कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातोच, पण यात असलेले इतर गुण विविध आजारांवरसुद्धा गुणकारी ठरतात. कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. ही वनस्पती Liliaceae या कुळातील असून याचे उत्पत्ती स्थान आफ्रिका, अरबस्थान व भारतात आहे. कोरफड ही बहुवार्षिक वनस्पती आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रुपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. असून रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.
उपयोग :
कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टीकर, बलकर व विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी उपयोगी आहे. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यावर सुध्दा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुळे झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी आहे. सौंदर्यवृध्दीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात.
जमीन व हवामान :
कोरफडीच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. कोरफडीला उष्ण व कोरडे हवामान अनुकूल असते. कमी पाण्यावर वाढणारी ही वनस्पती असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात याची लागवड करता येते.
लागवड :
जमीन चांगली नांगरुन, वखरुन भुसभुशीत करावी. काडीकचरा वेचल्यानंतर हेक्टरी १० टन चागले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर जमीन सपाट करुन सरी-वरंबे पाडावेत. कोरफडीची लागवड फुटव्यापासूनच केली जाते. लागवड करतांना दोन ओळीत ६० सें. मी. व दोन झाडात ४५ सें.मी. अंतर ठेवावे. लागवड जुलै महिन्यात करावी.
पाणी व्यवस्थापन :
पावसाळ्यात व हिवाळ्यात कोरफडीस पाण्याची जास्त आवश्यकता नसते.
उन्हाळ्यात १५ दिवसातून एकवेळ पाणी द्यावे लागते.
आंतरमशागत :
वेळोवेळी निंदणी करुन वाफे तणरहीत करावे. बुंध्याजवळील माती भुसभुसशीत ठेवल्याने झाडाची वाढ चांगली होते.
रोग/किडी :
या झाडावर विशेष किडी व रोगाचा प्रार्दुभाव आढळून आलेला नाही. पानावरील काळे ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी ०.२५ टके डायथेन, एम-४५ व ०.१० टके कार्बेन्डाझीम यांचे मिश्रण ३-४ वेळा १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.
काढणी :
पानाचे टोक किंवा पानाचा रंग पिवळसर झाल्यावर साधारणतः कोरफड १४ ते १६ महिन्यांची झाल्यावर पाने ओषधोत्पादनांसाठी काढावीत. पाने काढतांना मुख्य झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणीपूर्वी झाडास पाणी दिल्यास पानातील पाण्याचे प्रमाण वाढते.
उत्पादन :
पिकाची चांगली काळजी घेतल्यास हेक्टरी १५ ते २० टन ओली पाने मिळतात. वर्षाला सुमारे दोन कापण्या गृहीत धरल्या तर एकूण उत्पादन हे हलक्या जमिनीत एकरी 15 टन, तर भारी जमिनीत ते 20 टन मिळते. एक कापणी ऑगस्टच्या दरम्यान, तर एक जानेवारीच्या दरम्यान केली जाते; मात्र मागणीनुसार त्यात बदलही केला जातो.
मिळकत व दर :
कोरफडीच्या पानांना रु 5000 प्रति टन म्हणजे किलोला रु 5 भाव मिळतो. जमिनीच्या प्रकारानुसार जे उत्पादन येते व जसा भाव व मागणी असते त्याप्रमाणे एकरी 40 हजार ते 60 हजार रुपये उत्पन्न हाती येते. या पिकासाठी सुरवातीचा खर्च सोडता निव्वळ रु 10,000 मशागत व अन्य खर्च होतो.
कमी मेहनत व कमी खर्चात उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याने इतर पिकांच्या तुलनेत कोरफड किफायतशीर ठरते. कोरफडीच्या पानांना उन्हाळ्यात जास्त म्हणजे रु 8 प्रति किलोपर्यंत भाव मिळू शकतो. पुणे- मुंबई भागात तो रु. 10 पर्यंतही मिळू शकतो.
कोरफडीपासुन रसनिर्मिती :
पीक हाती आल्यानंतर पहिल्यांदा अर्धा किलो ते एक किलो वजनाची पाने चाकूने कापली जातात. ती एकत्र करून पाण्यात स्वच्छ धुतली जातात. त्यातील पांढरा अनावश्यक भाग काढला जातो. गर व हिरवा भाग वेगळा होतो. यंत्राच्या/मिक्सरच्या साहाय्याने ज्यूस तयार केला जातो. तो ठराविक तापमानापर्यंत गरम केला जातो. त्यानंतर नैसर्गिकरीत्या थंड होऊ दिला जातो. त्यानंतर त्यावर “प्रिझर्व्हेशन’ प्रक्रिया (रस टिकण्याची प्रकिया) केली जाते. वजनानुसार बाटल्यांमध्ये ज्यूस पॅक केला जातो. कोरफडीच्या रसाला बाजारात भरपुर मागणी असुन बाजारामध्ये रु 500 प्रति किलो दराने विक्री होत आहे.