परसबाग कुक्कुटपालन योजना
महाराष्ट्र शासनाने लहान स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची अडचण लक्षात घेऊन परसातील कुक्कुटपालनास चालना देतील, अशा स्वरूपाच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करता येतो.
- एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमः-
ही योजना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येते, तसेच ही योजना सर्वसाधारण गटातील सर्व लाभार्थींकरिता उपलब्ध आहे. या योजनेत दोन पर्याय उपलब्ध आहेत.
या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थींना 50 टक्के अनुदानावर 8 ते 10 आठवडे वयाच्या तलंगाच्या 25 माद्या आणि तीन नर याप्रमाणे गटाचे वाटप करण्यात येते. तलंगाच्या एका गटाची (25 माद्या + 3 नर) एकूण किंमत 6000 रुपये मंजूर करण्यात आली आहे.
- तलंगाच्या एका गटाचा खर्चाचा तपशीलः-
पक्षी किंमत (25 माद्या + 3 नर)ः 3000 रुपये.
खाद्यावरील खर्चः 1400 रुपये.
वाहतूक खर्चः 150 रुपये.
औषधेः 50 रुपये.
रात्रीचा निवाराः 1000 रुपये.
खाद्याची भांडीः 400 रुपये.
एकूणः 6000 रुपये.
यापैकी 50 टक्के खर्च म्हणजेच 3000 रुपये मर्यादेत प्रति लाभार्थी एका गटाचा पुरवठा करण्यात येतो. उर्वरित 50 टक्के रक्कम म्हणजेच 3000 रुपये लाभधारकाने स्वतः उभारून त्यातून तलंगाच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी आदींवरील खर्च करणे अपेक्षित आहे.
ब) एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या पिलांचे गटवाटपः-
या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रवर्गांतील लाभार्थींना 50 टक्के अनुदानावर प्रति लाभार्थी एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या (आरआयआर, ब्लॅक स्ट्रॉलॉर्प, गिरिराज, वनराज, कडकनाथ व इतर शासनमान्य जातीचे पक्षी) 100 पिलांचे गटवाटप करण्यात येते. एका गटाची (100 एकदिवसी पिलांची) एकूण किंमत 16 हजार रुपये मंजूर करण्यात आली आहे.
- एका गटाच्या खर्चाचा तपशील –
एकदिवसीय 100 पिलांची किंमतः 2 हजार रुपये.
प्रत्येक गटाबरोबर द्यावयाचे खाद्यः 800 किलो. 12, 400 रुपये.
वाहतूक खर्चः 100 रुपये.
औषधेः 150 रुपये.
रात्रीचा निवाराः 1 हजार रुपये.
खाद्याची भांडीः 350 रुपये.
एकूणः 16 हजार रुपये.
यापैकी 50 टक्के अनुदानातून 8000 रुपये मर्यादेच्या प्रति लाभार्थी एकदिवसीय 100 पिले किंमत 2000 रुपये आणि खाद्य (6000 रूपये किमतीच्या मर्यादेत) पुरवठा करण्यात येतो.
उर्वरित 50 टक्के रक्कम म्हणजेच 8000 रुपये लाभाने स्वतः उभारून त्यातून एकदिवसीय 100 पिलांच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, उर्वरित खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी इत्यादींवरील खर्च करणे अपेक्षित आहे.
सदर योजनेचा लाभ कोणत्याही गटातील लाभार्थी घेऊ शकतील. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येतो. अंमलबजावणी अधिकार्याने योजनेस व्यापक प्रसिद्धी देऊन अर्ज मागविण्यात येतात.
योजनेचे अर्ज तालुका पशुसंवर्धन कार्यालयात, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालय व वेबसाईटवर उपलब्ध आहेत. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थी निवडण्याबाबत प्राधान्य देण्यात येते.
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक यांना प्राधान्य देण्यात येते.
ज्या जिल्ह्यात मध्यवर्ती अंडी ऊबवणी केंद्र किंवा सघन कुक्कुट विकास गट नाहीत, अशा ठिकाणी नजीकच्या मध्यवर्ती अंडी ऊबवणी केंद्र किंवा सघन कुक्कुट विकास गटाच्या कार्यान्ययन अधिकार्याची नेमणूक सदस्य म्हणून करण्यात येते. एका तलंगाच्या गटास प्रतिलाभार्थी अनुदानाची 50 टक्के रक्कम 3 हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
तलंग गट वाटपाचा खर्च गटाच्या निर्धारित किमतीपेक्षा जास्त झाल्यास सदरचा वाढीव खर्च लाभार्थ्याने स्वतः करणे अपेक्षित आहे.
एकदिवसीय पिले किंवा तलंगा गट वाटप करताना विशेषतः मरेक्स, राणीखेत आर. डी. आणि देवी रोगांवरील लसीकरण झाले आहे, याची दक्षता घ्यावी. या सुविधा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात.
एकदिवसीय 100 पिलांसाठी प्रति लाभार्थी अनुदानाची 50 टक्के रक्कम 8000 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
एकदिवसीय 100 पिलांचा गटाचा खर्च गटाच्या निर्धारित किमतीपेक्षा जास्त झाल्यास सदरचा वाढीव खर्च लाभार्थीने स्वतः करणे अपेक्षित आहे.
या योजनेमध्ये लाभ दिलेल्या लाभार्थ्याने दिलेल्या गटापासून मिळणार्या उत्पन्नाची नोंद ठेवावी.
पक्ष्यांचे अंड्यावर येण्याचे वय, त्यांच्यापासून मिळालेले एकूण व सरासरी अंडी उत्पादन इत्यादींबाबतच्या नोंदी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे ठेवाव्यात.
या योजनेअंतर्गत एकदा लाभार्थ्याची निवड झाल्यावर त्या लाभार्थ्याच्या या योजनेकरिता किमान पुढील पाच वर्षे पुनःश्च विचार करण्यात येत नाही.
https://krushisamrat.com/how-to-make-a-chicken-business/
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Very nice information.