माध्यम हवे तेवढे उपलब्ध असावे.

काही माध्यमांची माहिती-

१. माती : मातीमध्ये सेंद्रिय व असेंद्रिय घटक असतात. मातीमध्ये घन द्रव आणि वायू या तीन घटकांचे मिश्रण असते. मातीमध्ये तीन प्रकारचे गुणधर्म असतात.

अ) भौतिक गुणधर्म – यात कणांची रचना, प्रमाण, पाणी धरुन ठेवण्याची धारणा असते.

ब) रासायनिक गुणधर्म – यात सामू, क्षारता, अन्न-मूलद्रव्ये प्रमाण चुनखडी इ. समावेश होतो.

क) जैविक गुणधर्म – यात उपयुक्त जिवाणू तसेच हानिकारक घातक यांचा समावेश होतो.

२) वाळू :

वाळू म्हणजे खडकाचे दगडाचे ०.०५ ते २.०० मि.मी. आकाराचे कण होत. क्वार्टझ सिलिका या प्रकारची आणि भिंतीचा प्लास्टर करण्यासाठी वाली, फाटे, कलमांना मुळे फुटण्यासाठी उपयुक्त समजले जाते. वाळूचा वापर करण्यापूर्वी ती वाळू चालून, धुवून, वाफाळून बुरशी नाशके जिरवून घ्यावीत.

३) पीट :

पाणथळ वनस्पती, अर्धवट कुजलेले अवशेष या पासून पीट बनते. पिटाचा गुणधर्म सहसा अम्लधर्मीय असतो.

४) कोकोपीट :

यामध्ये नारळाचा काथ्या चांगला कुटून त्याचा माध्यम म्हणून वापर केला जातो. अगदी नाजूक रोपे जसे भाजीपाला रोपे इ. साठी हे उपयुक्त आहे.

५) परलाईट :

लाव्हा रसाच्या खाणीतून निर्मिती होते. भट्टीत तापावून त्यावर प्रक्रिया करावी लागते. हे वजनाने हलके असते. सामू ७-७.५ दरम्यान असतो. यात मलद्रव्यांचा ही अभावच असतो.

६) पुमीस :

याची रसायनी प्रक्रिया न्युट्रल असते. यात वायू कोंडलेला असतो.

७) कंपोस्ट :

पालापाचोळा, पिकांचे वाढीनंतरचे अवशेष यांना चांगले कुजवून तयार होणारे कंपोस्ट चा वापर उगवण माध्यम म्हणून करता येतो.

८) कोळसा :

कोळसा क्षारविरहित वजनाने हलका, कार्बन उपलब्ध आणि निचरा चांगला होतो.

बी किंवा रोपे रुजविण्याची काही साधने :

१) मातीच्या कुंड्या :

अ) नांद : नांदीच्या वरचा तोंडाचा व्यास १५ इंच व बुडाचा व्यास ७.५ इंच असतो व उंची १२ इंच असते. यामध्ये मातृवृक्ष वाढ करता येते. व हे मातृवृक्ष अभिवृधीसाठी वापरता येते.

ब) खोबडा : वरच्या तोंडाचा व्यास १२ इंच व तळाचा व्यास ८ इंच असतो. शोभेच्या झाडाकरिता याचा वापर होतो.

क) परडी : पेरू व इतर झाडांचे दाब कलम करण्यासाठी याचा उपयोग होतो.

३) लाकडी खोके : रोपे तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

४) तबक : याचा उपयोग डोळकाड्या ठेवण्यासाठी कंद टी कटिंग रुजविण्यासाठी उपयोग होतो.

५) बोळकी : भाजीपाल्याची, वांगी, ढोबळी मिरची इ. याची रोपे तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो.

 

सामान्यपणे कुंड्या-भांड्याची निवड करताना पुढील बाबी ध्यानात घ्याव्यात.

 • कुंड्या-भांडी-पात्रे टिकाऊ असावीत.
 • ती वजनाने फार जाड नसावीत.
 • त्यांचा आकार आटोपशीर असावा.
 • अभिवृधीत पात्रांचा अडथळा येऊ नये.
 • त्यांची उपलब्धता सहज असावी.
 • त्यांची किंमत वाजवी असावी.
 • त्यांचा परत परत वापर करता यावा.

ऊतिसंवर्धन ( टिश्यू कल्चर ) भाग- ५

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
 1. […] […]

Leave A Reply

Your email address will not be published.