संत्री हे एक लिंबू वर्गीय फळ आहे. रसदार संत्र्यात अनेक पोषक घटक असतात. संत्रे रुचकर आणि पौष्टिक असतात. त्यात अ, ब आणि क जीवनसत्वे तसेच कॅल्शियम असते. संत्र्यावरच्या आवरणात अधिक कॅल्शियम असते. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातल्या रक्ताला क्षारमय बनवते. याची मुळे पाण्यास फार संवेदनशिल असतात. महाराष्ट्रातील संत्र्याची नागपूर संत्रा ही जात अप्रतिम चवीमुळे जगप्रसिद्ध आहे.
हवामान:-
संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते. या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि ५० ते ५३ टक्के हवेतील आद्रता चांगली मानवून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते.
जमीन:-
संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाची गोष्ट आहे. नुसती वरवर जमीन पाहून जमिनीची खरी स्थिती लक्षात येत नाही, त्यासाठी माती परीक्षणाबरोबरच पाणी परीक्षण करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मध्यम काळी १ ते १.५ मीटर खोलीची जमीन, त्याखाली पाण्याचा निचरा होईल असा मातीमिश्रित मुरूम अथवा थोडी चुनखडी किंवा वाळूमिश्रित मातीचा थर असलेली व ज्या जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असतो. अशी जमिन लागवडीस उत्तम समजली जाते. भारी काळ्या जमिनी, ज्यात काळी माती १.५ ते ३.५ मीटर खोल असून खाली चोपण मातीचा थर असतो तेथे पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवण्याची क्षमता असल्याने झाडाच्या मुळ्या सडून पुढे झाडे वाळतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत संत्रीची लागवड करू नये.
जाती:-
संत्र्याच्या नागपूर संत्री, किन्नो संत्री व नं. १८२ या जाती आहेत.
लागवड:-
लागवडीसाठी निवडलेले क्षेत्र मोठे असेल तर ते सलगपणे आणि एकच पट्टा समजून लागवड केली जाते. त्याऐवजी निवडलेल्या क्षेत्राचे १/२ हेक्टर पट्टे वाढवून घ्यावेत. या पिकाच्या लागवडीसाठी ६ X ६ मीटर अंतरावर ६० X ६० X ६० सें. मी. आकाराचे खड्डे घेऊन चौरस पद्धतीने लागवड करावी. लागवडीपूर्वी एक महिना अगोदर खड्डे खोदावेत. हे खड्डे पावसाळ्यापूर्वी २५ किलो चांगले कुजलेले शेणखत अधिक दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम १० टक्के क्लोरडेन / ओल्ड्रीन पावडर व जमिनीच्या पृष्ठ्भागावरील चांगली माती अथवा गाळाची माती यांच्या केलेल्या मिश्रणाने करून घ्यावेत. निवड केलेली कलमे मान्सूनचा ३ ते ४ वेळा पाऊस पडून गेल्यानंतर व जमिनीत योग्य अशा ओल झाल्यावर लावावीत. कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना व खड्डयात पुरेशी ओल असताना लावावीत. कलमांचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खचण्याची संभावना नसते. कलम खड्डयात ठेवल्यावर मूळ स्वाभाविक अवस्थेत ठेवून माती हळूहळू खड्डयात टाकावी. माती हलक्या हाताने दाबावी. जोरात मातीवर दाब दिल्यास तंतुमुळे तुटण्याची दाट शक्यता असते. कलम पन्हेरीतून काढताना काही मुळ्या तुटतात. त्यामुळे कलमावरील पानाचे शोषण होत नाही. अशा वेळी सर्व पाने ठेवल्यास कलम वाळण्याची शक्यता असते. म्हणून लागवडीपूर्वी कलमाच्या खालच्या बाजूची अर्धी पाने काढून टाकावीत. खुंटावर आलेली फुट (कोंब) जोमाने वाढतात. म्हणून ती वरचेवर काढावी. कलमे लावल्यानंतर कलमांना अंदाजे १ लिटर पाणी देणे योग्य राहील.
खते:-
सर्वसाधारणपणे जून महिन्याच्यावेळी सेंद्रिययुक्त म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट खत एका कलमास साधारण १० किलो + १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत रिंग पद्धतीने द्यावे. पाण्याची उपलब्धता पाहून महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा असे १५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत जानेवारीपर्यंत द्यावे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मिश्रखते देवू नयेत. आळ्यातील गवत हे न उपटता त्या गवताचा उन्हाळ्याच्या काळात अच्छादन (Mulching) म्हणून उपयोग होईल. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन थांबेल व झाडांवर उन्हाच्या विपरीत परिणाम होणार नाही. दुसरा फायदा म्हणजे त्याचे सेंद्रिय खत तयार होईल. रासायनिक व भरखतामध्ये बचत होईल. हेच गवत जमिनीत मुळात असलेल्या गांडुळांसाठी खाद्य म्हणून उपयोगी पडेल असे दुहेरी फायदे होतील, मात्र गवत फुलावर येण्याअगोदर कापून त्याचा वापर वरीलप्रमाणे करावा, असे ३ वर्षापर्यंत करावे. चोपण, चिभड्या, क्षारयुक्त जमिनीमध्ये चुकून लागवड केल्यास व हल्ली ४ वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त १० ते १५ वर्षाच्या देशभर ज्या ठिकाणी संत्रा बाग अस्तित्वात आहेत त्या न तोडता तेथे खताबरोबर अर्धा टन वाळलेली उसाची मळी (Press Mud Cake) टाकावी. याचा सामू (PH) साधारण ५ ते ६ च्या दरम्यान असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी सुधारण्यास मदत होते.
पाणी:-
या पिकास एका वर्षात साधारणपणे २४ ते २५ ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने, उन्हाळ्यात ६ ते ७ दिवसांच्या अंतराने तर पावसाळ्यात गरजेप्रमाणे ओलीत करावे. ओलीत देण्यासाठी रिंग पद्धतीने आळे तयार करावेत व बाहेरील आळ्यात पाणी द्यावे. कारण झाडाची अन्न व पाणी घेणारी मुळे झाडाच्या परीघाकडील भागात पसरलेली असतात. या पद्धतीमुळे झाडाच्या खोडास पाणी लागत नाही. त्यामुळे डिंक्यासारख्या रोगाला झाडे बळी पडून रोगांना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल