रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील रोग व्यवस्थापन – कांदा व लसूण , वाटाणा .

0

रब्बी हंगामातील रोग व्यवस्थापन

   कांदा व लसून

कांदा या पिकात प्रामुख्याने करपा हा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणुकीतील सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेतून ते काढणीपर्यंत योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे कांदा साठवणुकीत ठेवण्यापूर्वी त्याची विशिष्ट काळजी घेऊन योग्य रीतीने वाळवणे अत्यंत महत्वाचे असते.

 • रोपवाटीकेतील मर : जमिनीतील बुरशीच्या प्रादुर्भावामुळे रोपवाटीकेतील रोपांवर मर रोग येतो. या रोगामुळे रोपांची मान जमिनीलगत अचानक कुजून ती कोलमडलेली दिसतात. त्याचप्रमाणे लागवडीनंतरहि जमिनीतील बुरशीच्या प्रादुर्भावामुळे मर किंवा कांदा सड होते.

उपाय:

 • पिकाची फेरपालट करावी.
 • प्रमाणित बियाणे वापरावे.
 • बियाणे पेरण्यापुर्वी ३x१ मी. आकाराच्या गादीवाफ्यावर कॉपर ऑक्ज़िक्लोराइड ३० ग्रॅम प्रति वाफा या प्रमाणात जमिनीत मिसळावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी पुन्हा ३० ग्रॅम १० लि. पाण्यात मिसळून दोन्ही ओळींमधून काकरी पाडून ओतावे.
 • करपा : हा रोग अल्टरनेरीया पोरी, अ.शेपुलीकोला नावाच्या बुरशीमुळे करपा रोग येतो. या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे जास्त वाढते. रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या पातीवर सुरुवातीला लहान, खोलगट पांढूरके चट्टे पडतात. चट्टे वाढण्याची सुरुवात प्रथम शेंड्याकडून होऊन पातीच्या खालच्या भागाकडे पसरतात. या चट्ट्याचा मध्यभाग जांभळट – लालसर रंगाचा होतो आणि कडा पिवळसर दिसतात. दमट हवामानात रोगाचे प्रमाण वाढून या चट्ट्याच्या ठिकाणी तपकिरी किंवा काळपट बुरशीची वाढ होते. चट्ट्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून जळू लागतात व संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात रोग आल्यास पात जळून जाते, पिकाची वाढ चांगली होत नाही आणि कांदा न पोसल्यामुळे चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते. कांदे पोसण्याच्या काळात रोग आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कांद्यापर्यंत पसरतो त्यामुळे कांदा सडतो.

उपाय :

 • पिकाची फेरपालट करावी.
 • प्रमाणित बियाणे वापरावे.
 • लागवड करण्यापूर्वी रोपे मँकोझेब २५ ग्रॅम / १० लि. पाणी द्रावणात बुडवून लावावीत.
 • करपा रोगाची लक्षणे दिसताच मँकोझेब किंवा क्लोरोथॅलोनील किंवा कॉपर ओक्झीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १० मिली + स्टीकर १० मिली प्रति १० लि. पाण्यातून फवारणी करावी.

वाटाणा

वाटाणा या पिकावर प्रामुख्याने भुरी, मर, केवडा, तांबेरा, पानावरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. योग्य वेळी रोग नियंत्रणाचे उपाय केल्यास या पिकापासून भरपूर उत्पन्न मिळते.

 •  भुरी रोग : हा रोग इरीसिफी पॉलीगोनी नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या दोन्ही बाजूवर पांढरी पावडरीसारखी बुरशी दिसते. त्याचप्रमाणे वाटाण्याच्या सर्व हिरव्या भागावर उदा. खोड, फांद्या व शेंगावर रोगाचा प्रादुर्भाव पसरतो. रोगाचे प्रमाण वाढून पाने पांढरट होऊन निस्तेज होतात व ती तपकिरी-पिवळसर होऊन गळून पडतात. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे शेंगा तपकिरी, काळपट पडतात अशा शेंगांना बाजारभाव कमी मिळतो. रोगग्रस्त शेंगा सुकतात. पूर्ण झाड तपकिरी होऊन मरते. या रोगाचा प्रथम प्रादुर्भाव बियाणे आणि झाडाच्या रोगग्रस्त अवशेषापासून होतो व रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो.

उपाय:

 • पिकाची फेरपालट करावी.
 • प्रमाणित बियाणे वापरावे.
 • लवकर येणाऱ्या जातीची लागवड करावी. उदा. अरकेल
 • पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात पूर्ण करावी.
 • रोगाची लक्षणे दिसताच डीनोकॅप १० ग्रॅमकिंवा हेक्झॅकोनॅझोल १० मिली किंवा पाण्यात मिसळणारा गंधक २५ ग्रॅमप्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ – ३ फवारण्या कराव्यात.

२. तांबेरा: युरोमायसेस पीसी आणि युरोमायसीस फॅबी नावाच्या बुरशींमुळे हा रोग होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या दोन्ही बाजूवर लहान आकाराचे, लाम्बवर्तुलाकार ते गोल, फिक्कट तपकिरी व नंतर लालसर तपकिरी रंगाचे होणारे मोड येतात. आणि त्यातून बुरशीची विटकरी रंगाची भुकटी बाहेर येते. रोगाचा प्रादुर्भाव वाढून पानाच्या पूर्ण भागावर आणि खोडावर हा रोग पसरतो.

उपाय:

 • पेरणीपूर्वी बियाण्यास बेनोमिल किंवा कार्बेन्डाझीम ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावे.
 • रोगाची लक्षणे दिसताच मँकोझेब – २५ ग्रॅम  किंवा प्रोपिकोनाझेल १० मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नायनाट करावा.
 • पिकाची पेरणी १५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:-
www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

This image has an empty alt attribute; its file name is Strip.jpg

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.Leave A Reply

Your email address will not be published.