पेरू पिकाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक हाच आहे. पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे पेरूचे फळ सर्वांना प्रिय आहे. पेरूच्या फळामध्ये क जीवनसत्व तसेच खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या फळापासून जॅम, जेली, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात. पेरूचे झाड टणक असल्यामुळे शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी झाडाचा उपयोग होतो. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे पीक कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
ज्या भागात हिवाळ्यात थंडी अधिक असते तेथे पेरूची लागवड करता येते. कोरड्या आणि उष्ण हवामानात पेरूचे उत्पादन चांगले येते. पेरूच्या झाडाची ताण सहन करण्याची क्षमता जास्त असल्याकारणाने दुष्काळी भागातही पेरूची यशस्वी लागवड करता येते. लागवडीसाठी जमीनीची निवड करताना जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी तसेच हलकी व मध्यम काळी, ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 आहे, अशी जमीन लागवडीस योग्य आहे.
पेरूच्या अनेक सुधारती जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनऊ-49) ललित या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये सरदार (लखनऊ-49) ही जात अधिक उत्पादन आणि चांगल्या प्रतीची फळे देणारी आहे.
पेरूची अभिवृध्दी दाब कलम पध्दतीने करतात. पेरूच्या लागवडीसाठी जोमदार वाढीची आणि निरोगी कलमे निवडावीत. कलमाच्या लागवडीसाठी 3 द 3 द 3 फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डा भरताना यामध्ये जैविक खताचे मिश्रण तयार करून टाकावे. शेणखत किंवा गांडूळखत: 15 किलो प्रतीखड्डा, अझोटोबॅक्टर: 50 ग्रॅमप्रतीखड्डा, पी. एस. बी: 50 ग्रॅम प्रतीखड्डा, के. एम. बी: 50 ग्रॅम प्रतीखड्डा, ट्रायकोडर्मा: 50 ग्रॅम प्रतीखड्डा, निंबोळी पेंड: 50 ग्रॅम प्रतीखड्डा, फॉलीडॉल पावडर: 100 ग्रॅम वापरावे.
कलमांची लागवड कमी पावसाच्या भागात पावसाळ्याच्या सुरूवातीला आणि जास्त पावसाच्या भागात पाऊस संपल्यावर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये करावी. लागवड केल्यानंतर नवीन झाडाला काठीचा आधार द्यावा. कलमांना सुरुवातीला पाण्याचा ताण पडून देऊ नये.
पारंपारिक पेरू लागवड पध्दतीमध्ये 200 द 20 फूट अंतरावर लागवड केली जाते. लागवड केल्यानंतर चौथ्या वर्षानंतर उत्पादनास सुरूवात होते. फळांच्या काढणीनंतर छाटणी केली जात नाही. छाटणी करण्यामुळे बागांमध्ये फांद्यांची दाटी होते. यामुळे सूर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोहचत नाही. जमीन लवकर वापसा स्थितीमध्ये येत नाही. पारंपारिक पाणी व्यवस्थापनात झाडाभोवती गोल किंवा चौकोणी आळे तयार करून जास्त प्रमाणात पाणी दिले जाते. पाणी देण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर कमी असते. त्यामुळे बागेमध्ये ओलावा व आर्द्रता वाढल्यामुळे फळमाशीचे प्रमाण वाढते.
झाडांना शेणखत किंवा सेंद्रीय खताचा वापर कमी केल्यामुळे रासायनिक खतांचा वापर जास्त असल्याने जमिनीतील सामू-क्षारांचे प्रमाण वाढते. पांढरी मुळी जास्त वाढत नाही. परिणामी फळांचा आकार वाढत नाही. लवकर परिपक्व होऊन गळतात. यासाठी पेरूची लागवड सघन पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते. सघन पद्धतीने किंवा मिडो ऑर्चड पद्धतीने लागवड करणे फायद्याचे ठरते.
व्यवस्थापन:
एकूण नत्राच्या मात्रेपैकी 30 टक्के नत्र जुन-जुलै महिन्यात, 30 टक्के नत्र सप्टेंबर महिन्यात आणि उरलेला नत्र फेब्रुवारीत द्यावे. झाडाला फळे येण्यास सुरूवात झाल्यावर प्रत्येक झाडाला दरवर्षी 20 ते 30 किलो शेणखत मे महिन्याच्या शेवटी 375 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश द्यावे. उरलेला 375 ग्रॅम नत्र फळधारणा झाल्यानंतर देणे फायद्याचे आहे. पेरूला उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दर हिवाळ्यात 20 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. फळधारणा सुरू झाल्यानंतर बहार नियोजनानुसार पाणी व्यवस्थापन करावे.झाडांना पाण्याचा ताण देऊ नये. यामुळे फळगळ होते. बहाराच्या वेळी ठिबक सिंचन पध्दतीने दररोज 3-4 तास पाणी दिल्याने बहार चांगला येतो.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.