महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायाला लागले ग्रहण….अश्या अनेक बाबी कुक्कुटपालन व्यवसायाशी संबंधित निदर्शनास आल्या आहेत कि ज्या सिद्ध करीत आहेत कि महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आलेला आहे. चला तर मग आढावा घेवू अश्या काही महत्वाच्या बाबींचा-
पोल्ट्री व्यवसायावर खाद्याचे संकट :- निरंतर सहा महिन्यापासून व्यवसाय तोट्यात चालत असल्याने व आता पुढे येणारा श्रावण महिना त्यात भर टाकणार असल्याने,खाद्यापुरतेही पैसै मिळत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अंडी उत्पादन थांबवून पक्षी विक्रीचे सत्र सुरू केले आहे. पॅनिक सेलिंगमुळे अंड्याचे बाजारभाव दररोज तळाला जात आहेत.
पक्ष्यांच्या विक्रीकडे वाढला कल :-90 आठवड्यापर्यंत अंडी देणाऱ्या पक्ष्यांची उपासमार टाळण्यासाठी 50 आठवड्यांत अंडी उत्पादन थांबवून तो विक्रीला ( कल्स) काढण्याची वेळ प्रथमच आली आहे. नवापूर वगळता 2006 च्या बर्ड फ्लूमध्येही अशी मजबुरी लेअर पोल्ट्रीधारकांवर आली नव्हती.
कमी भावात विक्री :- सोमवारी (ता.22) रोजी पुणे, नाशिक विभागात लेअर ‘कल्स’चे दर 50 रु. प्रतिकिलोपर्यंत खाली आले. 300 रु. खर्चून तयार केलेला दीड किलोचा पक्षी 75 रुपयात विक्री करावा लागत आहे.नाशिक विभागात रविवारी (ता.22) पोल्ट्री फार्मवरील प्रतिनग अंडी लिफ्टिंग – म्हणजेच फार्म गेट विक्री – रेट्स 2.80 पैसे नीचांकावर पोचला असून, 4 रूपये उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रतिदिन 1.20 पैसे तोटा एक अंड्यामागे होत आहे. पुढे श्रावणाच्या सावटामुळे बाजार आणखी खालावण्याची भीती आहे.
व्यवसाय गेला तोट्यात :- पाच हजार लेअर पक्षी क्षमतेच्या पोल्ट्रीधारकाला प्रतिदिन सुमारे सात हजार रूपये तोटा सहन करून व्यवसाय सुरू ठेवणे अशक्य झाले आहे. यामुळे अंड्यावरील पक्ष्यांचे उत्पादन थांबवून अकाली पक्षी विक्री ( कल्स लिक्विडेशन) करणे भाग पडत आहे.फेब्रुवारी 2019 पासून अंड्याच्या सरासरी उत्पादन खर्चापेक्षा सुमारे 25 टक्के तोटा सहन करू व्यवसाय सुरू ठेवणे आता अशक्य झाले आहे. सततच्या तोट्यामुळे होते नव्हते ते सर्व खेळते भांडवल आता पार आटले आहे. बॅंकेची सीसी संपलीच आहे पण घरातील सोने-नाणेही विकून झाले आहे.
सद्य परिस्थिती :-2016 ते 18 या दोन वर्षांत कच्च्या मालाचे भाव मंदीत कमी होते, तर अंड्यांना तुलनेने चांगले दर होते. यामुळे किफायती ठरलेल्या लेअर व्यवसायात प्रथमच नवे शेतकरी आले. मोठी गुंतवणूक वाढली. आणि 2019 मध्ये मात्र हे चक्र उलटे फिरलेय.
लक्षणीय खाद्य तुटवडा :- सांगली विभागात सोमवारी ( ता.22) मक्याचे दर उच्चांकी 2530 रु. प्रतिक्विंटलवर ट्रेड झाले. दुष्काळामुळे उत्पादन घटून मक्याचा बाजारभाव गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीवर पोचले आहेत. यामुळे लेअर खाद्याचे प्रतिकिलो भाव 15 ते 16 रुपयावरून 27 ते 28 रूपयावर पोचले आहेत. दरम्यान, याच वेळी अंड्यांचा पुरवठा वाढल्याने दुहेरी फास आवळला गेलाय.
कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे एक टन खाद्यामागे 12 हजार रूपये जास्तीचे खर्च होत आहेत. नेमका इथेच तोटा झाला आहे. प्रति अंडी 25 टक्के शॉर्ट मार्जिनची वेळ ओढावली. दरम्यान, कच्चा माल पुरवठादारांनीही यामुळे हात आखडता घेत रोखीशिवाय माल देणे नाकारले आहे.
लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे खरीप मका पीक संकटात आहे. येत्या दिवाळीनंतर महाराष्ट्रात नव्या मक्याच्या आवकेबाबत प्रश्नचिन्ह आहे. आधीच लेट पावसामुळे हंगाम लांबला असून, यामुळे मक्याच्या तुडवड्याची समस्या अधिक बिकट झाली आहे.
शासकीयमदतीच्याअपेक्षा:- राज्य व केंद्र शासनाकडून पुढील उपाययोजना अपेक्षित आहेत…
1. तेलंगणा
राज्याच्या धर्तीवर अनुदानित दरात मका, गहू उपलब्ध करून द्यावा.
2. अल्प व दीर्घ मुदत कर्जासाठी पुनर्गठण योजना अमलात आणावी.
3. केंद्र सरकारने कच्चा माल आयातीचा पुरेसा कोटा वाढवून द्यावा आणि तातडीने निर्णय अमलात आणावा.
4. दैनंदिन शालेय पोषण आहारात अंडयाचा समावेश करावा.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.