लातूर जिल्ह्यातील मौजे होसूर (ता. निलंगा) येथील दत्ता बगदुरे हे पिकांचे धाडसी प्रयोग करणारे शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चंदन लागवडीच्या प्रयोगाची कथा ऍग्रोवनमधून अलीकडील काळातच प्रसिद्ध झाली होती. चंदनाच्या लागवडीबरोबरच त्यांनी बांधावर आणखी एक प्रयोग केला आहे. तो म्हणजे मिलिया डुबिया या महाराष्ट्रासाठी नवीन असलेल्या वृक्षलागवडीचा. त्याचे अर्थशास्त्र वा बाजारपेठेचा अद्याप सखोल अभ्यास केला नसला, तरी भविष्यातील आर्थिक क्षमतेचा स्रोत म्हणून त्याकडे त्यांनी पाहिले आहे.
डॉ. टी. एस. मोटे :-
बगदुरे यांची एकूण शेती म्हणाल तर 27 एकर. त्यात पाच एकरांपर्यंत ऊस, सहा एकर डाळिंब, आवळा आदी पिके असतात. त्यांनी मिलिया डुबिया या वृक्षाची दोन हजार झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे ती ही लागवड बांधावर केलेली आहे. त्यांची वाढ सद्यःस्थिीतीत चांगली आहे. त्यामुळे हा वृक्ष महाराष्ट्रात लागवडीखाली येऊ शकतो, अशी आशा त्यांनी निर्माण केली आहे. औद्योगिक महत्त्व असलेल्या या वृक्षाबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फारशी माहीत नाही. प्लायवूड उद्योगासाठी कच्चा माल म्हणून या वृक्षाची लागवड दक्षिण भारतामध्ये केली जाते. कागदनिर्मिती, प्लायवूड निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या लाकडामुळे त्याचा ताण जंगलांवर पडत असतो. त्यामुळे मिलिया डुबियाच्या माध्यमातून प्लायवूड उद्योगाला व वन संरक्षणाला चांगला हातभार लागत आहे.
चंदनाबरोबरच शोध लागला :-
बगदुरे यांना चंदन लागवड करायची होती. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. माहिती जमा करत गेले. म्हैसूर (कर्नाटक) राज्यात चंदनाची माहिती घेता घेता तेथील एका मध्यस्थाने त्यांना मिलिया डुबिया या वृक्षाची माहिती दिली. म्हैसूरपासून सुमारे शंभर किलोमीटरवर एका भागात सलग 100 एकरांवरील मिलिया डुबियाची लागवड त्यांनी पाहिली. त्या वेळी वादळामुळे त्याची दोन झाडे पडली होती. मात्र त्यांनासुद्धा परिसरातील काही जण प्रतिझाड दहा हजार रुपये देण्यास तयार होते. हे पाहून बगदुरे यांचा उत्साह दुणावला.
त्याचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. अशा रीतीने हा वृक्ष त्यांनी आपल्या शेतात आणला. चंदनाची माहिती घेत घेत ते बंगलोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी या केंद्र सरकारच्या संस्थेमध्ये पोचले. या संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. आशितोष श्रीवास्तव यांनी त्यांना त्यासंबंधी पूरक माहिती दिली. त्यानंतर त्याची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लागवडीचे नियोजन :-
बकदुरे यांनी एका मध्यस्थाकरवी प्रतिरोप 30 रूपये याप्रमाणे 2500 रोपे आणली. वाहतूक खर्च त्यात समावेश होता. सलग पद्धतीने न करता बांधावर दोन रोपांमध्ये 10 फूट अंतर ठेवून लागवड केली. 2500 रोपांपैकी 500 रोपे वाहतुकीदरम्यान व त्या कालावधीनंतर मृत पावली. सध्या बांधावर 2000 या संख्येने डाळिंब बागेच्या चहू बाजूंनी ही झाडे लावलेली पाहण्यास मिळतात.
झाडे आता 12 महिन्यांची झाली आहेत. यातील काही झाडे 10 फूट उंचीची तर काही झाडे 17 ते 18 फूट उंचीची झाली आहेत. झाडाच्या उंचीमध्ये असलेल्या फरकाविषयी विचारले असता बगदुरे सांगतात की ज्या ठिकाणी काळी जमीन आहे व पाण्याची सोय आहे तेथे हे झाड चांगल्या प्रकारे वाढते. लागवडीवेळी शेणखत दिले तर वाढ आणखी जलद होते.
पाण्याची गरज :-
हा भाग जिरायती आहे. या भागात ही झाडे चांगल्या प्रकारे वाढत असल्याचे बगदुरे यांचे निरीक्षण आहे. रोपांच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत सहा महिन्यांपर्यंत पाण्याची गरज चांगली असते. त्यानंतर ती कमी होते. वर्षभरात झाडांना पाणी कमी दिले. तसेच खतही कमी दिले असे ते म्हणाले. उत्पन्नाविषयी भाष्य करताना ते म्हणाले, की प्लायवूड उद्योगासाठी या झाडाचे महत्त्व आहे असे मला समजले आहे. मात्र व्यापारी, बाजारपेठा याविषयी माहिती घेतलेली नाही, ती घेणार आहे. मात्र अगदीच या उद्योगासाठी जरी विक्री झाली नाही तरी जळणासाठी म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. सध्या जळण तीन रुपये प्रतिकिलो दराने घेतले जाते. एकरी झाडांची संख्या, मिळणारे उत्पादन या अंदाजाने तुमचे आर्थिक नुकसान होईल असे वाटत नाही.
मात्र शेतकऱ्यांनी या वृक्षाचा प्रयोग करण्यापूर्वी त्याचे अर्थशास्त्र, बाजारपेठ यांचा अभ्यास करावा.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.