रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

0

भाजीवर पिकांवर सुरुवातीला रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामध्ये मुख्यत्वे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, कोळी दिसून येतात. तसेच भाजीपाला पिक निहकाप्रमाणे पाने, शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळ्या, वांग्यावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, भेंडीवरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी, नागअळी, वेलवर्गावर मेलान वर्म, फळमाशी, खोडमाशी, कोबी व फ्लॉवर पिकांवरील चौकोनी ठिपक्यांचा पतंग व पाने गुंडाळणारी अळी इ. आढळून येतात. सुरुवातीला रस शोषणाऱ्या किडी व त्यांचे व्यवस्थापन जाणून घेऊया.

 • रस शोषणाऱ्या किडी :
 • मावा  (Alphids)

यजमान पिके : वांगी, भेंडी, टोमटो, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, कोबीवर्गीय भाजी, बटाटे, मिरची इ.

नुकसानीचा प्रकार : पिले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानांच्या कडा खालील बाजूस वळतात. तसेच पाने पिवळी पडतात. यामुळे बरेच नुकसान होते. तसेच हे किटक त्यांच्या शरीरातून पारदर्शक चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. या बुरशीमुळे पानांची कर्बग्रहण क्रिया कमी होते. तसेच हे किटक वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे या पिकांमध्ये मोझॅक या विषाणुजन्य रोगांचा प्रसार करतात.

 • तुडतुडे (Jassids)

यजमान पिके : वांगी, भेंडी, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे, इ.

नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ पाने खरवडतात आणि पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वळतात. तसेच पानांच्या कडा करपतात. नंतर पूर्ण वाळतात. यालाच हॉपर बर्न असे म्हणतात. यामुळे बरेच नुकसान होते. तसेच हे किटक वांग्याच्या पर्नगुच्छ लिटल लीफ या ‘मायकोप्लाझमा रोगाचा प्रसार करतात’.

 • फुलकिडे (थ्रीप्स)

यजमान पिके : कांदा, टोमॅटो, वेलवर्गीय, मिरची इ.

नुकसानाचा प्रकार : पिले व प्रौढ पाने खरवडतात आणि पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वळतात व पाने पिवळी पडतात. तसेच हे किटक वेलवर्गीय भाजी, बटाटे, टोमॅटो या पिकांत स्पोटेड विल्ट या या विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात.

 • पांढरी माशी (whitefly)

यजमान पिके : वांगी, भेंडी, टोमॅटो, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे, मिरची, इ.

नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ पाने खरवडतात आणि पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वळतात व पाने पिवळी पडतात. यामुळे बरेच नुकसान होते. तसेच हे किटक त्यांच्या शरीरातून पारदर्शक चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यार्व काळ्या बुरशीची वाढ होते, या बुरशीमुळे पानांची कर्बग्रहण क्रिया कमी होते. तसेच हे किटक वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे या पिकांमध्ये लीफ कर्ल पाने वाकडी होणे या विषाणुजन्य रोगांचा प्रसार करतात.

 • लाल कोळी (Mites)

यजमान पिके : वांगी, भेंडी, टोमॅटो, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे, मिरची, इ.

नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ पाने खरवडतात आणि पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांतील हरितद्रव्य कमी होते. पाने पिवळी पडतात. तसेच पानांवर जाळी तयार होते. झाडांची वाढ खुंटते. यामुळे बरेच नुकसान होते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

 • बीज प्रक्रिया : बीजप्रक्रिया केलेले बियाणे वापरणे.
 • रोपवाटिका

रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी गादी वाफा तयार करावा (३x१मीटर) त्यात पुढीलप्रमाणे खते आणि औषधे वापरावीत. वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा, कोबी इत्यादीसाठी.

 • शेणखत १-२ घमेले
 • निंबोळी पेंड २-३ किलो
 • कॉपर ओक्झीक्लोराईड २०-३० ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा प्लस पावडर २५ ग्रॅम या बुरशीनाशकांची व गरज पडल्यास डायमेथोएट ३०ईसी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी.
 • लागवडीचे वेळी

आंतरपिके : पूर्णलागवडीचे वेळी मुख्य पिकांच्याकडेने मका आणि चवळी, झेंडू लावावा.

रोप प्रक्रिया : पूर्णलागवडीचे वेळी इमिडाक्लोप्रीड १७.८% इस.एल. १० मिली किंवा कार्बोसल्फान २५ ई.सी. १० मिली प्रति १० लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे १ तास बुडवून नंतर लावावीत. पूर्णलागवडीचे वेळी शेतात निंबोळी पेंड हेक्टरी १०००-१५०० किलो या प्रमाणात टाकावीत.

सूत्रकृमिच्या नियंत्रणासाठी कार्बोफ्युरोन ३३ किलो किंवा फोरेट १० किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात प्रत्येक रोपाभोवती रिंग पद्धतीने टाकून मातीने झाकून घ्यावे.

 • लागवडीनंतर
 • डायमेथोएट ३० ई.सी. १० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८% इस.एल. ५ मिली किंवा कार्बोसल्फान २५ ई.सी. १० मिली किंवा ट्रायझोफोस ४० ई.सी. १५ मिली किंवा थायमेथोक्झाम २५ डब्ल्यू.जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आठवड्याच्या अंतराने गरजेनुसार फवारण्या कराव्यात.
 • जैविक किडनाशकामध्ये व्हर्टीसिलीयम लेकॅनी ५० ग्रॅम किंवा मेटा-हायझम अनिसोपली ५० ग्रॅम, प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
 • अधून मधून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी गरजेनुसार करावी.
 • लाल कोळी या किडीसाठी पुढील पैकी एका किडनाशकाची फवारणी गरजेनुसार करावी. पाण्यात मिसळणारी गंधक पावडर ३० ग्रॅम किंवा डायमेथोयेट ३० ईसी. १० मिली + पाण्यात मिसळणारी गंधक पावडर २० ग्रॅम किंवा फेनपायरोक्झीमेट ५ ईसी १० मिली किंवा प्रोपरगाईट ५७ ईसी २० मिली किंवा फेनाक्झाक्वीन १० ईसी २० मिली. किंवा इथियोन ५० ईसी. १० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात साध्या हात पंपाने फवारणी करावी.
 •  इतर किडी
 • शेंडा आणि फळ पोखरणारी अळी (Leucinodes orbonalis)

यजमान पिके : वांगी

नुकसानीचा प्रकार : अळी प्रथमतः शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. त्यानंतर अळी फळात प्रवेश करून फळांचे नुकसान करते. त्यामुळे अशा फळांचा खाण्यासाठी उपयोग होत नाही. पर्यायाने बरेच नुकसान होते.

कीड व्यवस्थापन : पुनर्लागवड करतांना वांग्याची रोपे इमिडाक्लोप्रिड १७.८% एस.एल. १० मिली प्रति १० लिटर पाण्याच्या द्रावणात १ तास बुडवून नंतर लागवड करावी. शेताच्या कडेने मका+चवळी यांची लागवड करावी. लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा किटक प्रति हेक्टरी १ लाख या प्रमाणात ७ दिवसांचे अंतराने २-३ वेळा सोडावेत. वेळोवेळी किडलेले शेंडे खुडून काढावेत आणि खोल खड्ड्यात गाडून टाकावेत. शेतात एकरी ४० या प्रमाणात ल्युसी ल्युर कामगंध सापळे लावावेत. किडीचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असेल तर पुढील प्रमाणे फवारणी करावी. निंबोळी अर्क ५ टक्के, बी.टी. जीवाणू १० ग्रॅम लिटर पाणी, कार्बोसल्फान २५ ईसी १५ मिली किंवा ट्रायझोफोस ४० ईसी. १५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून किंवा स्पायनोसॅड ४५ एससी. ५ मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्का + ट्रायझोफोस ३५ टक्के (संयुक्त कीटकनाशक) २० मिली किंवा क्लोरानत्ट्रानिलीप्रोल १७.८% एस.एल. ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारावे.

 • शेंडे व फळ पोखरणारी अळी (Earias vittela, E.insulana)

यजमान पिके : भेंडी, वाल, वाटाणा, घेवडा

नुकसानीचा प्रकार : अळी प्रथमतः कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. त्यानंतर अळी फळात प्रवेश करून फळांचे नुकसान करते. त्यामुळे अशा फळांचा खाण्यासाठी उपयोग होत नाही. पर्यायाने बरेच नुकसान होते.

कीड व्यवस्थापन

लागवडीनंतर : लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा किटक प्रति हेक्टरी १ लाख या प्रमाणात ७ दिवसाचे अंतराने २-३ वेळा सोडावेत. वेळोवेळी किडलेले शेंडे खुडून काढावेत. आणि खोल खड्ड्यात गाडून टाकावेत. किडलेली फळे काढून नष्ट करावेत. किडीचे प्रमाण ५ टक्के पेक्षा जास्त असेल तर पुढीलप्रमाणे फवारणी करावी. निंबोळी अर्क ५ टक्के, बी.टी. जीवाणू १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी, कार्बोसल्फान २५ ईसी. १० मिली किंवा ट्रायझोफोस ४० ईसी. १५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून किंवा स्पायनोसॅड४५ एससी. ५ मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्का + ट्रायझोफोस ३५ टक्के (संयुक्त कीटकनाशक) २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारावे.

 • फळे पोखरणारी अळी (Heliothis armigera)

यजमान पिके : टोमॅटो, वाटाणा, भेंडी, वाल, घेवडा, कोबीवर्गीय भाजी, बटाटे, मिरची

नुकसानीचा प्रकार : अळी प्रथमतः कोवळी पाने खाते. त्यानंतर अळी फळात प्रवेश करून फळांचे नुकसान करते. त्यामुळे अशा फळांचा खाण्यासाठी उपयोग होत नाही. पर्यायाने बरेच नुकसान होते.

कीड व्यवस्थापन

 • आंतरपिके / सापळा पिके : पुनर्लागवडीचे वेळी मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी लावावी. टोमॅटोच्या प्रत्येक १५ ओळीनंतर २ ओळी झेंडूच्या लावाव्या. झेंडूची लागवड टोमॅटो लागवडीपूर्वी १५ ते २० दिवस अगोदर करावी म्हणजे झेंडूला कळ्या लवकर लागून कीड झेन्दुकडे अगोदर जाईल. त्याचवेळी झेडूवर कीडनाशकाची फवारणी केल्यास टोमॅटोकडे जाणाऱ्या फळे पोखरणाऱ्या अलीचे प्रमाण कमी करता येईल.

जैविक नियंत्रण

 • लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चीलोणीस किटक प्रति हेक्टरी १ लाख या प्रमाणात ७ दिवसाचे अंतराने २-३ वेळा सोडावेत. हे किटक फळे पोखरणाऱ्या किडींच्या पतंगाच्या अंड्यात स्वतःची अंडी घालतात. त्यामुळे फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेत नष्ट होते.
 • फळे पोखरणारी अळीस विषाणूपासून आणि जीवाणूपासून रोग निर्माण होतात. तेव्हा असे विषाणू आणि जीवाणू प्रयोगशाळेत पाठवून त्यांचे द्रव किंवा भुकटी स्वरूपात उपयोग केला जातो. हेलीओथिस न्युक्लीअर पोलीहेड्रोसीस व्हायरस एच.ए.एन.पी.व्ही. या नावाने हे विषाणू ओळखले जातात. एच.ए.एन.पी.व्ही. २०० मिली एकरी २०० लिटर पाण्यातून संध्याकाळचे वेळी साध्या पंपाने फवारावे.

सेंद्रिय घटकाचा वापर करून नियंत्रण

यामध्ये वनस्पतीजन्य कीडनाशकांचा वापर करता येतो. उदा. निंबोळी अर्क ५%

व्यवस्थापनाच्या इतर बाबी

 • शेतात एकरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावे. या सापळ्यांचा उपयोग किडीचे आगमन आणि प्रमाण आजमवण्यासाठी होतो.
 • वेळोवेळी किडलेली फळे काढावीत आणि खोल खड्ड्यात गाडून टाकावीत.

  रासायनिक व्यवस्थापन

 • किडीचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असेल तर पुढीलप्रमाणे फवारणी करावी. किडनाशकामध्ये स्पायनोसॅड ४५ एससी. ६० मिली. किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्का + ट्रायझोफोस ३५ टक्के (संयुक्त किटकनाशक) ४०० मिली किंवा इन्डोक्झाकार्ब १४.५ इस.सी., २०० मिली २०० लिटर पाण्यात साध्या हात पंपाने फवारावे.
 • पाने आणि फळे खाणारी अळी (Melonworm)

यजमान पिके : वेलवर्गीय भाजी, कलिंगड, कारले, खरबूज, काकडी इ.

नुकसानीचा प्रकार : अळी पाने खाते त्यामुळे वेलीवर पाने शिल्लक राहत नाही. त्याच बरोबर ती फळांत प्रवेश करून फळांचे नुकसान करते. त्यामुळे अशा फळांचा खाण्यासाठी उपयोग होत नाही. पर्यायाने ५०-६० टक्के नुकसान होऊ शकते.

हवामानानुसार प्रादुर्भाव : या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ परंतु पाउस नसलेल्या कोरड्या हवामानात जास्त होतो. तसेच उन्हाळ्यात ३०-३५ डिग्री तापमानात वाढ झाल्यास किडीचे प्रमाण घटते.

कीड व्यवस्थापन

 • किडलेली फळे अळीसह काढून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात गाडून टाकावेत.
 • पानाखाली असलेले कोश काढून नष्ट करावेत.
 • किडीचे प्रमाण ५ टक्के पेक्षा जास्त असेल तर पुढील रासायनिक कीडनाशकांची गरजेप्रमाणे फवारणी करावी. कार्बोसल्फान २५ ईसी २०० मिली. किंवा ट्रायझोफोस ४० ईसी ४०० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्का + ट्रायझोफोस ३५ टक्के (संयुक्त किटकनाशक) ४०० मिली किंवा क्लोरोपायरीफोस २० ईसी ४०० मिली एकरी २०० लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारावे.
 • नाग अळी (Leaf miner)

यजमान पिके : वेलवर्गीय भाजी, कलिंगड, कारले, खरबूज, काकडी इ.

नुकसानीचा प्रकार : अळी पानात राहून आतील भाग पोखरते. त्यामुळे पानावर नागमोडी रेषा दिसतात आणि पानातील हरितद्रव्य कमी होते. पर्यायाने बरेच नुकसान होते.

किड व्यवस्थापन

 • किडलेली पाने अळीसह काढून नष्ट करावी.
 • मशीनची संख्या कमी करावयाची असेल तर पिवळ्या प्लास्टिकच्या पताकांना चिकट द्रव्य ग्रीस लावून शेतात लावाव्यात.
 • किडींचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असेल तर खालीलप्रमाणे फवारणी करावी.

सेंद्रिय पदार्थांचा वापर

 • निंबोळी अर्क ५ टक्के

रासायनिक व्यवस्थापन : कार्बोसल्फान २५ ईसी २०० मिली. किंवा ट्रायझोफोस ४० ईसी. ४००    मिली. किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्का + ट्रायझोफोस ३५ टक्के (संयुक्त किटकनाशक) ४०० मिली किंवा इथिओन ४० टक्के + सायपरमेथ्रीन ५ ईसी (संयुक्त किटक नाशक) ४०० मिली. एकरी २०० लिटर पाण्यातून गरजेप्रमाणे १० ते १५ दिवसांचे अंतराने साध्या हात पंपाने फवारावे.

 • फळमाशी (Fruit fly)

यजमान पिके : वेलवर्गीय भाजी, कलिंगड, कारले, खरबूज, काकडी इ.

नुकसानीचा प्रकार : अळी फळात राहून आतील भाग पोखरते. फळे वाकडी होतात तसेच फळे सडतात आणि अकाली गळतात. पर्यायाने बरेच नुकसान होते.

कीड व्यवस्थापन

 • किडलेली फळे अळीसह काढून नष्ट करावेत किंवा खोल खड्ड्यात गाडून टाकावेत.
 • फलमाशीचे प्रौढ आकर्षित करण्यासाठी क्ल्यू-ल्युर कामगंध सापळ्यांचा एकरी ५ या प्रमाणात वापर करावा.
 • किडीचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असेल तर निंबोळी अर्क ५ टक्के किंवा मेलथिओन ५० ईसी ४०० मिली अधिक २ किलो गुल एकत्र घेऊन २०० लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने संध्याकाळच्या वेळेस फवारावे.
 • खोड माशी (Stem fly)

यजमान पिके : घेवडा, वाटाणा आणि सोयाबीन

नुकसानीचा प्रकार : अळी खोडाच्यावर असलेल्या सालीच्या आत राहून आतील भाग खाते. त्यामुळे खोडाच्या वरील साल तडकते त्यामुळे रोपे मरतात पर्यायाने बरेच नुकसान होते.

कीड व्यवस्थापन : पिक उगवल्याबरोबर निंबोळी अर्क ५ टक्के किंवा सायपरमेथ्रीन २५ ईसी. ५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. किडलेली झाडे अळीसह काढून नष्ट करावीत.

 • चौकोनी ठिपक्यांचा पतंग (Diamond back moth)

यजमान पिके : पान कोबी, फुलकोबी, नवलकोल, मोहरी, इ.

नुकसानीचा प्रकार : ही कोबी वर्गीय पिकांमध्ये सर्वांत महत्वाची कीड आहे. या किडीमुळे ५०-६० टक्के नुकसान होऊ शकते. अळ्या लहान हिरव्या असून त्यांना स्पर्श केल्यास त्या जलद हालचाल करतात. त्या पानांवरच कोशवस्थेत जातात. प्रथमतः अळ्या पानाचा वरचा पापुद्रा खतात. नंतर पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांची चाळणी होते. त्यामुळे गड्डे खराब होतात. तसेच अळ्या फुल कोबीच्या गद्यात राहून नुकसान करतात. अशा गड्ड्यांना चांगला भाव मिळत नाही.

 • पाने गुंडाळणारी अळी (Leaf roller)

यजमान पिके : पान कोबी, फुल कोबी, नवलकोल, मोहरी इ.

नुकसानीचा प्रकार : अळी हिरवी असून चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाच्या अळीपेक्षा मोठी असते. तिच्या शरीरावर काळे पट्टे असतात. ती पाने खाते तसेच पाने गुंडाळून त्यात राहते. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांची चाळणी होते. त्यामुळे गड्डे पोसत नाहीत. पर्यायाने फार नुकसान सोसावे लागते.

कीड व्यवस्थापन

लागवडीच्या वेळी : कोबी किंवा फुलकोबी लावण्यापूर्वी मुख्य पिकाच्या २५ ओळी अंतर दोन ओळीत मोहरी पेरावी.

रोपप्रक्रिया : पुनर्लागवडीच्या वेळी रोपे ट्रायकोडर्मा +५० ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २५ ईसी १० मिली १० लिटर पाणी या द्रावणात १ तास बुडवून नंतर लावावीत. पुनर्लागवडीचे वेळी शेतात निंबोळी पेंड हेक्टरी १०००-१५०० किलो टाकावी.

लागवडीनंतर

 • शेतात पक्ष्यांच्या थांब्यासाठी काठीचे अॅन्टीने (मचान) लावावेत. तसेच हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत.
 • मोहरीवर अळ्या दिसू लागताच डायक्लोरव्होस ७६ डब्ल्यू.एस.सी. १० मिली किंवा क्लोरोपायरीफोस २० ईसी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
 • कोबीचे गड्डे धरण्यापूर्वी १ ली. फवारणी बी.टी. १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून.
 • २ री. फवारणी पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी निंबोळी अर्क ५ टक्के.
 • ३ री फवारणी पुनर्लागवडीनंतर ६० दिवसांनी बी.टी. जीवाणू १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून.
 • ४ थी फवारणी पुनर्लागवडीनंतर ७५ दिवसांनी प्रोफेनोफोस ५० ईसी २० मिली किंवा कार्बोसल्फान २५ ईसी. १५ मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्का + ट्राय झोफोस ३५ टक्के (संयुक्त किटक नाशक) २० मिली प्रति १० लिटर पाणी
 • त्यानंतर गरज पडल्यास कीडनाशकामध्ये स्पिनोसॅड २.५ एस.सी. १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून किंवा क्लोरॅनत्ट्रॅनिलीप्रोल १७.८% एस.एल. २ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एस.सी. १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारावे.

किटकनाशके / बुरशीनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी

 • भाजीपाला पिकावर फवारणी करतांना किटकनाशके / बुरशीनाशके पिक निहाय व संबंधित किडीच्या लाबेल क्लेमनुसार वापरावे.
 • सदरहू कीडनाशक / बुरशीनाशक बॅन किंवा रेस्ट्रीक्टेड पहावे.
 • पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नये.
 • रसायनांचा गट माहिती करून घ्यावा.
 • मधमाशांना हानिकारक किटकनाशके / बुरशीनाशके वापरणे टाळावे.
 • पीक फुलोरा अवस्थेत असतांना किटकनाशकांचा / बुरशीनाशकांचा समंजसपणे वापर करावा.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:-
www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

Start writing or type / to choose a block

This image has an empty alt attribute; its file name is Strip.jpg

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.Leave A Reply

Your email address will not be published.