द्राक्ष उत्पादकांना लाभ
औरंगाबाद
नाशिकच्या विनियार्ड्समध्ये छाटणी हंगाम सुरू होण्यापूर्वी द्राक्ष दाखल होत आहेत. गंगापूर गावातील सुला विनियाड्समध्येही द्राक्ष येण्यास सुरुवात झाली आहे. द्राक्ष पिकताना त्याचा रंग बदलण्याची अत्यंत महत्वाची क्रिया या कालावधीत घडते. त्यास फ्रेंच भाषेत व्हेरिसन, असे संबोधले जाते. द्राक्षांचा घड नैसर्गिकरित्या गोड होत जातो. छाटणीचा हंगाम सुरू होण्याचे हे प्रतीक असल्याने द्राक्ष रंग बदलत असल्याने जिल्हाभरातील द्राक्ष उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष काढणीचा हंगाम जोरदार ठरणार आहे. त्यामुळे वाईनरीजमध्येही उत्साह आहे. देशातील सर्वात मोठी वाईनरी असलेल्या सुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्के अधिक प्रमाणात द्राक्षावर प्रक्रिया केली जाणार आहे. यंदाच्या हंगामात 12 ते 13 हजार टन द्राक्षांवर प्रक्रिया केली जाणार असून, यातून तयार झालेली वाईन जगभरातील वाईन प्रेमींना चाखायला मिळणार आहे. 2017 च्या तुलनेत यावर्षी द्राक्ष लागवड 400 एकरने वाढवली असल्याची माहिती सुलाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे, करण वसानी यांनी दिली.
शेतकर्यांनी लागवड वाढवली तर मोठ्या संख्येने द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता यंदा डिसेंबर अखेरपासून शेतकर्यांनी जोमाने द्राक्ष छाटणी करण्याची तयारी केली आहे. नाशिकप्रमाणे इतर ठिकाणीही वाईन द्राक्ष उत्पन्न घेतल्यास शेतकर्यांची आर्थिक भरभराट होऊ शकेल.
चौकट
द्राक्ष उत्पादकांमध्ये उत्साह
या वर्षी वाईन द्राक्ष उत्पादक उत्साहात आहेत. यावर्षी द्राक्षांच्या घडांचा आकार लहान असून ही चांगली बाब आहे. वाईनसाठीच्या द्राक्षांची गुणवत्ता लहान घडांच्या आधारे ठरविली जाते. उत्पादनही जोरदार अपेक्षित आहे. सुला येथील आम्हा शेतकर्यांना खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्यासाठी वाईन कंपनीतर्फे मार्गदर्शन केले जात आहे. 2003 पर्यंत मी भाजीपाला पिकवत होतो. त्यात फारसे उत्पन्न मिळत नव्हते. पण मी करार शेतीच्या माध्यमातून वाईन द्राक्षांची लागवड केली असून वाईनरी कंपनींकडून चांगले उत्पन्न मिळत आहे.
– लक्ष्मण जाधव,
द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव