डाळिंबावरील तेलकट डागाचे नियंत्रण

0

डाळिंब बागेत तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्याचवेळी त्याचे नियंत्रण, व्यवस्थापन करण्यावर काही वेळा भर दिला जातो. तसे न करता रोगाचा संपूर्ण जीवनक्रम समजावून घेतला, तर बागेच्या कोणत्या अवस्थेत काय खबरदारी घेतली पाहिजे हे लक्षात येते.

 जीवाणू सुप्तावस्था :

 बॅक्‍टेरीअल ब्लाईट (तेलकट डाग रोग) हा रोग झॅन्थोमोनास ऍक्‍सोनोपोडीस पॅथोवर पुनिकी या जिवाणूमुळे होतो. प्रादुर्भावग्रस्त अवशेषामध्ये त्याचे अस्तित्व आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत असू शकते. बागेतील झाडांचे अवशेष, फांद्यावरील काळपट डाग व चट्टे यामध्ये या रोगाचे जीवाणू सुप्तावस्थेमध्ये अनेक वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. काही विशिष्ट तणांवरही या रोगांचे जीवाणू आढळून आले आहेत. बागेत तसेच राहिलेले झाडांचे अवशेष येणाऱ्या बहारामध्ये रोगाचा प्रादुर्भाव करणाऱ्या जिवाणूचे प्राथमिक स्रोत म्हणून कारक ठरतात. या व्यतिरिक्त मातीमध्ये हे जीवाणू 25 ते 30 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात, त्यामुळे आपण सध्या करीत असलेल्या डाळिंब बागेच्या व्यवस्थापनात ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

 रोगाचा प्रसार :

बॅक्‍टेरीअल ब्लाईट रोगाचा प्रसार नवीन क्षेत्रात प्रामुख्याने रोगग्रस्त मातृवृक्षापासून बनविलेल्या रोपांद्वारे होतो. अशा रोगट मातृवृक्षापासून घेतलेल्या काड्यांवरील डोळ्यामध्ये अथवा जखमी भागांमध्ये जीवाणू राहतात. सुरवातीच्या काळात अशा रोपांवर रोगाची लक्षणे दिसत नसली तरीही अनुकूल वातावरण मिळताच त्यांची झपाट्याने वाढ होते. योग्य तापमान आणि आर्द्रता मिळाल्यानंतर जिवाणूच्या संख्येमध्ये वाढ होऊन फांद्यावर ब्लाइट रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागतो. रोग पानांवर व अन्य भागांवर पसरतो. बागेत एका झाडावरून दुसऱ्या झाडांवर प्रसार पावसाच्या तसेच फवाऱ्याद्वारे उडणारे पाण्याच्या थेंबापासून होतो, तसेच तो छाटणीची अवजारे, बागेतील मजूर आणि कीटकांच्या माध्यमातून होतो.

एकात्मिक रोग नियंत्रणासाठी रोगमुक्त रोपांचा वापर, बागेची नियमित स्वच्छता, संतुलित अन्नद्रव्यांचा वापर, पाणी व्यवस्थापन आणि शिफारस केलेल्या मात्रेनेच कीडनाशकांच्या फवारण्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

बॅक्‍टेरिअल ब्लाईट रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन बागेमध्ये घ्यावयाची काळजी – नवीन बागेच्या लागवडीकरिता रोगमुक्त रोपांचाच वापर करावा.

बॅक्‍टेरिअल ब्लाईट रोगाचा प्रादुर्भाव झाला अथवा नाही या दृष्टिकोनातून बागेतील प्रत्येक झाडाची नियमित तपासणी करावी.

प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये प्रतिजैविके आणि जिवाणूनाशकाच्या प्रतिबंधक फवारण्या 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नियमित कराव्यात. तसेच 4 ग्रॅम प्रोफाईट- प्रती कलम प्रती फवारणीतून द्यावे, प्रोफाईटचे 3 स्प्रे तीन दिवसांच्या अंतराने घ्यावेत.  नवीन बागेमध्ये काही रोपांवर या रोगाची लक्षणे दिसल्यास अशी रोपे, मुळासकट काढून जाळून नष्ट करावीत. तसेच निरोगी रोपांवर शिफारसीत फवारण्या कराव्यात.

बॅक्‍टेरिअल ब्लाईट प्रादुर्भावग्रस्त सर्व फांद्या रोगग्रस्त भागाच्या 2 ते 3 इंच खालून छाटून काढाव्यात.

 बागेची स्वच्छता :

  • बागेतील बॅक्‍टेरिअल ब्लाईट रोगाची लागण व प्रसार थांबविण्यासाठी बागेच्या नियमित स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे. बागेतील झाडांचे अवशेष बाहेर काढून जाळून नष्ट करावेत. असे अवशेष व फळे बागेजवळ वा लगतच्या परिसरात टाकू नयेत, बाग नेहमी तणमुक्त ठेवावी.

 लक्षात ठेवण्याजोग्या महत्त्वाच्या बाबी :

  •  अनावश्‍यक फवारण्यांमुळे रोग वाढीस चालना मिळते. याकरिता गरज असेल तरच फवारणी करावी. फवारणी करिता शिफारसी मात्रेतच रसायनांचा वापर करावा.
  • वर्षातून एकच बहार घ्यावा. झाडांना किमान 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी, त्यामुळे झाडांची रोगप्रतिकारक क्षमता व जोम वाढीस लागतो.
  • झाडांना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा अनियमिततेमुळे रोगाची वाढ होऊ शकते.
  • फळतोडणीनंतर बागेच्या विश्रांती अवस्थेमध्ये सुद्धा रोगप्रतिबंधक कीडनाशकाच्या फवारण्या नियमित कराव्यात

 

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.