एकीच्या बळाने फुलविले भाज्यांचे मळे
उस्मानाबाद
गावात एकोपा असला की तंटे होत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. परंतु, या एकोप्यातूनच एक गाव भाजीपाल्यात स्वयंपूर्ण झाले आणि गावकर्यांनी तीन महिन्यांत थोडीथोडकी नव्हे, तर एक लाखाची बचतही केली. परंडा तालुक्यातील वागेगव्हाण या गावाची ही यशकथा प्रेरणादायी आहे.
कुटुंबाला लागणारा भाजीपाला आपल्याच शेतातील, घराजवळच्या रिकाम्या जागेत पिकवून वागेगव्हाण (ता. परंडा) येथील 59 कुटुंबांनी पोषणबागा तयार केल्या आहेत. वागेगव्हाण गावापासून भीमा-सीना जोड कालवा वाहत असल्याने गावाचे पूर्ण क्षेत्र बागायती आहे. मात्र, कुटुंबास लागणारा भाजीपाला गावाशेजारील बाजारातून विकत आणावा लागत होता. सप्टेंबर 2018 मध्ये या गावातील आरोग्य कर्मचारी नंदा जगताप यांनी उमेद अभियानमधील जिल्हा कृती संगम कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेतले. गावामध्ये ग्रामसंघ सदस्यांची बैठक घेऊन आरोग्य आणि पोषणासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक घरी भेट देऊन पोषण बागेचे महत्त्व सांगितले. गावातील जवळपास निम्म्या कुटुंबांकडे पाण्याची सोय असल्याने ते आपापल्या शेतावर राहतात. अशा जवळपास 59 कुटुंबांनी शेतातील रिकाम्या जागेत अर्धा गुंठा ते तीन गुंठ्यांमध्ये पोषण बागा तयार केल्या आहेत. भूमिहीन कुटुंबांनी रिकाम्या जागांचा वापर करून बागा बनविल्या. श्रीमती जगताप यांनी स्वतःच्या तीन गुंठ्यांमध्ये पोषणबाग बनवली असून, यामध्ये 32 प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती, पालेभाज्यांची लागवड केली आहे. लोकांकडे असणारा शिल्लक भाजीपाला एकमेकांना देऊन स्वयंपूर्णतेकडे गाव वाटचाल करीत आहे. गावामध्ये ऊसतोड सुरू असल्याने गरीब ऊसतोड मजुरांना भाजीपाला मोफत दिला जात आहे.
महिलांना मदत
गेल्या तीन महिन्यांत पोषण बागांच्या माध्यमातून गावाची जवळपास एक लाख 15 हजारांची भाजीपाला खरेदीवर बचत झाली आहे. उमेद कृती संगम कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध असणारा 36 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी गावातील गरजू 18 महिलांना त्यांच्या मागणीप्रमाणे देण्यात आला असून, यातून शंभर टक्के महिलांनी पोषण बागा तयार केल्या आहेत. यासाठी जिल्हा कृती संगम अधिकारी गुरू भांगे यांचे मार्गदर्शन लाभले. उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक नयन डागळे, रागिणी मोरे, माणिक सोनटक्के, मुकेश लक्षे, गणेश नेटके, गणेश चव्हाण यांनीही यासाठी सहकार्य केले.
जाळ्यांचाही वापर
या गावांमध्ये भोई समाजाची उपजीविका मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. या समाजाकडे असणार्या मच्छीमारीसाठीच्या जुन्या जाळ्या गावातील अन्य सदस्यांना मोफत देऊन पोषण बागांना संरक्षित कुंपण केले. यामुळे गावात सामाजिक एकोपा निर्माण झाला आहे.