घराच्या परसबागेत, उकिरडय़ावर, कोपऱ्यातील मोकळय़ा जागेवर एखादे गोल भोपळय़ाचे वेल लावले जात असत. ऋषीपंचमीच्या दिवशी बलाच्या मेहनतीचे अन्न खायचे नाही, अशी प्रथा पूर्वी होती. त्या दिवशी उकडलेल्या भोपळय़ासोबत गूळ घालून ते सेवन केले जाई. या व्यतिरिक्त एखादे वेळी भाजीसाठी लाल भोपळय़ाचा वापर केला जाई. मात्र, आता लाल भोपळय़ाची शेती केली जाते हे ऐकले व ती शेती फायदेशीर आहे सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, सध्या अतिशय मोठय़ा प्रमाणावर लाल भोपळय़ाला बाजारपेठ उपलब्ध आहे. भोपळय़ाच्या शंभरपेक्षा अधिक जाती अस्तित्वात आहेत.
या भोपळय़ाचा इतिहास प्राचीन आहे. अमेरिका, ग्रीक, फ्रान्स या देशांत हजारो वर्षांपूर्वी भोपळय़ाचे उत्पादन घेतले जाई. प्रारंभीच्या काळात डुकरांसाठीचे खाद्य म्हणून याची ओळख होती. आता मानवासाठी अतिशय चांगले खाद्य म्हणून याची ओळख झाली आहे. हृदयरोगासाठी उत्तम, पचायला हलके, फायबरचे प्रमाण अधिक, प्रोटीन, काबरेहायड्रेट्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम याचा भोपळय़ात अधिक समावेश आहे. दक्षिण भारतात सांबरसाठी याचा अधिक वापर होतो.
तांबड्या भोपळ्याची लागवड देशभर केली जाते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये हे पीक चांगले येते. तांबड्या भोपळ्यामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे तसेच कार्बोहायड्रेट व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. भोपळ्याच्या सालीमध्ये लेसेथीन नावाचे प्रथिन असते. एरवी भोपळ्याची भाजी करताना साल काढून भाजी करतात तेव्हा प्रथिने वाया जाऊन भाजीचा गाळ होतो. त्याकरिता या भोपळ्याची भाजी करताना सालीसह करावी. ही भाजी सालीसह शेवग्याच्या शेंगेप्रमाणे खाल्ल्याने सालीजवळील लेसेथीनमुळे स्मरणशक्ती वाढते. भोपळा हे पीक कमी पाण्यावर येणारे असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या भागातही घेता येते. तसेच काढणीच्यावेळी बाजारभाव कमी असले तरी भोपळ्याची साठवण क्षमता अधिक असल्याने हे समाधानकारक भाव मिळेपर्यंत साठविता येते. त्यामुळे पीक अतिशय लोकप्रिय झाले आहे. याची लागवड फळझाडांमध्ये आंतरपीक किंवा अलिकडे मुख्य पीक म्हणून ही करण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पीक घेणा-या शेतक-यांनी लागवडीअगोदर एक गुंठय़ाला १०० किलो शेणखत, निमपावडर पाच किलो, ट्रायकोडमी ५० ग्रॅम मातीत मिसळणे आवश्यक आहे. प्रतिहेक्टरी दोन ते तीन किलो बियाणे वापरून रोपामध्ये चार फुटांचे अंतर ठेवावे. तसेच लागवडीनंतर १० दिवसांनी सुफला प्रतिगुंठय़ास एक किलो, ३० दिवसांनी दीड किलो द्यावे. ७५ दिवसांनी युरिया ६०० ग्रॅम ९० दिवसांनी युरिया ६०० ग्रॅम द्यावे. तसेच कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने संजीवक वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एका वेलीस दोन ते तीन फळे ठेवावीत व पिवळसर रंग फळास आल्यास त्यांची तोडणी करावी. या पिकास लाल मुंगी, पाण्याचा संपर्क आल्यास फळ फुटणे, भुरी रोग (डिनोकॅप वापरावे), फळमाशी (रक्षक सापळा वापरणे) यापासून धोका असतो. कमी मेहनत व कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे हे पीक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
भरडी जमीन असल्यास नफ्यात वाढ होते तसेच जिल्हय़ात तांबडय़ा भोपळय़ाचे पीक चांगल्याप्रकारे येते, अशी माहिती कृषितज्ज्ञ व्ही. सी. चौधरी यांनी दिली. बहुतांश पिकाचे मिळणारे कमी उत्पादन, भरमसाट उत्पादनखर्च आणि न परवडणारी शेती असेच सर्वत्र
चित्र दिसते.
जिल्ह्यात शेकडो एकर कातळाची जमीन पडीक आहे. ज्या जमिनीमध्ये काहीही पीक घेता येणे शक्य नाही, अशा जमिनीत भोपळय़ाचे पीक फायदेशीर ठरू शकते, असे प्रकाश भोगले यांनी सांगितले. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात, दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
औषधी उपयोग पाहू :
१) अतिभूक लागून वारंवार काही तरी खावेसे वाटते तेव्हा भोपळ्याची उकडून केलेली भाजी किंवा तूपात तळलेले वडे खावे.
२) तोंडास रूची नसणे व अन्न नकोसे होणे ह्यात लाल भोपळ्यांचे दह्यात केले भरीत जीरे व तूपाची फोडणी व सैंधव घालून खावे.
३) धावपळ दगदग ह्यामुळे त्रास होत असल्यास १ कप भोपळ्याचा रस+१ चमचा साखर+ १/४ चमचा सैंधव घालून प्यावे.
४) भोपळ्याच्या बिया सोलून आतील मगज तूपात तांबूस परतून त्यात साखर घालून लहान लहान लाडू करावे व ते अशक्तपणा मध्ये तसेच लहान मुलांना खायला द्यावेत.
५) आजारी व्यक्तीला भोपळा उकडून वाटून त्यात साजूक तूप व जि-याची फोडणी देऊन केलेले सूप द्यावे.