रोपवाटिका सुरु करतांना…. भाग – १

0

रोपवाटीका :

रोपाची वाढ आणि संगोपन केले जाते त्या जागेला रोपवाटिका असे म्हणतात. भारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमाची आणि बियाणाची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्ट पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रीत समुहाने केलेले असते. तिला रोपवाटिका असे म्हणतात. अलिकडे फुलझाडांचा, फळझाडांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातिवंत रोपांची शास्त्रीयादृष्ट्या निपज मोठ्या प्रमाणात होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे / रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे.

सुरुवात :

रोपवाटिकेची सुरुवात करण्यासाठी प्रथम आपणास शासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. परवानगी घेतल्यानंतर आपण रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करू शकतो. ज्या विभागात फळझाडांच्या लागवडीस वाव आहे. त्या भागात अशाच फळपिकाच्या रोपवाटिका शासनाने स्थापन केलेल्या आहेत. जेणे करून कलमीकरणाचा कार्यक्रम राबविणे शक्य होईल. राज्यात संत्री, मोसंबी, चिकू, आंबा वगळता इतर फळपिकाच्या खुंटाचे अद्याप्रमाणे करणे झालेले नाही. भविष्यात यामध्ये संशोधन झाल्यास रोगमुक्त बागा स्थापन करणे, लागवडीचे अंतर कमी करणे, बागेचे उत्पादन लवकर सुरू करणे इ. बाबी साध्या होऊन उत्पादन वाढीस मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते.

 

रोपवाटीकेचे महत्त्वः  

रोपावरील किडी व रोगाचे नियंत्रण करणे सोईचे होते.

 • रोपावर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते. उदा. डोळे भरणे, भेट कलम, गुटी कलम करणे इत्यादी.
 • रोपांना पाणी, खते वेळेवर देऊन चांगली वाढविता येतात.
 • उत्पादनक्षम व जातीवंत फळझाडांची कलमे व रोपे तयार करता येतात.
 • सावकाश वाढ होणाऱ्या झाडाचे रोपवाटिकेत चांगल्याप्रकारे संगोपन करून ती लागवडीसाठी वापरता येतात.
 • कमी जागेत मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करता येतात.
 • रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते.

रोपवाटिकेचे खालील प्रमाणे विविध प्रकार आढळतात :

१) शासकीय रोपवाटीका ,

२) कृषि विद्यापीठ रोपवाटीका ,

३) मान्यताप्राप्त सरस्थ रोपवाटीका ,

४) मान्यताप्राप्त आणि पंजीकृत खाजगी रोपवाटीका ,

५) खाजगी रोपवाटीका रोपवटिकेत निरनिराळ्या पिकांची कलमे / रोपे तयार केली जातात.       त्या पिकाच्या वर्गीकरणावरून रोपवाटिकचे खालील प्रमाणे प्रकार पडतात .

१. फळझाडांची रोपवाटिका

२. भाजीपाल्याची रोपवाटिका

३. फुलझाडे व शोभेच्या वनस्पतींची रोपवाटिका

४. औषधी वनस्पतींची रोपवाटिका

५. वनशेती पिकांची रोपवाटिका

६. फक्त बी – बियाणे

७. फक्त रोपे

८. फक्त कलमे

९. खास – ( स्पेशल ) रोपवाटिका : उदा . फक्त आंबा , फक्त द्राक्षे इ .

१०. सर्वसामान्य ( जनरल ) रोपवाटिका

११. दुसरीकडून कलमे – रोपे आणून त्यांची फक्त विक्री करणे .

१२. मागणीप्रमाणे कलमे – रोपे पुरविणारी रोपवाटिका

रोपवाटीकेची सुरुवात व आखणी :

फळबाग व तत्सम विकासात रोपवाटीकेचा महत्त्वाचा वाटा असतो. यशस्वी रोपवाटिका उभारण्यासाठी त्याचे सुरुवातीपासूनच नीट नियोजन करावे लागते. रोपवाटीकेची सुरुवात करताना तिचे प्रकार व ठिकाण या महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रथम रोपवाटिकेचा प्रकार निश्चित करावा. शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका की खाजगी रोपवाटिका आणि कोणत्या प्रकारची कलमे / रोपे तयार करावयाची हे प्रथम ठरवावे. वरीलपैकी कोणती रोपवाटिका सुरू करायची किंवा प्रस्थापित करावयाची हे विचारपूर्वक ठरवावे. त्या भागातील भौगोलिक परिस्थिती, पीक पद्धती दळणवळणाच्या सोई, कच्चा माल, मजूर यासंबंधी माहिती घ्यावी. अगोदर अभ्यास करावा. सर्वे असणा-या रोपवाटिकेबद्दलही माहिती मिळवावी. व्यवसाय म्हणून रोपवाटिका सुरु करताना सर्व नियमाची तसचे अर्थशास्त्रांचीही अधिकाधिक माहिती मिळवावी.

रोपवाटिका प्रस्थापित करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात:

 • कोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करावयची आहे?
 • किती कालावधीत रोपवाटिका कार्यरत ठेवायची आहे?
 • किती कलमे-रोपे उत्पादित करावयाची आहे?
 • किती जमीन हवी आहे?
 • पाणी
 • रोपवाटीकेसाठी मजुरांची उपलब्धता कशी आहे?
 • मातृवृक्ष
 • कलमे-रोपे करण्यासठी निवारा, आडोसे, गृहे.
 • खुंट-रोपे वाढविण्यास जागा.
 • कलमा-रोपांना हार्डनिंग करणे.

https://krushisamrat.com/nursing-planning-and-planning-part-2/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.