दुध व्यवसायाने दिला जगण्याचा आधार

0

औरंगाबाद
मराठवाड्यात नेहमीच दुष्काळी परिस्थिती असताना काही लोक कोणाच्याही अमिषाला बळी न पडता स्वःकर्तृत्वाने शुन्यातून विश्‍व निर्माण कसे करतात याचे उदाहरण म्हणजे कबनसांगवीचे पशुपालक श्रीदेवी झेंडेवाले होय.आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून मोलमजुरी करुन कोरडवाहू 30 गुंठे शेती करत या शेतीला आधार म्हणून पशुधनाच्या सहाय्याने दुध उत्पादनातून सन्मानाने जगण्यापुरती कमाई कबनसांगवी येथील झेंडेवाले दांपत्य करत आहे.

कबनसांगवी ता. चाकूर येथील पशुपालक परमेश्‍वर झेंडेवाले यांचे 5 सदस्यांचे कुटुंब असून ते केवळ 9 वीपर्यंत शिकलेले आहेत. बहिणीसह 6 भाऊ व आई वडील यांच्यात केवळ 4 एकर जमीन समप्रमाणात जमीन विभागून केवळ 30 गुंठे प्रत्येकाच्या हिस्स्याला येते. या 30 गुंठे जमिनीत कोणती शेती करावी? या विवंचनेत न राहता दोघा पतीपत्नींनी लागेल ती मोल मजूरी करुन उदरनिर्वाह भागवित एका म्हशीपासून दुध व्यवसाय सुरु केला. पत्नीसह दोन मुलांना सोबत घेऊन कर्जाने पैसे घेऊन एका म्हशीपासून आज 8 म्हशी व 12 वासरे असे एकूण 20 पशुधनाचा सांभाळ ते करत वाढवात आहेत. आज रोजी त्यांच्याकडे 8 पैकी एक मुरा, एक नागपुरी, 6 गावरान म्हशी आहेत तर 12 वासरांपैकी 6 वगार, 6 रेडक आहेत.

2015 मध्ये मोलमजुरी करुन जमवलेली जमापुंजी 25 हजार रुपये, एस. के. मायक्रो फायनान्स उदगीर यांच्याकडून 15 हजार व वाया मायक्रो फायनान्स चाकूर यांच्याकडून 20 हजार रुपये असे एकूण 60 हजार रुपये गुंतवणूक केली. मुरा जातीची म्हैस घेतली. त्या म्हशीच्या दुधावर व मजूरी करुन दोन्ही फायनान्सच्या पैशांची परतफेड केली. वर्षातून दोनवेळा चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा. लि.तर्फे पाक्षिक हप्त्यावर द. सा. द.से. 25 टक्के व्याज दराने कर्ज घेऊन हा व्यवसाय चालवत आहेत. यातून दररोज 8 पैकी 5 म्हशी दुभत्या आहेत तर 3 गाभन आहेत. दोन वेळेचे 35 लिटर दुध 50 रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. त्याचे 1750 रुपये प्रमाणे महिन्याकाठी 52 हजार 500 रुपयेचे उत्पादन होते. त्यांपैकी एवढ्या जनावरांना जवळपास 26 हजार रुपयांची चंदी लागते तर 26 हजारांच्या उत्पादनात एवढ्या जनावरांचा चारा, दवाखाना यावर खर्च करून राहिलेली शिल्लक या 5 व्यक्तीच्या कुटुंबाला मिळते. विकत घेतलेल्या चार्‍यात ऊसवाडे, गवताबरोबर सोयाबीन, तूर यांचे गुळी, ज्वारी, मकांचा कडबा यांचा समावेश असतो.

हक्काचे घर नाही, म्हणावे तसे उत्पादनाचे साधन नाही कौटुंबिक पाठबळ नाही मग करायचे तरी काय ? या प्रश्‍नाला परमेश्‍वर झेंडेवाले यांचा हा शुन्यातून उभा केलेल्या दुग्धव्यवसाय हे उत्तम उत्तर आहे. अशा छोट्या छोट्या व्यवसायीकांना शासनाने आधार द्यायला हवा. कारण गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही. अशांसाठी सरकारने कर्ज उपलब्ध करून द्यावे.परंतु सरकारी किंवा सरकारच्या अधिपत्याखालील बँका व्यवहार आणि सुरक्षेसाठी तुमच्याकडे धनसंपत्ती नाही म्हणून कर्ज नाकारतात. नाविलाजाने ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूरांना मायक्रो फायनान्सकडे वळावे लागत आहे. हे विशेष.
————-
सरकारी योजनांचा फायदा मिळत नाही
पशुपालक व दुग्धव्यवसाय करण्यासाठी सरकारी योजना भरपूर असतील, पण आमच्यासाठी त्या दुरापास्त आहेत. कारण आमच्याकडे मोठा वशिला किंवा शेती सारखी स्थावर मालमत्ता नाही. पण स्वतः च्या हिंमतीवर एवढा जुगाड जमवल्याचा व त्याबद्दल आंबेवाडी येथे नवरात्र महोत्सवात उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनिल भिकाने साहेबांच्या हस्ते संकल्प तरुण मंडळाने केलेला सत्काराचा आनंद आहे.

-पशुपालक परमेश्‍वर झेंडेवाले.

स्वतः चा व्यवसाय असल्याचा आनंद
एवढ्या मोठ्या कुटुंबात असताना आमचे सासरे मन्मथाप्पा झेंडेवाले हे सुद्धा दुधाचा व्यवसाय करीत होते. आम्ही त्यांच्यापासून वेगळी चुल मांडल्यावर जवळ काहीच नसताना मोलमजुरी करुन व कर्ज काढून या पशुपालन व दुग्धव्यवसायाच्या निमित्ताने स्वतः चे अस्तित्व निर्माण केले. आज मुला बाळांना शिकवत संसाराचा गाडा हाकत उभा केलेला व्यवसाय स्वतः चा असल्याबद्दल अभिमान वाटतो.

-श्रीदेवी झेंडेवाले.
गृहिणी कबनसांगवी, ता. चाकूर

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.