रोपवाटीकेचे संरक्षण व्यवस्थापन : भाग – १०

0

रोपवाटीकेतील मातृवृक्ष, खुंटरोपे, तयार कलमे/ रोपे यांचे संरक्षण करणे आवश्यक असते. रोपांचे खालील बाबींपासून संरक्षण करावयाचे असते हेही लक्षात घ्यावे.

 • रोग
 • किडी
 • तणे
 • प्रतिकूल हवामान
 • चोरी

रोगांपासून रोपावाटीकेचे संरक्षण :

रोपवाटिकेत पुढील प्रकारचे रोग पडतात.

 • बुरशीजन्य रोग,

ब. जीवाणूजन्य रोग,

क. विषाणूजन्य रोग,

बुरशीजन्य रोगात खालील रोगांचा प्रामुख्याने समावेश होतो.

 • जमिनीतील रोग : यात मुळकुजव्या, खोडकुजव्या रोगांचा समावेश होतो.

व्हार्टीसिलीयम, फुजारीयम, रायझोकटोनिया इ. चा समावेश आहे. यामुळे रोपमर वाढते, म्हणून याकडे दुर्लक्ष करू नये.

 • पाने- खोड यावर पडणारे रोग :
 • बुरशीजन्य : भुरी, करपा, तांबेरा इ.
 • जीवाणू जन्य : जीवाणू करपा, कॅकर इ.
 • विषाणुजन्य : मोझॅक, यलोव्हेन, लिटल लीफ इ.
 • बियाण्यातून पसरणारे रोग : रोपे कोलमडणाऱ्या बुरशी
 • हवेतून येणारे रोग : बरेचसे बुरशीजन्य रोग, भूरी, गेरावा इ. हवेतून पसरतात.
 • काही किडीव्दारा : मावा पांढरी माशी इ. व्दारा विषाणू जन्य रोगांचा प्रसार होतो.
 • पाण्यातून रोगांचा फैलाव : मुळकुजवे, खोडकुजवे इ. रोपवाटीकेचे बुरशीनाशकांचा वापर. बुरशीनाशके दोन प्रकारची असतात. १. कॅान्टॅक्ट ( स्पर्शजन्य ) २. सिस्टेमिक (आंतरपेशीय) अलिकडे यात आणखी भर पडली आहे. ती म्हणजे जैविक, खालील उदाहरणे पहा म्हणजे लक्षात येईल.
 • कॉन्टॅक्ट बुरशीजन्य : बोर्डोमिश्रण, कॅपटान इ.
 • सिस्टेमिक बुरशीनाशके : कार्बनडेझिम ( बाविस्टीन ) रिडोमिल, रुबीगन इ.
 • जैविक बुरशीनाशके : टायकोडर्मा व्हिरिडी

रोपवाटिकेत आढळणारे काही प्रमुख रोग :

 • डॅम्पिंग ऑफ
 • रूट रॅाट
 • स्टेम रॅाट
 • ब्लॅक स्पॉट
 • करपा
 • भुरी
 • गेरवां
 • चुरड्या मुरड्या
 • केवडा

रोपवाटिकेत नेहमी लागणारी बुरशीनाशके :

 • बोर्डा मिश्रण            ११. वेटसल्फ
 • कॉपर आॉक्झीक्लोराईड  १२. मायक्रोसूल
 • ब्लू कॉपर   १३. कवच
 • कॅपटन   १४. कॅराथेन
 • झायरम  १५. कॅलाक्झीन
 • अॅरोफंगिन   १६. रुबीगन
 • ब्लायटॉक्स कुमानएल   १७. वेटासूल
 • मेटालॅक्झील   १८. मायक्रोसूल
 • डाऊनील               १९. गंधक डस्ट
 • सट्रेप्टोसायक्लीन २०. कॉपर डस्ट

बोर्डो मिश्रण तयार करणे :

साहित्य : मोरचूद, विरी न गेलेला चुना, बादल्या, पाणी, मातीची, प्लॅस्टिकची भांडी, लिटमस पेपर इ.

कृती : प्रथम मोरचूद विरघळून घ्यावा. (१ किलो मोरचूद १० लिटर पाण्यात)

दुसऱ्या भांड्यात चुना विरघळवून घ्यावा. (१ किलो चुना ६० लिटर पाणी) नंतर मोरचुदाचे द्रावण व चुन्याची निवळी अथवा ढवली १०० लिटरच्या टाकीत एकत्र करून अजून पाणी टाकून १०० लिटर द्रावण करावे. तयार द्रावणाचा सामू ७ ते ७.५ एवढा असावा. सामू कमी (७ पेक्षा) असल्यास त्यात चुन्याचे पाणी ओतावे व सामू अधिक असल्यास (७ पेक्षा) असल्यास त्यात चुन्याचे पाणी ओतावे व सामू अधिक असल्यास (७ पेक्षा) त्यात मोराचुदाचे द्रावण ओतावे.

निरनिराळ्या तीव्रतेचे द्रावण करण्यासाठी पुढील तक्ता पाहावा.

मोराचून + चुना एकूण पाणी तीव्रता ( टक्के )
१ कि.   १ कि.

०.५ कि.  ०.५ कि.

१.५ कि.  १.५ कि

१०० ली.

१०० ली.

१०० ली.

१.००

०.५०

१.५०

 

बोर्ड मिश्रण वापरताना घ्यावयाची काळजी :

 • मोरचूद विरघळण्यास वेळ लागतो.
 • मोरचूद विरघळण्यास धातूची भांडी न वापरता मातीची, तांब्याची, लाकडाची, प्लॅस्टिकची भांडी वापरावीत.
 • चुना विरघळण्यास प्लॅस्टिकचे भांडे वापरू नये.
 • मिश्रण तयार करताना ते सारखे ढवळावे.
 • तयार मिश्रण लगेच वापरावे.
 • फवारणीसाठी बोर्ड मिश्रणाची तीव्रता ०.५ ते १.० टक्का एवढी असावी.
 • ड्रेंचींग ( जीरवणी ) साठी बोर्डा मिश्रणाची तीव्रता १ ते २ टक्के असावी.
 • पेस्ट करताना बोर्डा मिश्रणाची तीव्रता २.५ ते ५.० टक्के एवढी असावी.
 • बोर्डा मिश्रणाची वापर प्रतीबंधक म्हणून करणे केव्हाही चांगले. नर्सरीतील सर्व कलम रोपांना, मातृवृक्षांना बोर्डामिश्रणाच्या वर्षातून, पावसाळ्यापूर्वी, हिवाळ्यापुर्वी तसेच उन्हाळ्यापूर्वी अशा ३ वेळा नियमितपणे फवारण्या केल्यास, बऱ्याच रोगास प्रतिबंध होते.

१०. खुंटरोपे अथवा कलमे, पिशव्यात, वाफ्यावर ती लहान लहान असताना बोर्डा मिश्रणाचे ड्रेंचिग करावे, खिरणी, जंबेरी आंबा यांच्या खुंटाची रोपे करताना ड्रेंचिंग फारच उपयुक्त ठरते.

११. गुलाबावरील काळे ठिपके, संत्रा, मोसंबी वरील कॅकर, आंब्यावरील करपा, द्राक्षावरील कवडे-करपा इ. रोगास बोर्डा मिश्रणाच्या फवारण्या कराव्यात.

१२. मातृवृक्षांचे खोडावर जमिनीपासून ०.५ ते १ मी. उंची पर्यंत बोर्डापेस्टची लेप द्यावा.

इतर बुरशीनाशक वापर :

बोर्डा मिश्रणाखेरीज इतर बुरशीनाशके वापरता येतात. त्यांचे प्रमाण ओषधाच्या पुड्यावर अथवा डब्यावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे वापरावे. सामान्यपणे आंतराप्रवाही ( सिस्टेमिक ) बुरशीनाशकांचे प्रमाण १० लिटर पाण्यासाठी ४ ते १० मिली ग्रॅम / मिलीलीटर असते.

बावीस्टीन, रुबीगन, कॅलॉक्झीन इ. चा त्यात समावेश होतो. कॉन्टँक्ट ( स्पशर्जन्य ) बुरशीनाशकाचे प्रमण १० लिटर पाण्यासाठी २० ते ३० ग्रॅम एवढे असते, थोड्या पाण्यात बुरशीनाशक अगोदर विरघळवून घ्यावे.

किडीपासून रोपवाटीकेचे संरक्षण – रोगाप्रमाणेच रोपावाटीकेचे किडीपासून रक्षण करणे महत्त्वाचे आहे. मातृवृक्ष खुंट रोपे तसेच तयार यावर निरनिराळ्या किडी हल्ला चढविता असतात. काही किडी रोपा- कलामांच्या मुळावर तर काही किडी खोडावर-फांद्यावर तर काही पानावर आणि काही फळांवर- बियावर हल्ला करतात.

रोपवाटिकेत नेहमी आढळणाऱ्या किडी :

मातृवृक्षवर आढळणाऱ्या किडी :

 • आंब्यावरील- खोड कीड, शेंडा पोखरअळी, तुडतुडे.
 • चीकुवरील- मोहर पोखर अळी, पाने गुंडाळणारी अळी.
 • डाळींबावरील- खोडकिडा, फळपोखर अळी, साल खाणारी अळी.
 • पेरूवरील- पिठ्या ढेकुण, खेडाची साल खाणारी अळी.
 • द्राक्षावरील- उडद्या, पिठ्याढेकुण अळीत्र.
 • चिंचेवरील- अळी.
 • आवळ्यावरील- साल खाणारी अळी.
 • कवठावरील- भिरूड
 • सिताफळावरील – पिठ्या ढेकुण

 

यां किडींमुळे होणारे नुकसान :

 • मातृवृक्ष कामकुमवत होतात.
 • डोळकाड्या कमी येतात.
 • डोळकाड्या चांगल्या पोसत नाहीत.
 • किडींची प्रसार कलम रोपावर होतो.
 • फळातील बियावर विपरीत परिणाम होतो, त्याची उगवण कमी होते, ( कवठ, चिंच, सिताफळ इत्यादी )

कीड बंदोबस्तासाठी उपाय योजना :

किडनाशकामध्येही २-३ प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे

 • पोटविषे : किडीच्या पोटात जाऊन कीड मरते. आल्ड्रीन, फॉस्फॅमीडॅान, मोनोक्रोटोफास हि कीडनाशके या गटात मोडतात.
 • धुरविषे : वाफ होऊन परिणाम होतो व कीड मरते. या गटात इडीसिटी / मिथिल, ब्रोमाईड, अॅल्युमिनियम फोस्फाईड, डायक्लोरोव्हास या कीडनाशकांचा समावेश होतो.
 • स्पर्शविषे : किडीचा शरीरास या कीडनाशकांचा स्पर्श होऊन कीड मरते. या गटात सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस, डायक्लोरोव्हास या कीडनाशकांचा समावेश होतो.

कोळी : कोळी कीड ही इतर किटकापेक्षा वेगळी असते. या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी इथीयॉन, डायकोफॉल, मोनोक्रोटोफॉस, गंधक यांचा उपयोग होतो. सुत्रकृमी ( निमॅटोड ) ही कीड मुळांच्यावर गाठी वाढविते व पुढे पिकाचे नुकसान करते. अल्डीकार्ब, निमॅगोन, निर्मा ही सूत्रकृमीचा बंदोबस्त करण्यास उपयोगी पडतात.

 

बुरशीनाशके व कीडनाशके वापरताना घ्यावयाची खबरदारी :

 • योग्य ओषधाची निवड करावी.
 • बुरशीनाशक व कीडनाशक यांचा जरुरीप्रमाणे एकत्रित वापर करावा.
 • ओषधाचे प्रमाण पुड्यावर / डब्यावर दिल्याप्रमाणे वापरावे.
 • ओेषध निट विरघळवून/ निसळून नंतरच वापरावे.
 • तयार केलेले द्रावण प्रमाणातच फवारावे.
 • उन्हात वाऱ्यात ओषधे फवारू नयेत.
 • पावसाळ्यात, ओषधाबरोबर स्टीकर- सॅडोवीत १०० लीटरसाठी १०० मिली वापरावे.
 • द्रावणाचा सामू अॅसिडीक- आम्लीय ६.५ चे दरम्यान असावा, त्यासाठी रोस्ताब/ ह्युमर यांचा वापर करावा.
 • दोन फवारणीत योग्य ते अंतर ठेवावे.
 • ओषधांचे प्रमाण वाढवू नये, तसेच अधिक कीडनाशकांचा एकत्रित वापर टाळावा .

उंदीर : रोपवाटिकेत अनेकदा उंदराचा, त्यांच्या बिळांचा फारच उपद्रव होतो. त्यांच्या बंदोबस्तासाठी झिंक फॉस्फाईड हे ओषधे वापरावे.

जैविक किडींचा वापर : काही किडीसाठी / बुरशीसाठी दुसऱ्या किडींचा / बुरशीचा वापर करून हानिकारक कीड-रोगाचा बंदोबस्त करता येतो. उदा. क्रिप्टोलिमस ही कीड मिलीबग-पिठ्या ढेकुण या किडीवर हल्ला करून नष्ट करते. ट्रायकोडर्मा व्हीरडी हि बुरशी, व्हर्टीसिलीयम, फ्युजॅरीयम, पिथीयम या बुरशांचा नाश करते.

एकात्मिक कीड बंदोबस्त : एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे अशी पद्धत कि, ज्यामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवणे. या पद्धतीमध्ये यांत्रिक, भौतिक, रासायनिक, जैविक, अनुवंशिक पर्यावरणीय व कायदेविषयक पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. या पद्धतीत विविध पद्धतींना योग्य वाव दिल्यामुळे सुरुवातीपासूनच किडींच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते. केवळ रासायनिक किडनाशकामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात.

फेरोमेन सापळ्यांचा उपयोग :

कीटक स्वजातीयाशी सुसंवाद साधण्यासाठी आपल्या शरीरातून विशिष्ट गंध असलेली रसायनांची मिश्रणे बाहेर सोडतात. यांनाच फेरोमेन असे म्हणतात. समागमासाठी कार्यक्षम सहचार शोधण्यासाठी लिंगविषयक फेरोमान्सचा उपयोग होतो. यामध्ये सापळ्याव्दारे किडीचे नियंत्रण मोठ्या प्रमाणात किडीचे पतंग सापळ्यात पकडून त्यांचा नाश करणे आणि कीटकांच्या मिलनात अडथळे आणणे याद्वारे कीड बंदोबस्त साधला जातो.

तणांचा बंदोबस्त :

रोपवाटिकेत तणे वाढली तर त्याचा विपरीत परिणाम रोपकलमावर होतो. तेव्हा तणांचा बंदोबस्त करणे जरुरी असते. तणांचा बंदोबस्त करण्यासाठी खालील पद्धती वापरत आहेत.

 • खुरपणी, निंदणी, खांदणी या पद्धतीने तणे नष्ट करणे.
 • आच्छादन (मल्चिंग) करून ताणे नष्ट करणे.
 • हिरवळीची पिके घेवून तणे नष्ट करणे.
 • तण नाशकांचा वापर करून तणे नष्ट करणे.

यापैकी एक किंवा अधिक पद्धत वापरता येतात. तणामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे हंगामी तणे, उदा. शिंपी, पंढरी फुली, दुधाणी इ. दुसरा प्रकार म्हणजे बहुवर्षायू तणे यात हरळी, लव्हाळा यांचा समावेश होतो. तणाबरोबरच बंदगुले हाही एक उपद्रव रोपवाटिकेत विरोध करून मातृवृक्षावर होत असतो.

रोपवाटीकेतील स्वच्छता :   

रोपवाटिकेच्या सर्वच भागात स्वच्छता असावी. सर्व ठिकाणी, सुर्यप्रकाश व मोकळी हवा असावी. कोठेही वृथा दाटी, दलदल, कोंदटपण नसावा.

प्रतिकूल हवामानात संरक्षण : अनेक वेळा पाणी साचणे, वादळ, गारपीट, थंडीची लाट यापासून रोपावाटीकेस धोका पोहोचतो. अशा प्रसंगी, आडोसा, निवारा यांचे साहाय्य घ्यावे. विशेष करून लहान रोपे, नुकतीच बांधलेली कलमे यांची प्रथम काळजी घ्यावी. प्रतिकूल परिस्थिती केव्हा उद्भवते. याचे भान ठेऊन उपाय करावेत. पाळीव प्राणी, वर्दळ, चोरी यांपासून संरक्षण करावे.

रोपवाटिकेतील रोपांचे पोषण व पाणी व्यवस्थापन – (भाग – ९)

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.