या पिकांवर प्रामुख्याने काळी कुज (ब्लॅक लेग), करपा (ब्लॅक लीफ स्पॉट), केवडा, घाण्या (ब्लॅक रॉट), मुळावरील गाठी/मुळकुजव्या (क्लबरूट), तांबेरा, भुरी आणि रोपे कालेमडणे हे रोग येतात. याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे काही विकृती दिसून येतात. कोबीवर्गीय पिकामध्ये रोगांच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेतच विशेष काळजी घ्यावी लागते.
- काळी कुज (ब्लॅक लेग) : हा रोग फोमा लिंगम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव बियाण्यावर वाढणाऱ्या बुरशीपासून होत असल्यामुळे रोगाच्या सुरुवातीच्या काळातच रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच पिकाच्या वाढीच्या काळातही हा रोग दिसतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे मुळे टोकाकडून खोडाकडे कुजत जाऊन रोपे सुकून कोलमडतात. पानावर तपकिरी रंगाचे आणि मध्यभाग करडा असलेले ठिपके पडतात. खोडाचा भाग तपकिरी खडबडीत होऊन काळा पडतो. रोगग्रस्त भाग कुजलेला दिसतो आणि असे रोगग्रस्त झाड मरते. रोगट खोड उभे कापल्यास आतील भाग काळा झालेला दिसतो. जमिनीतील अवशेषावर रोगकारक बुरशी तीन वर्ष राहते तसेच बियाण्यामार्फत सुद्धा हा रोग पसरतो.
उपाय:
- पिकाची फेरपालट करावी.
- प्रमाणित बियाणे वापरावे.
- उष्णजल बिजप्रक्रीया: यासाठी ५० अंश से. तापमानाच्या पाण्यात बी. अर्धा तास बुडवून ठेवावे. नंतर सावलीत सुकवावे आणि थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी.
- जमीन मध्यम प्रकारची व पाण्याचा निचरा होणारी असावी.
- करपा ब्लॅक (लीफ स्पॉट) : हा रोग अल्टरनेरीया ब्रॅसीकोला आणि अ.ब्रॅसिकी नावाच्या बुरशीपासून होतो. रोगाचा प्रादुर्भाव बियाणे व झाडाच्या रोगग्रस्त अवशेषापासून होतो आणि प्रसार किटक आणि हवेमार्फत होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेला गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर एकात एक वलये असलेले तपकिरी काले ठिपके पडतात. ढगाळ हवामानात या रोगाची तिव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात आणि सर्व भाग काळपट पडून पाने करपल्यासारखी दिसतात. कोबी आणि फुलकोबीच्या गड्ड्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात.
उपाय:
- पिकाची फेरपालट करावी.
- प्रमाणित बियाणे वापरावे.
- बियाण्यास पेरणीपूर्वी उष्णजल प्रक्रिया करावी किंवा कॅप्टन किंवा थायरम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.
- रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा.
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मँकोझेब किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा क्लोरोथालोनील २५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
- घाण्या रोग किंवा काळीकुज (ब्लॅक रॉट) : हा रोग झान्थोमोनास कॅम्पस्ट्रीस नावाच्या जिवाणूमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बियाणे आणि जमिनीतून होतो. रोगाची सुरुवात पानाच्या कडेपासून होते. रोगाची सुरुवात पानाच्या कडेपासून होते. पिवळेपण कडेपासून पानाच्या आतील भागाकडे वाढत जाऊन शेवटी इंग्रजी व्ही अथवा त्रिकोणासारखा चट्टा पडतो. हा डाग किंवा चट्टा पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत जाऊन लागण झालेला भाग तपकिरी पडतो. रोगट भागातील पानाच्या शिरा काळ्या पडतात. रोगग्रस्त भाग मोडल्यास त्यातून काळसर द्रव निघतो आणि त्याला दुर्गंधी येते म्हणून त्याला घाण्या रोग म्हणतात. रोग गड्ड्यापर्यन्त आणि मुळापर्यंत पसरल्यास कोबी फ्लॉवर चे गड्डे पूर्ण सडून जातात. रोगाचा प्रादुर्भाव लागवडीनंतर लवकर झाला तर रोगग्रस्त झाडे मरतात.
उपाय:
- पिकाची फेरपालट करावी.
- प्रमाणित बियाणे वापरावे.
- पेरणीपूर्वी बियाणे ५०० से. तापमानाच्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून सुकवावे. सुकल्यानंतर मर्क्युरिक क्लोराईड १ ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १ लि. पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणात ३० मिनिटे बीजप्रक्रिया करावी.
- स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम/१० लि. पाणी च्या द्रावणात तयार केलेल्या द्रावणात ३० मिनिटे बिजप्रक्रीया करावी.
- लागवडीनंतर ५ ते ६ आठवड्यापासुन कॉपर ओक्झीक्लोराईड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारणी करावी.
- रोगाची लक्षणे दिसताच पाने काढून नष्ट करावीत.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.
Start writing or type / to choose a block

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.