50 गुंठ्यांत 7 लाखांचे उत्पादन
रुग्णांना तपासून त्यांच्यावर उपचार करणे हा मुख्य व्यवसाय असणारे चाकूर तालुक्यातील मौजे कुंभेवाडी येथील डॉ. कपिल गुर्ले हे औषध शास्त्रात उच्च शिक्षण घेत आहेत. पण नुसते त्यावरच समाधान न राहता आई मंगलबाई, भाऊ किरण गुर्ले यांच्या मदतीने घरी असणार्या शेतीत स्वतः चे कमी जागेत तीन शेतीपूरक व्यवसाय उभारुन अगदी सहज पध्दतीने यशस्वी करीत आहेत. बंदिस्त शेळीपालन त्यासोबत गावरान कोंबडी पालन व नव्याने सुरुवात केलेला अवघ्या 50 गुंठ्यांत तुतीची लागवड करुन रेशीम उद्योग सुरु केला आहे. जो की, इतर पारंपारीक पिकांपेक्षा हमखास फायदेशीर ठरतो.

अशी केली तुतीची लागवडः
अगोदर तुतीच्या एकरी 6 हजार बेन्याची लागवड केली. ज्याचे 18 हजार डोळे फुटून भरपूर पाला देण्यासाठी मदत झाली. हा पाला 4 महिन्यात म्हणजे 120 दिवसात उपलब्ध होतो. दुसर्या वेळी तोच पाला 45 दिवसात तयार मिळतो. तोपर्यंत रेशीम आळ्यांची जोपासना करण्यासाठी शेड व रँकची उभारणी करून घेतली. 2 लाखांचे 45 बाय 30 फुट शेड उभारणी केली. त्यामध्ये दोन रांगेत 5 बाय 35 फुट लांबीचे 5 रँक याप्रमाणे 10 रँक तयार केले आहेत. तर 50 गुंठ्यातील तुतीच्या सहाय्याने त्यामध्ये 2 गटात उत्पादन घेता येते. म्हणजे 25 गुंठे प्रति बॅच. त्यानंतर मजूरी, औषधोपचार आणि अंडी याचा प्रत्येक बॅचसाठी 10 हजार रुपये खर्च येतो. या खर्चात 200 अंडी येतात आणि प्रत्येक अंड्यात रेशीम देणार्या 600 अळ्या असतात. त्याप्रमाणे 1 लाख 20 हजार अळ्या रेशीम निर्मिती करतात. शेडचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी प्रति बॅच1 हजार रुपयांचे फोर्मेलिन स्प्रे, ब्लिचिंग पावडर, विजेता पावडर व चुना असे साहित्य लागते. शेड निर्जंतुकीकरण करणे, संसर्गजन्य रोग प्रतिबंध करणे आणि जमिनीची आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी सदर साहित्य उपयोगात आणले जाते. प्रत्येक बॅचचा फक्त 26 दिवसांचा कालावधी लागतो. या काळात वेळेला महत्त्व देऊन नियोजनाप्रमाणे काम केले तर 90 टक्के नुकसान होत नाही. तसेच एका वर्षांत 200 अंड्यांच्या 8 बॅच घेता येते. रेशीम कोषाला बाजारभाव 300 ते 700 रुपये प्रति किलो येतो तर सरासरी 500 प्रती किलो भाव मिळतो. वर्षाकाठी 5 ते 7 लाखाचे उत्पादन घेता येते. 8 बॅचचे 80 हजार वजा जाता 4 ते 6 लाखाचे उत्पादन केवळ 50 गुंठ्यातील हे आश्चर्याचा धक्का देणारेच आहे. पहिली बॅच 150 अंडी आणले होते. 90 हजार अळ्यांपासून 26 दिवसात 1 क्विंटल 37 किलो कोष मिळाले. त्याला सरासरी 530 रुपये प्रती किलो भाव मिळाला. ज्याचे एकूण 67 हजार रुपये मिळाले. येत्या तीन-चार दिवसांत दुसरी 200 अंड्याची बॅच निघेल. माल 2 क्विंटल आणि सरासरी 1 लाख रुपये मिळतील. तयार माल शासनाकडून 300 रुपये प्रति किलो या हमीभाव दराने खरेदी केला जातो तर खुल्या बाजारात याची किंमत 500 ते 700 रुपये प्रति किलो आहे. एक वर्षात आत्तापर्यंत चार वेळच्या उत्पादनातून 2 लाख 30 हजारांचे उत्पादन घेतले आहे. या उद्योगासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाते. त्याचा ही उपयोग करून घेता येतो.
माझा आरोग्य विभागाशी निगडीत व्यवसाय असला तरी वडिलांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. सतत नवीन प्रयोगशील पिकांचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भाजीपाला, पपई, कांदा, बटाटे याबरोबरच सोयाबीन, ज्वारी, तूर गव्हु यासारखे पिके ते घेतात. त्यांचाच आदर्श घेऊन मी सुरुवातीला 15 बंदिस्त शेळी पालन दोन वर्षांपूर्वी सुरु केले. ते 50 शेळ्यापर्यंत पोहचले आहे. त्यानंतर त्याला पुरक गावरान कोंबडी पालन सुरु केले. आज 150 कोंबड्यापासून सुरु केलेले कोंबडी पालन आज 450 कोंबड्यांचे झाले आहे. रेशीम कोष उद्योग हा शेळ्या आणि कोंबडी पालन व्यवसायाच्या तुलनेत कमी नुकसान देणारा व्यवसाय आहे.
– डॉ. कपिल गुर्ले,
रेशीम उद्योगाला शासनाकडूनही प्राधान्य दिले जाते, कारण या व्यवसायात शेतकर्यांबरोबर मजूरांचेही हित लक्षात घेऊन दोन प्रकारे ही योजना राबवली जाते. वैयक्तिक पातळीवर एकरी 1 लाखाचे अनुदान दिले जाते यामध्ये सर्व कामे स्वतः त्या शेतकर्यांनी केले जातात तर दुसरा प्रकार हा सामुहिक असून 22 शेतकर्यांचा एक गट स्थापन करून प्रत्येकी 2 लाख 97 हजार रुपये अनुदान दिले जाते. शेड बांधकाम करण्यासाठी 97 हजार तर उर्वरित रक्कम रोजगार हमी योजने अंतर्गत दरमहा 6 हजार मजूरदारांच्या नावे दिली जाते. तयार मालाची खरेदी शासनाकडून 300 रुपये प्रति किलोने केली जाते.
-राहूल दुवे
