जमीन :
आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ टन मिसळावे. पाणथळ, क्षारपड व चोपण जमीन निवडू नये. चुनखडीचे प्रमाण चार टक्यांपेक्षा जास्त असणारी जमीन अयोग्य समजावी. कारण अशा जमिनीमध्ये आले पिवळे पडून वाढ खुंटते. त्याकरिता जुन्या बंधाऱ्यातील गाळ जमिनीत मिसळावा.
अंतरमशागत :
- आल्याचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे सखोल पूर्वमशागत करणे गरजेचे असते. जमीन लोखंडी नांगराने ३०-४० से. मी. खोल उभी आडवी नांगरून घ्यावी.
- ३ – ४ कुळवाच्या पाळ्या देऊन माती भूशभुशीत करून घ्यावी. या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची आखणी निरनिराळ्या पद्धतीने केली जाते.
- हलक्या जमिनीत सपाट वाफे पध्दत, मध्यम व भारी जमिनीत सऱ्यावरंबे पध्दत वापरतात. जमिनीत हेक्टरी ४० गाड्यापर्यंत (२० टन) शेणखत टाकावे.
- महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत रुंद वरंब्याची पध्दत फायदेशीर ठरली आहे. सपाट वाफे 3 X 2 मीटर आकाराचे करतात.
- दोन वरंब्यात ६० से. मी. अंतर ठेवतात तर गादी वाफ्यावर लागवड करताना 3 X १ मीटर आकाराच्या १५-२० से.मी. उंच वाफ्यावर लागवड करतात.
लागवड कशी व केंव्हा करावी :
लागवड एप्रिल – मे महिन्यांत पूर्ण करावी. लागवडीसाठी माहीम, रिओ-डी-जानेरो, कालिकत इत्यादि जाती निवडाव्यात. लागवडीसाठी हेक्टरी १८ ते २० क्विंटल बेणे लागते. बेणे २५ते ४५ ग्रॅम वजनाचे असावे, डोळे फुगलेले असावेत. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे. यासाठी २० मि.लि. क्विनॉलफॉस (२५ ईसी) +१५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५०%डब्लू.पी.) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून यामध्ये बेणे २० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. लागवडीपूर्वी हेक्टरी दोन टन निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी.
लागवड करताना ९० सें.मी. रुंदीचे आणि २५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करून २२.५ X २२.५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. हेक्टरी १२० किलो नत्र तीन समान हप्त्यांमध्ये द्यावे. यासाठी पहिला हप्ता लागवडीनंतर दीड महिन्याने, त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता एक महिन्याच्या अंतराने द्यावा. लागवडीच्या वेळी स्फुरद ७५ किलो आणि पालाश ७५ किलो द्यावे. आवश्यकतेनुसार आंतरमशागत करावी. आले पिकाला ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन :
- गादी वाफे तयार करताना एकरी चांगले कुजलेले एक टन सेंद्रिय खत किंवा गांडूळखत, २०० किलो निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी. कच्चे शेणखत गादीवाफ्यावर अजिबात वापरू नये.
- माती परीक्षणानुसार प्रतिहेक्टरी १२० किलो नत्र,७५ किलो स्फुरद ७५ किलो पालाश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. माती परीक्षणानुसार लागवडीच्या वेळेस मातीत फेरस पाच किलो, झिंक चार किलो ही सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून द्यावीत.
- लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी भरणी करताना फेरस पाच किलो, झिंक चार किलो ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा उगवणीनंतर २ ते ३ समान हप्त्यांत विभागून द्यावी.
- माती परीक्षण अहवालानुसार विद्राव्य रासायनिक खताची मात्रा ठिबक सिंचन संचातून दिल्याने पिकाची वाढ चांगली होऊन खतांची बचत होते.
बेणे निवड :
- प्रदेशानुसार शेतकरी माहीम किंवा सातारी, वरदा, सुप्रभा, व्यानाड, रिओ-डी-जानेरो, जमैका, मारन, औरंगाबाद, उदयपुरी, छत्तीसगड, गोध्रा, हिमाचल या जातींची लागवड करतात. त्यानुसार आपल्या भागात चांगली वाढणारी जात निवडावी.
- ताज्या आल्याची विक्री करावयाची असल्यास माहीम किंवा सातारी, औरंगाबाद, छत्तीसगड, गोध्रा, उदयपुरी या अधिक तंतुमय व चवीला तिखट असणाऱ्या जाती निवडाव्यात.
- प्रक्रिया करावयाची असल्यास वरदा, सुप्रभा, वायनाड, रिओ-दि-जानिरो, जमैका, मारन यांसारख्या कमी तंतुमय जातींची लागवड करावी.
- लागवडीकरिता मागील वर्षी कंदकूज, कंदमाशीचा प्रादुर्भाव न झालेला क्षेत्रातील आले वेगळे काढून त्याचा बेणे म्हणून वापर करावा.
- बेणे म्हणून आले निवडताना पीक सुप्तावस्थेत असताना म्हणजेच साधारणतः १ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान पाने पूर्णपणे गळून गेलेली असताना व सुप्तावस्थेनंतर अंकुरण न झालेल्या क्षेत्रामधील आले निवडावे.
- एक एकर क्षेत्रासाठी १० ते १२ क्विंटल बियाणे लागवडी पूर्व एक महिना अगोदर साठवून ठेवलेले असावे.
कीड व रोग :
कीड
१) खोडमाशी:- ही माशी खोडावर उपद्रव करते. या माशीच्या नियंत्रणासाठी १०० मि. ली. कोणतेही कीटकनाशक १०० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
२) कंदमाशी:- या माशीच्या नियंत्रणासाठी १० दाणेदार फोरेट, हेक्टरी 20 किलो टाकतात.
३) उन्नी (हुमणी):- या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास जमिनीत आले लावताच १० टक्के बी. एच. सी. ५० किलो हेक्टरी प्रमाण खताबरोबर मिसळावी. तसेच बी. एच. सी. बरोबर ५०० किलो निम पेंड दिली तर कीड नियंत्रण होऊन पिकाला खतही मिळते.
रोग :
- नरम कूज:- जमिनीत पाण्याचा निचरा बरोबर न झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेंड्याकडून झाड वाळत जाते. बुंध्याच्या भाग सडल्यामुळे सहज उपटला जाऊ शकतो. त्यानंतर जमिनीतील गाठे सडण्यास सुरुवात होते.
उपाय :
- रोगट झाडे समूळ उपटून नष्ट करावी.
- लावणीपूर्वी व नंतर दर महिन्यास जमिनीवर व पिकावर ५:५:५० चे बोर्डोमिश्रण फवारावे.
- पिकाचा फेरपालट, उत्तम निचरा होणार्या जमिनीत लागवड अत्यावश्यक.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल