पिक संरक्षण रसायनांचे फवारणी तंत्र भाग-२

1

मागील भागात आपण किड सर्वेक्षण करून  योग्य किटकनाशकांची निवड कसी करावी तसेच फवारणी केंव्हा करावी याविषयी जाणुन घेतले. या भागात आपण पुढील माहिती जाणुन घेवू.

कीटकनाशकांचे द्रावण तयार करणे

कीटकनाशकांचे पाण्यामध्ये द्रावण करताना प्रामुख्याने दोन प्रकारची कीटकनाशके बाजारात असतात. एक म्हणजे पाण्यामध्ये मिसळणारी (ईसी, एससी, डब्ल्यूपी, डब्ल्यूएससी इत्यादी ), तर दुसरी म्हणजे पाण्यात विरघळणारी (एसपी, डब्ल्यूएसएल, एसएल, एसजी इ.).

पहिल्या प्रकारच्या कीटकनाशकाचे क्रियाशील घटक विद्रावकामध्ये मिसळतात. हे विद्रावक ब-याच अंशी पाण्यामध्ये मिसळणारे असल्यामुळे ते कीटकनाशक (क्रियाशील घटक) व पाणी यांमधील दुव्याचे काम करते. अशी फॉर्म्युलेशन असलेली कीटकनाशके पाण्यामध्ये मिसळतात; परंतु विरघळत नाही. गव्हाचे पीठ जसे पाण्यात मिसळते, त्याप्रमाणे चांगले ढवळल्यानंतर ते पाण्यात एकसारखे पसरते; परंतु काही वेळाने ते तळाशी बसते. म्हणून पाण्यात मिसळणा-या कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते व फवारणी करताना असे द्रावण परत-परत ढवळावे लागते.

दुस-या प्रकारची कीटकनाशके पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून ती किडीसाठी प्रभावी ठरतात. तसेच, झाडांमध्ये त्वरित शोषली जातात. कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना पहिले प्लॅस्टिक बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात कीटकनाशक मोजून टाकावे व काठीने ढवळून एकजीव द्रावण तयार करावे. उदा. हे द्रावण १०० लिटर पाण्यासाठी तयार केलेले असल्यास ड्रममध्ये बकेटमधील द्रावण टाकून पाण्याची पातळी १०० लिटरची करावी व परत काठीने एकजीव द्रावण होईपर्यंत ढवळावे. प्रत्येक वेळी पंपामध्ये द्रावण भरतांना ड्रममधील द्रावण काठीने ढवळत जावे.

योग्य फवारणी पंपाची निवड

पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात दोन ओळींमधील जमीन झाकलेली नसते. अशा परिस्थितीत पाठीवरच्या साध्या पंपाने फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण जमिनीवर पडून वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. पीक मोठे झाल्यानंतर पॉवर पंपाचा उपयोग करू शकतो. फवारणीपूर्वी सर्व फवारणी यंत्रदुरुस्तीची आवश्यकता असल्यास ते दुरुस्त करून घ्यावे. योग्य नोझल आहे की नाही, हे तपासावे, नोझल सदोष / घासले असल्यास ते नवीन टाकावे.

 

 

 

फवारणी कशी करावी?

शिफारशीत कीटकनाशक योग्य मात्रेमध्ये घेऊन सांगितल्याप्रमाणे द्रावण तयार करावे. फवारणी करताना हातपंपाला (नॅपसॅक स्पेअर) हॉलो कोन नोझल वापरावे. कंपनीच्या पंपाला सर्वसाधारण हे नोझल असते. पंपाचे नोझल घट्ट करावे. या नोझलमधून ४० ते ८० पीएसआय दाब उत्पन्न होऊन फवान्याचे कवरेज मिळते. या पंपाने सर्वसाधारण पीकवाढीच्या अवस्थेनुसार ३५० ते ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर लागेल. पीक मोठे असल्यास व दोन ओळींतील जागा संपूर्ण झाकल्यास पावर पंपाचा वापर करावा. या पंपातून प्रतिमिनीट ०.५ ते ५ लिटर द्रावण बाहेर पडू शकते. या पंपाच्या होस पाईपला चार अॅडजस्टमेंट आहेत. त्यानुसार हवेचा दाब कमीजास्त घरून पिकाचा घेर व पानाच्या आकारमानानुसार  द्रावण पडण्याचा वेग आपल्या चालण्याच्या वेगानुसार नियंत्रित करावा. सर्वसाधारण या पावर पंपाने प्रतिहेक्टर १७५ ते २०० लिटर पाणी लागेल. पॉवर पंपाला शिफारशीत कीटकनाशकांची मात्रा तीन पट करावी. फवारणी करताना हवेच्या दिशेने फवारणी करावी. हवेचा वेग (५ किमी प्रतितासपेक्षा) जास्त असल्यास द्रावण उडून जात असल्यास फवारणी टाळावी.

पावसाची शक्यता असल्यास फवारणी टाळावी. फवारणी करताना पंपाचे नोझल (लांस) पिकापासून सहा इंच दूर धरल्यास चांगले कवरेज मिळेल. फवारणी केल्यावर त्यावर कमीत कमी ६ तासांपर्यंत पाऊस नसावा; अन्यथा पानावरील / झाडावरील कीटकनाशक धुऊन जाऊन फवारणी निष्प्रभ होते. फवारणीच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता असल्यास व फवारणी करणे आवश्यक असल्यास फवारणीच्या द्रावणामध्ये चिकट द्रव्य (स्टिकर) वापरावे. त्यामुळे कीटकनाशक पानावर/झाडावर जास्त वेळ चिकटून राहून हलका पाऊस आल्यास धुऊन जाणार नाही. याउलट प्रखर उन्हात उच्च तापमानामुळे  कीटकनाशकाचे झाडावर पडण्यापूर्वी विघटन होण्याची शक्यता असते; त्यामुळे प्रखर उन्हात उद्य तापमानात फवारणी करण्याऐवजी सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. कीटकनाशके खरेदीपूर्वी पिकाच्या फवारणी क्षेत्रावर किती पाणी ते जाणून घ्यावे. त्यानुसार फवारणीची मात्रा काढावी.

सदरची माहिती हि हिरा अॅग्रो तर्फे प्रसारित केल्या गेलेली आहे.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. […] […]

Leave A Reply

Your email address will not be published.