पेरणीपासून ते काढणीपर्यंत पिकांवर विविध प्रकारच्या किड व रोगांचे आक्रमण होत असते. या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये ३o ते ७o टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. ही घट टाळण्यासाठी योग्य वेळी, योग्य रसायन, योग्य पद्धतीने व योग्य साधन वापरून किड व रोग व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या लेखात जाणून घेवूयात पिक संरक्षण रसायनांचा सुरक्षित, सुनियोजित व प्रभावी वापर कसा करावा.
पिक सरंक्षण व्यवस्थापन
किड सर्वेक्षण
साधारणतः आठवड्यातून एक वेळा, तर नियमित तीव्र प्रादुर्भाव क्षेत्रात आठवड्यातून दोन वेळा किडीचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. किडसर्वेक्षणामध्ये किडीची ओळख, अवस्था, जीवनक्रम, मित्र कीटक, त्यांची संख्या तसेच नियंत्रणासाठी किडीची अवस्था इत्यादी माहिती मिळते. नियंत्रणाची वेळ, शिफारशीत कीटकनाशक व त्याची नेमकी किती मात्रा वापरावी, हे ठरवता येते. नियमित सर्वेक्षणामुळे कीटकनाशकांच्या फवारण्या व त्यांची मात्रा कमी करता येते. तसेच, कीटकनाशकांचा संतुलित वापर करता येतो.
एकाच वर्गातील कीटकनाशके पुन्हा पुन्हा वापरल्यास या कीटकनाशकांची किडीमध्ये भिनण्याची प्रक्रिया सारखी असल्यामुळे किड स्वतःमध्ये त्या कीटकनाशकाविरुद्ध संरक्षण यंत्रणा निर्माण करते. त्यालाच आपण किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली, असे म्हणतो. उदा. रसशोषक किडीचे जीवनचक्र सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यांचे असल्यामुळे कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीतून वाचलेली किडींच्या प्रतिकारक पिढ्या तयार होतात.
नियमित सर्वेक्षणाद्वारे किडींची व त्यांचे परभक्षक कीटकांची संख्या मोजून घ्यावी. किड व परभक्षक कीटकांचे सर्वसाधारण गुणोत्तर १:२ आल्यास पिकामध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. त्यापूर्वी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा भाग म्हणून पर्यावरणास सुरक्षित (इकोफ्रेंडली) अशी कीटकनाशके निवडावीत. तसेच किडींचे शत्रू कीटक मारले जाणार नाही याची दक्षता घ्यावी . वनस्पतिजन्य व जैविक कीटकनाशकांचा मोठ्या क्षेत्रावर किंवा गावपातळीवर एकाच वेळी वारंवार वापर कल्यास त्या भागात किडींचा उद्रेक होणार नाही. जैविक कीटकनाशकांच्या वापरास काही मर्यादा आहेत. ही कीटकनाशके वातावरणात आर्द्रता असल्यास व उन्हाची प्रखरता टाळल्यास अधिक प्रभावी ठरतात. जैविक कीटकनाशके न आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणीकरावी.
योग्य किटकनाशकांची निवड
फवारणीपूर्वी कीटकनाशकांची निवड करतांना आपल्या पिकांवर कोणती किड/रोग आहे, याची सर्वेक्षणाद्वारे खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. उदा. पानावर तपकिरी ठिपके, तपकिरी किंवा काळसर असतील, तर अशी लक्षणे बुरशीजन्य रोगाची आहेत. अनियमित तपकिरी ठिपके,चट्टे खोलगट/तेलकट असेल तर ही लक्षणे जिवाणुजन्य रोगाची, तर पानावर मोझेकसारखे पिवळे/गर्द पिवळे व हिरवे चट्टे, पानाचा अनियमित आकार अशी लक्षणे असतील तर विषाणुजन्य रोग, असे समजावे. किंडीमुळे नुकसान होत असल्यास पाने कुरतडणे, पानाला गोल/अनियमित छिद्रे, खरचटणे, काप, खोडाला छिद्रे इ. लक्षणे असल्यास किडींचा प्रादुर्भाव समजावा. पिकावर किड किंवा रोगाचे निदान झाल्यावर किड कोणत्या प्रकारचा आहे, याची तज्ज्ञांकडून पडताळणी करून घेऊन शिफारशीत कीटकनाशकांचा / बुरशीनाशकाचा नियंत्रणासाठी वापर करावा. किडीसाठी स्पर्शजन्य व पोटविष शिफारशीत कीटकनाशकांची निवड करावी.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.