मुंबई
माण देशी फाउंडेशनचे कार्य म्हणजे एक चमत्कार आहे. दुष्काळग्रस्तांसाठी चारा छावण्या, महिलांसाठी बँक, रेडिओ स्टेशन आदी उपक्रम आव्हान समजून पूर्ण केले असून हे कार्य म्हणजे मोठा चमत्कार आहे. महिलांच्या कष्टाला सन्मान देण्याचे काम ही संस्था करत आहे. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दादर येथील रवींद्र नाट्यगृहात झाले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, माण फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा उपस्थित होत्या. माणदेशी महोत्सवाला मुंबईकरांनी भेट देऊन या संस्थेला हातभार लावावा, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.
देसाई म्हणाले, महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम ही संस्था करत आहे. राज्यात महिला उद्योजकांची संख्या वाढावी यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सध्या 9 टक्के महिला उद्योजक आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाने कृषी कंपन्यांना मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या महोत्सवात कृषी कंपन्यांनी सहभाग नोंदवून शासनाच्या उपक्रमास हातभार लावल्याचे देसाई यांनी म्हटले.
माण देशी फाउंडेशनच्या महिलांनी उद्योग वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांना शासनाच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी देसाई यांनी दिली. मुंबईतील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या संस्थेच्या कार्याला हातभार लावावा. आपणदेखील या संस्थेसोबत काम करण्यास तयार असल्याचे देसाई यांनी सांगितले. समाजसेविका सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, महिलांनी संकटाने खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहिले पाहिजे. आपल्या दु:खाचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहिजे.
प्रास्ताविक माण देशी फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा यांनी केले. त्या म्हणाल्या की, प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. मुंबईतील नागरिकांना ग्रामीण भागातील शेतकर्यांनी कष्ट करून पिकवलेला शेतीमाल उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शहरी भागातील नागरिक काय खातात आणि काय खावे याची जाणीव या महोत्सवातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या महोत्सवातून ग्रामीण भागातील पारंपरिक कला लुप्त होऊ नये, त्याची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी, असा महोत्सवामागचा हेतू असल्याचे चेतना सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकारचे प्रदर्शन केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता देशपातळीवर भरविण्याचा मानस श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनात केरसुणी, पापड, लोणचे पासून जात्यावरील दळण, मातीपासून गृहोपयोगी वस्तू तयार करण्यापासून ग्रामीण संस्कृतीची ओळख दाखवणारे बारा बलुतेदार सहभागी झाले आहेत. चार दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून शेतकर्यांनी पिकवलेला कृषी माल या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावेळी डाऊ केमिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर शेनॉय, एक्सेचरचे सीईओ महेश झुरळे उपस्थित होते.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल