रोपवाटिका नियोजन व आराखडा – भाग-२

1

रोपवाटिका नियोजन असे कराल

आधी रोपवाटिकेत रोपे तयार करून मग ती शेतात लावणे ही पद्धती सध्या केवळ काही भाज्या, फुले वा फळे पिके या पिकांमध्येच अवलंबिली जाते, पण इतरही अनेक पिकांमध्ये शेतात बी पेरण्याऐवजी रोपे लावून शेती करणे फायद्याचे ठरते.

शेतात थेट बी न पेरता रोपवाटिकेत रोपे तयार करून ती रोपेच शेतात लावावयाची हा विचार नवा आहे. या तंत्राचा उपयोग कसा करावयाचा हे त्या त्या ठिकाणच्या कृषितज्ज्ञांनी प्रयोग करून ठरवावयाचे आहे.

रोपवाटिका : भारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमाची आणि बियाणाची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्ट पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रीत समुहाने केलेले असते. तिला रोपवाटिका असे म्हणतात.

अलिकडे फुलझाडांचा, फळझाडांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातिवंत रोपांची शास्त्रीयादृष्ट्या निपज मोठ्या प्रमाणात होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे / रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे.

ध्यानात घ्यावयाच्या बाबी :

१. जागेची निवड : 

रोपवाटिका ह्या वाहतुकीकरिता रोडपासून अगदी जवळ हव्यात. म्हणजे रोपे, फळझाडे सहजगत्या बागायतदारांना आपल्याकडे नेणे सोपे पडते. रोपवाटिकांची जमीन पानथळ रेताड तर अगदी हलक्या प्रतीची नको, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन रोपवाटिके करिता निवडावी.
बारमाही विहीर बागायत व पाटाच्या पाण्याची सोय हवी. खरवटीची जमीन नको, पाटाच्या पाण्यापेक्षा विहीर बागायतीस प्राधान्य द्यावे. रोपवाटिकेच्या झाडांच्या संरक्षणाकरिता वारा संरक्षणे असावीत. त्याकरिता कोणती झाडे निवडाविता ते स्थानिक हवामानावर अवलंबुन राहील, पण शेवटी जलद व उंच वाढणाऱ्या झाडांची बारा संरक्षके म्हणून बहुधा निवड करतात. वाऱ्याच्या आडव्या दिशेने वारा संरक्षके लावतात. वारा संरक्षकांनी वारा अडवावा, परंतु जास्त सावली देऊन रोपवाटिकेला सुर्यप्रकाशापासून वंचित करू नये. तसेच वारा संरक्षकांच्या मुळांनी रोपवाटिकांच्या झाडांना अडथळा आणू नये. अशा प्रकारची वारासंरक्षके असावीत. रोप वाटिका, उभारणीपूर्वी माती परीक्षण, पाणी परिक्षण करावे.

२. कुंपण : कोणत्याही रोपवाटिकेस कुंपण असणे गरजेचे होय. हे कुंपण लाइव हेज, काटेरी वनस्पती चिलार-सागरगोटे, डूरांटा, घायपात यांचे किंवा काटेरी तारांचे किंवा पक्क्या भिंतीचे असू शकते. विविध प्रकारच्या उपद्रवांपासून व चोरीपासून संरक्षण, इतरांचा थेट हस्तक्षेप टाळणे तसेच रोपवाटिकेची सीमा निश्चित समजणे यासाठी कुंपण आवश्यक आहे.

३. गादी वाफे:

निरनिराळ्या प्रकारची रोपे तयार करण्याकरिता लागणाऱ्या वाफ्यांना फार थोडी जागा लागते. ही जागा पाण्याच्या जवळ असावी. तसेच नीट व वारंवार लक्ष ठेवण्याकरिता ही जागा कार्यालयालगत असावी. बियाणे पेरण्याचे बाफे हे गादी वाफे असावेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. हे वाफे सावलीखाली नसावेत. त्यांना भरपूर सुर्यप्रकाश मिळायला हवा. परंतु उन्हाळ्यात सावली आवश्यक. या वाफ्यांनी जमीन भुसभूशीत असावी. बहुवर्षायु तणे नसावीत वाफे तयार करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरावी. तिच्यात कुजलेले शेणखत टाकावे. पाण्याचा अधिक निचरा होण्यासाठी त्यात थोडी वाळू मिसळावी. याचा आकार ३ मी. लांब १ मी. रुंद व १५ -२० से. मी. उंच असावा किंवा ६ मी. लांब, १ मी. रुंद व १५ -२० सें. मी. उंचीचा असावा.

४. सपाट वाफे :

सुरूवातीला काही पिकांचे बियाणे गादी वाफ्यावर उगवून आल्यानंतर काही दिवसांनी त्याचे सपाट वाफ्यावर स्थलांतर करतात किंवा छाट रुजविण्याकरिता देखील ते सपाट वाफ्यात रुजवतात. हे वाफे आकारमानाने गाडी वाफ्यापेक्षा मोठे असावेत. हे वाफेसुद्धा पाण्याच्या जवळ असावेत. गादी वाफ्यावरून स्थलांतर करून सपाट वाफ्यात लावलेली रोपे जातीनुसार वेगवेगळ्या अंतरावर लावावीत. वाफ्याचा आकार आवश्यकतेप्रमाणे व जमिनीच्या उताराप्रमाणे घ्यावा.

या वाफ्यामध्ये सुद्धा जमीन भुसभुशीत व पाण्याचा निचरा होणारी असावी. या वाफ्यावर गादी वाफ्यापेक्षा जास्त काळ रोपे राहतात. फेरपालटीमध्ये या जागेवर अधून – मधून हिरवळीचे पीक घ्यावे. तसेच तणांचा बंदोबस्त करावा. पिकानुसार वाफ्यांचा वेगळा विभाग असावा. खुंट तयार करण्याकरिता वेगळा विभाग असावा. या जागा फेरपालट करण्याकरिता राहाव्यात. या वाफ्या कडे सहज जाता यावे म्हणून मधून पायवाटा ठेवाव्यात.

५. मातृवृक्ष :

रोपवाटिकेचा हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. ज्या जातीची झाडे तयार करावयाची आहेत. त्यांची दाब कलमे, छाट कलमे व डोळे घेण्याकरिता जातीवंत, निरोगी, दर्जेदार व ज्यांच्या गुणांचा इतिहास पाहिला आहे अशीच झाडे मातृवृक्ष म्हणून रोपवाटिकेत लावलेली असावीत. त्यांच्यापासून फळे घ्यावयाची नसल्यामुळे ती नेहमीच्या अंतरावर न लावता २.५ ते ४ किंवा ५ x ५ मी. अंतरावर पिकाप्रमाणे लावलेली असावीत. मातृवृक्ष निवड करून लावणे हा रोपवाटिकेचा अत्यंत महत्त्वाचा भाग होय. वेगवेगळ्या जातीच्या व प्रकारच्या मातृवृक्षाचा वेगवेगळा विभाग असावा व त्यांच्या जातीची नावे. त्यावर व्यवस्थित लिहावीत. त्या झाडांपासून तयार केलेली कलमे, दाब कलमे याची नोंदणी वेगवेगळ्या नोंदणी पत्रकार नीट नोंदवलेली असावीत. मातृवृक्ष कोठून आणली व त्याची वंशावळी व उत्पन्न देण्याची क्षमता इत्यादीची नोंद असावी.

रोपवाटिकेचे नियोजन व आराखडा तयार केल्यामुळे होणारे  फायदे :
१. रोपवाटिकेमध्ये काळजी घेत बसण्याऐवजी दर्जेदार रोपे उपलब्ध होऊ शकतात.
२. कलमे किंवा रोपे न करता त्वरित फळबाग लावता येते.
३. रोप-कलमे निर्मितीचा वेळ, पैसा व श्रम वाचतात.
४. रोपांच्या गुणवत्तेची खात्री घेता येते.
५. दुर्मीळ कलमे सहजासहजी उपलब्ध होतात.

https://krushisamrat.com/shelter-homes-for-nursery-part-3/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

 

 

1 Comment
  1. […] रोपवाटिका नियोजन व आराखडा (भाग-२) […]

Leave A Reply

Your email address will not be published.