सौर कृषी वाहिनी योजनेसह विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन
7 लाख 50 हजार शेतकर्यांना लाभ
मुंबई/
साडेसात लाख शेतकर्यांना दिवसभर पुरेसा वीज पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे उद्घाटन 16 आँक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. ही योजना म्हणजे शेतकर्यांना सरकारकडून दसर्याची भेट मानली जाते. सौर कृषी वाहिनीसह शेतकर्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा देणारी एचव्हीडीएस योजना व वीजेवर धावणार्या वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे.
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी आयोजित या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित राहणार आहेत. सध्या महावितरणकडून शेतीला दिवसा आठ ते दहा तास चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. दिवसाच्यावेळी अधिक वीज मिळावी म्हणून ऊर्जा विभागाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतीला वीज पुरवठा होईल. राज्यातील सुमारे 7 लाख 50 हजार शेतकर्यांना दिवसा पुरेशी वीज मिळेल.
शेतीला अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणाली योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत एक किंवा दोन कृषीपंपासाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध असेल. त्यामुळे शेतकर्यांमध्ये रोहित्राबद्दल स्वामित्वाची भावना निर्माण होऊन रोहित्र नादुरूस्तीचे प्रमाण घटेल तसेच अपघात कमी होणार आहेत या योजनेचा लाभ राज्यातील 2 लाख 24 हजार शेतकर्यांना होणार असल्याचा महावितरणाचा दावा आहे.
केंद्र सरकारने इंधनाला पर्याय म्हणून वीजेवर धावणार्या वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. राज्य सरकारने अलिकडेच काही इलेक्ट्रिकल वाहने घेतली आहेत. अशा वाहनांसाठी महावितरणने राज्यात 500 विद्युत चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 50 विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचेही उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!