आपणांस सर्व रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आता सर्वज्ञात झाले आहेत. अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पद्धतीचे हानिकारक परिणाम जाणवू लागल्या मुळे तसेच अधिक प्रमाणात अडथळे येत असल्यामुळे शेतकरी आता सेंद्रिय शेती कडे वळत आहे. कमीत कमी खर्चात मध्यम उत्पादन घेऊन आरोग्याला सुरक्षित असा माल अधिक दरात विकणे हे शेतकऱ्याला पटू लागले आहे.
सेंद्रिय शेती करत असताना शेतकऱ्यांना प्रमुख अडचणी येतात. ज्यात प्रामुख्याने येते ती म्हणजे पिक संरक्षणाची, कारण विषारी औषध मारूनही लवकर नियंत्रणात न येणारे रोग – किडीमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झालेली आहे. सेंद्रिय शेती केल्याने मुळातच पिकांवर रोग कीडी कमी प्रमाणात येतील. तसेच येणाऱ्या रोग किडींवर सेंद्रिय औषधांनीच नियंत्रणही मिळवता येईल. सेंद्रिय शेतीत पिक संरक्षणासाठी वनस्पतीजन्य आणि घरगुती औषधे वापरण्यात येतात. ती औषधे तसेच त्यांच्या वापराची पद्धत या लेखनातून मांडण्यात येत आहे. भरपूर अश्या अनेक औषधी पदार्थाच्या वापराचे प्रमाण अद्यापही ठरवलेले नाही ,त्यामुळे त्यांच्या वापरण्यासाठी त्यांचे प्रमाण बदलू शकते. या लेखात जी माहिती आहे ती खालील प्रमाणे :
तंबाखू :
- संपूर्ण विश्वात तंबाखूची लागवड आढळून येते. तंबाखूमध्ये “निकोटीन“ नावाचे अतिशय विषारी असते. हे पीक पाणथळ तसेच क्षाराच्या जमिनीत वाढते. पिक संरक्षणासाठी या वनस्पतीच्या पानाचा तसेच खोडाचा वापर करण्यात येतो. तंबाखूच्या शिरांत व खोडात निकोटीन जास्त असते. शेतीमध्ये पिकांवर कीटकनाशक, कोळीनाशक , बुरशीनाशक म्हणून या पिकांचा वापर होतो. तंबाखू हे पिकांमध्ये स्वर्त पोट आणि कस नव्य विष पसरविते. त्यामुळे याचा उपयोग सर्वसाधारण मावा, अळ्या, खोडकिडा, फुलकिडे, कोबीवरील अळी त्याचप्रमाणे गहू व भात यावरील तांबेरा या बुरशीजन्य रोगांवर करण्यात येतो. तंबाखूचा वापर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. तरी सर्वसाधारण खालील पद्धती वापराव्या.
- किलो तंबाखूची टाकाऊ पाने, काड्या १५-२० लिटर पाण्यात दिवसभर भिजत घालुन त्यात मुठभर साबणाचा चुरा मिसळावा. हे मिश्रण गाळून लगेच स्प्रे पंपाच्या सहाय्याने फवारावे.
- साधारण ४०० ग्रॅम तंबाखू, ६० ग्रॅम साबण, ८ लीटर पाणी घेऊन हे मिश्रण उकळेपर्यंत तापवावे. त्यानंतर वापरासाठी १ भाग मिश्रणात ४ भाग पाणी मिसळावे व पिकावर फवारावे. यात चुन्याचा वापर केल्यामुळे परिणामकारकता वाढते .
- विषाणूजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी तंबाखूची भुकटी मातीत मिसळता येते.
- प्रतिएकरी ७५ -१२५ किलो तंबाखूचे काड भात खाचाऱ्यात ५ से.मी खोलीवर भिजू घालावे.
- लिंबोरा :
- हे एक कडूनिंबासारखे बहुवर्षीय झाड आहे. आपल्याकडे अनेक ठिकाणी रस्त्याजवळ, बागेत हे झाड आढळते. या झाडाला पर्शियन लिलॅक असे म्हणतात. हे एक स्पर्शजन्य, पोटॅशियमयूक्त, किटकनाशक आहे. या झाडाच्या फळातील बियांचा उपयोग लष्कर अळ्या, तपकिरी तुडतुडे, मावा, लालकोळी, भाताची गादी माशी, गवती टोळ इत्यादींच्या नियंत्रणासाठी करतात. कीटकनाशक म्हणून पुढीलप्रमाणे वापर करता येतो.
- लिंबोऱ्याची ताजे पाने १५० ग्रॅम किंवा वाळलेली ५० ग्रॅम एक लिटर थंड पाण्यात भिजत ठेवावी. हे द्रावण गाळून पिकावर फवारावे.
- लिंबोऱ्याच्या बियांच्या अर्काची पाण्यातून १:१० या प्रमाणात फवारणी केल्याने लष्करी अळ्यांचे कोष मरतात व त्यांचे नियंत्रण होते.
- लिंबोऱ्याच्या पानाची भुकटी गहू धान्यात ४ – ७ % मिसळल्याने गव्हाचे किडीपासून साठवणीत संरक्षण होते.
लसूण :
नियमित आहारात असणाऱ्या व सर्वांच्या परिचयाचा असा हा लसूण कीटकनाशक, बुरशीनाशक, सुत्रकृमीनाशक, म्हणून वापरण्यात येऊ शकतो. लसणाच्या पाकळ्या कीटकनाशक म्हणून वापरतो. पिकावरील मावा, लष्कर अळ्या, पतंग, कोबीवरील अळ्याच्या नियंत्रणासाठी तसेच भुरी व तांबेरा च्या नियंत्रणासाठी यांचा वापर करता येतो. लसणाचा वापर पुढील प्रमाणे करावा.
- २०० ग्रॅम सोललेल्या लसूण पाकळ्या, १ लीटर पाणी, २० ग्रॅम साबण, ४ चमचे खनिज तेल इत्यादी साहित्य घ्यावे. लसूण बारीक वाटून २४ तासात खनिज तेलात भिजवावा. पाण्यात साबण विरघळावा त्यात लसूण खनिज तेलासह मिसळावा. हे मिश्रण गाळून घ्यावे. फवारणीसाठी २० पट पाण्यातून फवारावे.
- फळझाडांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी २ लसूण पाकळ्या वाटून ४ लिटर पाण्यात हा गोळा व २ चमचे मिरची भुकटी मिसळावी. त्यात थोडे साबण घालून हे मिश्रण फवारावे .
मिरची :
मिरचीच्या पक्व फळात विशेषतः सालीत बियांत कीटकनाशकाचे गुणधर्म आढळतात. या गुणधर्मचा वापर मुंग्या, मावा, अळ्या, काकडीवरील विषाणू, गोदामातील किडी, तांदळातील सोंडे तसेच तंबाखू, काकडीवरील विषाणू रोगासाठी करता येतो. याचा वापर पुढील प्रमाणे :
- पिकलेली मिरची बारीक वाटून त्यानंतर १ लिटर पाण्यात मिसळून जोराने ढवळतात. त्यानंतर कापडातून गाळून घेतात. साधारण १ भाग द्रावणात ५ भाग साबणाचे पाणी मिसळून पिकावर फवारतात.
- मिरचीचा अर्क, तंबाखू, काकडी, पिकावर फवारतात. त्यामुळे तंबाखूचा मोझॅक, बांगडी, ठिपक्याचा रोग, काकडीचा मोझॅक या रोगांना प्रतिबंध होतो.
कडूनिंब :
नैसर्गिक वनस्पतीजन्य कीटकनाशकांत कडूनिंबाचा समावेश नसणे म्हणजे अर्धवट लिखाण केल्यासारखे होईल. कीटकनाशकांचा वापर अमेरिकन बोंडअळ्या, मावा, तपकिरी तुडतुडे, चौकोनी ठिपक्यांचा पतंग, लष्करी अळ्या, हिरवे तुडतुडे, फुलपाखरू, फळ पोखरणाऱ्या अळ्या, गवती टोळ, फळ माशी इत्यादी साठवणीत किडींवर याचा उपयोग होऊ शकतो. कडूनिंब वापराच्या अनेक पद्धती आहेत. पाण्यातील अर्क, निंबोळी, तेल, बियांची भुकटी, निंबोळी पेंड, इत्यादींमार्फत औषधी वापर करता येतो .
- कडूनिंब पाण्यातील अर्क :
- ५ किलो वाळलेल्या बिया एकत्र करून पुरचुंडी बांधून बादलीभर पाण्यात रात्रभर पाण्यात भिजत घालावे. १२ तासांनी पुरचुंडी पिळावी. थोड्या पाण्यात १० ग्रॅम साबण चुरा विरघळावा पाणी घालून हे मिश्रण पिकावर फवारावे हरभरा, मका यासाठी हेक्टरी ५०० लिटर प्रमाणात घ्यावे.
- ४०० लिटर पाण्यात ५०० ग्रॅम कडूनिंबाच्या बियांची भुकटी मिसळावी व हे मिश्रण फवारावे.
- २ किलो निंबोळी, १५ लिटर पाणी यांचे मदतीने प्रथम निंबोळी पाण्यासह मिक्सरमध्ये बारीक कराव्या. रात्रभर भिजवावे. यासाठी थोडे पाणी वाढवावे. दुसऱ्या दिवशी कापडातून गाळून घ्यावे व फवारावे.
निंबोळी तेल :
निंबोळीच्या वाळलेल्या बिया घेऊन त्यावरील साल काढावी. आतील बी पुन्हा उखळीत टाकावे व त्याचा लागदा करावा. लगदा करताना त्यात थोडे पाणी घालाव्रे. हा गोळा एका परातीत तिंबावा, त्यामुळे पृष्ठभागावरील तेल दिसू लागेल. हे तेल हा लगदा हाताने दाबून काढावे. १ किलो बियांपासून १०० ते १५० मि.लि. तेल मिळते. तेल काढून उरलेला गोळा उकळत्या पाण्यात टाकल्यास तेल पाण्यावर तरंगते.
- निंबोळीची भुकटी : बियांची भुकटी धान्यात २ – ४ % या प्रमाणात मिसळल्यास त्यामुळे पोखरणारे सोंडे, भूंगरे यांचा बंदोबस्त होतो.
- निंबोळी पेंड : जमिनीत वापर केल्याने सुत्रकृमींचे नियंत्रण होते. याशिवाय निंबोळी तंत्राच्या बीजप्रक्रीयेमुळे मररोगापासून संरक्षण होते .
- गोमुत्र :
सध्या अनेक देशात गोमुत्राचा वापर शेतीसाठी करण्यात येतो. गोमुत्राचा उपयोग कडधान्ये, कलिंगड, कोबी, पालक इ. पिकांवरील फुलकिडे, कोळी, या किडींसाठी तसेच चुरडामुरडा मोझॅक या रोगांच्या प्रतिबंधासाठी करावा. फवारणीसाठी १५-२० दिवस जुने असल्यास उत्तम.
लाकडाची राख :
- १ लिटर पाण्यात पूर्ण चमचाभर राख मिसळावी. चांगले ढवळून ते मिश्रण तसेच ठेवावे. त्यानंतर कापडातून गाळून त्यामध्ये कपभर ताक मिसळावे. फवारणीसाठी या मिश्रणात तिप्पट पाणी मिसळावे व फवारणी करावी. यामुळे भुरी, तांबेरा, रोग नियंत्रणात आणता येते.
- १ किलो लाकडाच्या राखेत ६ चमचे केरोसिन मिसळावे. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा सकाळी भाजीपिकावर धुरळावे.
मैदा :
५ – ६ लीटर पाण्यात २ कप मैदा मिसळावा व चांगले हलवावे. या फवारणीमुळे मावा कीड, कोळी या औषधात सापडतात व त्या मरतात. काही तासांनी हा पापुद्रा वाळून खाली गळून पडतो. त्या पापुद्र्यातून किडी सापडतात. दुसऱ्या प्रयोगात ५० लिटर पाणी, १ कप ताक. ८ कप मैदा, मिसळून चांगले हलवावे. व हे मिश्रण पानांवर फवारावे. त्यामुळे लाल कोळी मरेल.
टोमॅटो :
टोमॅटोच्या झाडाचे खोड बारीक वाटून तेवढ्याच गरम पाण्यात ५ तास भिजत ठेवावे. अर्काचे द्रावण कापडातून गाळून घ्यावे. कोबीवर पतंग उडताना दिसतो ,तेव्हा फवारणी करावी. पतंग पिकांवर अंडी घालत नाही
- पपई :
१ किलो पपईची पाने बारीक वाटून १ लीटर पाण्यात मिसळून जोरात ढवळावे. पानाचा चोथा कापडातून गाळून त्यातील अर्क पूर्णपणे दाबून काढावा. या १ लिटर साबणाचे पाणी मिसळावे. (२५+१०० ग्रॅम पाणी ) व हे मिश्रण फवारावे. फवारणीमुळे तांबेरा, भुरा, रोग कमी होतो. या व्यतिरिक्त अनेक उपाययोजना करता येतात. उपाययोजना सावध, व्यवस्थित अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.