पॉवर टिलर – एक बहुपयोगी संयंत्र

0

पॉवर टिलर प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी काही बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. उदा:- भूधारकता, जमिनीचा प्रकार, कामाचे स्वरूप, आर्थिक ऐपत, भाड्याने देण्यासाठी काम मिळण्याची अपेक्षा, पॉवर टिलर वापरण्याची सुलभता, दुरुस्तीसाठी गॅरेजची सोय, सुट्या भागांची उपलब्धता व त्यांची किंमत इत्यादी.

पॉवर टिलर खरेदी करतांना शेतकऱ्यांना रोटाव्हेटर हे एक अत्यावश्यक अवजार पुरविले जाते. पॉवर टिलरच्या रोटाव्हेटरला १८ ते २० पाते असतात. हि पाती २५० ते ३०० फेरे प्रति मिनिट गोलाकार गतीने फिरत असतात. त्यामुळे पॉवर टिलरचा रोटाव्हेटर पेरणीपूर्व मशागत, भातशेतीतील चिखलणी व फळबागांतील आंतरमशागतीची कामे प्रभावीरीत्या करू शकतो. पॉवर टिलरच्या रोटाव्हेटरने आपण १० ते १५ से.मी खोलीपर्यंतचे तण समूळ नष्ट करू शकतो. पॉवर टिलरचे लहान आकारमान आणि कमी उंचीमुळे रोटाव्हेटरने फळझाडांच्या बुंध्यापर्यंतचे तण काढणे शक्य होते. पॉवर टिलर रोटाव्हेटर गतिमान अश्या पात्यांच्या सहाय्याने आंतरमशागतीची कामे करतो. त्यामुळे कमी अश्वशक्तीत संपूर्ण जमिनीची मशागत होते. पर्यायाने इंधनाची आणि पैशांचीही बचत होते. पॉवर टिलरच्या  रोटाव्हेटरने पेरणीपूर्व मशागत प्रभावीरीत्या केली जाते. एकाच वेळी नांगरणी आणि कुळवणीचे काम पॉवर टिलरचा रोटाव्हेटर करतो. पॉवर टिलरच्या रोटाव्हेटरच्या सहाय्याने पट्टा पद्धतीने पेरलेल्या उसाच्या सर्व आंतरमशागती करता येतात. तण काढणे, भर देणे, मोठी खांदणी करणे यासारखी कामेही सहज करता येतात.

पॉवर टिलरचे उपयोग :-

मशागत :- पॉवर टिलरला रोटाव्हेटर जोडून जमीन भुसभुशीत करण्याचे काम करता येते. एकाचवेळी नांगरणी आणि ढेकळे फोडणे ही दोन्ही कामे होतात, त्यामुळे ढेकळे फोडण्यासाठी जमिनीला स्वतंत्रपणे कुळवाच्या पाळ्या घालण्याची आवश्‍यकता राहत नाही. भातशेतीमध्ये रोटाव्हेटरच्या साह्याने चिखलणीचे काम सुलभरीत्या व प्रभावीपणे करता येते. 

पेरणी :- पेरणीसाठी पॉवर टिलर चलित टोकण यंत्र कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले आहे. या यंत्राने भुईमूग, सोयाबीन, सुर्यफुल, तूर, मका, करडी ज्वारी, गहू, हरभरा इ. महत्वाच्या पिकांची पेरणी करता येते. या टोकण यंत्राच्या सहाय्याने वरखतांची मात्रा देखील प्रमाणात देता येते. वनशेतीमध्ये झाडे लावण्यासाठी तसेच फळझाडांच्या लावणीसाठी खड्डे घेण्याचे काम पॉवर टिलरने करता येते. हे खड्डे खोदण्याचे यंत्र पॉवर टिलरच्या पुढील बाजूस जोडता येते. या यंत्राद्वारे ३० सें.मी. व्यासाचे व ४५ सें.मी. खोलीचे खड्डे खोदता येतात. 

आंतरमशागत :- फळबागांमध्ये आंतरमशागत करतेवेळी दहा ते 15 सें.मी. खोलीपर्यंत तण समूळ काढले जाते. 95 टक्के क्षेत्रातील तणनिर्मूलन करता येते; तसेच फळझाडांच्या खालून व्यवस्थितपणे काम करता येत असल्याने झाडांच्या फांद्या मोडत नाहीत. फळझाडाभोवती रोटाव्हेटरला पॉवर टिलर उलट्या दिशेने चालवून आळे तयार करण्यासाठी कमी कष्टात, कमी खर्चात व कमी वेळेत वापर करता येतो. फळबागांमध्ये, तसेच वनशेतीमध्ये आंतरमशागतीसाठी पाच दातांचा कल्टिव्हेटर उपलब्ध आहे. कल्टिव्हेटरच्या साह्याने 15 सें.मी. खोलीपर्यंत मशागतीची खोली कमी-जास्त करता येते. एका दिवसात 1 ते 1.25 हेक्‍टर क्षेत्रावर आंतरमशागत शक्‍य होते.

फवारणी :- फळबागांमध्ये योग्य वेळी व योग्य त्या प्रमाणात कीड व रोग नाशकांची फवारणी करणे आवश्यक असते. फवारणी वेळेवर न झाल्यास किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होऊ शकते. त्यासाठी पॉवर टिलरचलित फवारणी यंत्र विकसित केले गेलेले आहे. या फवारणी यंत्राच्या सहाय्याने एका दिवसात ३ ते ४ हेक्टर क्षेत्रावर प्रभावीरीत्या फवारणी करता येते. फवारणीचा खर्चही निम्म्यापेक्षा कमी येतो. या फवारणीचे वैशिष्ट्य म्हणजे संत्रा, मोसंबी, डाळिंब, त्याचप्रमाणे द्राक्ष बागेत अतिशय प्रभावीरीत्या फवारणी करता येते.

पीक कापणी :- या यंत्राच्या सहाय्याने गहू आणि भात या पिकांची कापणी योग्य रीतीने केली जाते. कापलेले पीक एका सरळ रेषेत यंत्राच्या उजव्या बाजूला अंथरले जाते. अंथरलेल्या पिकांच्या मजुरांकरवी पेंढ्या बांधण्याचे काम सुलभ होऊ शकते. या कापणी यंत्राच्या सहाय्याने एका दिवसात ३ ते ४ एकर क्षेत्रावरच्या पिकाची कापणी करता येते.

मळणी :- पॉवर टिलरच्या गती चक्राच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचे मळणी यंत्र आपण चालवू शकतो. पॉवर टिलरच्या मागील बाजूस जोडून भात मळणीयंत्र वापरता येते. हे मळणीयंत्र हवे त्या ठिकाणी नेण्यासाठी यंत्रास दोन रबरी चाके लावलेली असतात. पॉवर टिलरचलित मळणी यंत्राची क्षमता ताशी ६ क्विंटल असते. मळणी यंत्राशिवाय पॉवर टिलरचा वापर पाणी उपसण्याचा पंप, कडबा कटर, पिठाची गिरणी, गवत कापण्याचे यंत्र, जनरेटर हि संयंत्रे चालविण्यासाठी सुद्धा आपण करू शकतो.

माल वाहतूक :- पॉवर टिलरच्या ट्रॉलीने दीड ते दोन टन वजनाचा माल सहजरीत्या वाहून नेता येतो. शेतकरी बांधव या ट्रॉलीचा उपयोग फळे, भाजीपाला, बी-बियाणे, किड व रोग नाशके आणि खते इ. शेतीमालाच्या वाहतुकीसाठी करू शकतात. पारंपारिक बैलगाडीपेक्षा जवळजवळ दुप्पट मालाची किफायतशीर वाहतूक पॉवर टिलरच्या ट्रॉलीने करता येते. या ट्रॉलीने कच्च्या आणि डांबरी रस्त्यावरून ताशी १० ते १२ किलोमीटर वेगाने वाहतूक करता येते.

वाहन परवान्याची आवश्यकता नाही :- पॉवर टिलरचे एक प्रमुख वैशिष्ट्य असे, की पॉवर टिलर चालविण्यासाठी चालकाला वाहतुकीच्या परवान्याची ( ड्रायव्हिंग लायसेन्स ) आवश्यकता नाही. पॉवर टिलरला आर.टि.ओ कार्यालयात नोंदणी करण्याची , रोड टॅक्स भरण्याची गरज नाही.

पॉवर टिलर वापरतांना…..

पॉवर टिलरसोबत काम करीत असताना अंगावर सैल कपडे वापरू नयेत, तोंडावर व डोक्‍यावर चांगल्या कपड्याने गुंडाळून घ्यावे. पॉवर टिलरमुळे आंतरमशागतीची कामे वेळेत पूर्ण होतात. लहान शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर अत्यंत उपयुक्त आहे.

  • पॉवर टिलर विकत घेतल्यानंतर सोबत मिळणारी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून सर्व भागांची व प्रणालींची माहिती करून घ्यावी. पॉवर टिलर शेतात वापरण्यापूर्वी मशिनचे काही भाग ढिले झाले असतील, तर ते घट्ट आवळावेत, तसेच झिजलेले, तुटलेले भाग बदलावेत.
  • पॉवर टिलर चालविण्यापूर्वी सर्व शील्ड व गार्ड नीटपणे बसविल्याची खात्री करावी. शेतात वापरापूर्वी पॉवर टिलरच्या टाकीमध्ये इंधन भरावे, म्हणजेच इंजिन थंड असतानाच इंधन भरावे.
  • पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू अवस्थेत आहे, याची खात्री करूनच चालू करावा म्हणजे अपघात होणार नाही.
  • पॉवर टिलरसोबत काम करीत असताना अंगावर सैल कपडे वापरू नयेत, तोंडावर व डोक्‍यावर चांगल्या कपड्याने गुंडाळून घ्यावे.
  • पॉवर टिलर चालविताना फिरणाऱ्या भागांपासून हात व पाय यांचा बचाव करावा. विशेषतः रोटाव्हेटर जोडला असताना पाय रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यांमध्ये अडकणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  • जमीन ओली असेल, तर पॉवर टिलर चालवू नये.
  • काम करीत असताना मध्येच अडथळा आल्यास पॉवर टिलर त्वरित बंद करावा. पॉवर टिलर चालू स्थितीत ठेवून सोडून जाऊ नये. पॉवर टिलर वळविताना किंवा वाहतूक करताना ट्रान्समिशनमुक्त करावे.

पॉवर टिलरचे व्यवस्थापन

१) इंजिन व एअर क्‍लिनरमधील तेलाची पातळी तपासावी, ती कमी असल्यास बरोबर करून घ्यावी. 
२) इंजिन फाउंडेशन व चॅसिस नट-बोल्ट घट्ट बसवावेत. तसेच चाकाचे व दातांचे नट बोल्ट ढिले झाले असल्यास ते घट्ट बसवावेत. 
३) चाकामधील हवेचा दाब तपासावा. प्रामाणिक दाबा इतकी चाकामध्ये हवा भरावी. 
४) पॉवर लिटरच्या व्ही बेल्टचा ताण तपासून घ्यावा. बेल्टच्या मध्यभागी दाबल्यानंतर 12 मि.मी. पेक्षा जास्त दाबला जाणार नाही, अशा प्रकारे बेल्ट घट्ट करावा. 
५) गिअर बॉक्‍स, रोटरी चेनमधील तेलाची पातळी तपासावी, तसेच नियमितपणे शिफारशीनुसार ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर आणि इंजिन ऑइल बदलावे. 
६) इंजिनमध्ये थंडीच्या दिवसांत एस.ए.ई. 30 व उन्हाळ्यात एस.ए.ई. 40 प्रतीचे वंगण तेल वापरावे. 
७) गिअर बॉक्‍समध्ये एस.ए.ई. 90 प्रतीचे तेल वापरावे. हे तेल 150 तासांनंतर बदलावे. 
८) वेळोवेळी क्‍लच-शाफ्ट, क्‍लच रॉड, टेलव्हिल बुश, ऍक्‍सिलेटर केबल यांना तेल द्यावे. 
९) रोटाव्हेटर शाफ्टच्या ग्रीस कपमधील ग्रीस दर 25 तासांच्या कामानंतर बदलावा.महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.Leave A Reply

Your email address will not be published.