रोपवाटिका व बीजारोपणासंबंधी माहिती

0

शेतात भाजीपाला पिकविण्यासाठी थेट बीजारोपण करून तेथेच भाजीपाला उगवू देतात. नर्सरीत हे शक्य नसते. नर्सरीचे क्षेत्र मर्यादित असते. तेथे बीजारोपण करून रोपटी वाढवतात व नंतर ती काढून/ उपटून त्यांचे योग्य जागी पुन्हा प्रतिरोपण केले जाते. ही पद्धत योग्य व लाभ देणारी मानली जाते.
ज्या रोपट्यांना एका जागेवरून दुसरीकडे प्रतिरोपित करता येत नाही हा त्या रोपट्याचा जातधर्म असू शकतो, पण जी रोपटी यशस्वीपणे प्रतिरोपित करता येतात, त्यांना प्रतिरोपित करणे केव्हाही चांगले. कृषितज्ज्ञसुद्धा हाच सल्‍ला देतात.
भाजीपाला लागवडीसाठी छोटी-मोठी नर्सरी, परसबाग, रोपवाटिका तयार करणे हे आपल्या आवडीनुसार विशेष महत्त्वाचे आहे. फार वर्षांपासूनच्या अनुभवांतून व प्रयोगांतून याबद्दल आपल्याला तयार माहिती उपलब्ध आहे, ती आपण मिळवली पाहिजे.
परसबाग/रोपवाटिकेसाठी गादी वाफे, आळे तयार करणे ः-
रोप लागवडीसाठी मातीचे गादी वाफे, आळे तयार करणे किंवा कुंड्या,पत्र्याचे डबे यांतून रोपांची जोपासना करणे यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात.

1) बीज रोपून रोप कोठेही तयार करा. पण बीजारोपणासाठी माती चांगल्याप्रतीची व बारीक असावी. माती चांगली प्रकारची असेल तर रोपटी सुदृढ उगवेल.
2) माती हलकी, कोरडी व भुरभुरी असावी.
3) जी माती पटकन पाणी शोषून घेते, ती चांगली माती समजावी.
4) जलसिंचन केल्यानंतर ज्या मातीचा वरचा स्तर लवकर कोरडा होतो व अंतर्भागात ओल राहते अशी माती रोपवाटिकेसाठी योग्य असते.
5) माती खडे काढून, ढेकळे फोडून तयार करून घ्यावी. मातीचे परीक्षण करून त्यात रोपवाढीसाठी आवश्यक ती पोषकद्रव्ये आहेत का? याची माहिती घ्यावी. माती सक्षम असेल तर रोपटी सुदृढ उगवतील.
6) माती गादी वाफ्यात, आळ्यात वा कुंडीत असो, ती पोषकद्रव्यांसह सक्षम असावी, तिच्यात खनिजद्रव्येही असावीत. खनिज द्रव्ये, पोषकद्रव्ये कमी असल्यास त्याबद्दल कृषितज्ज्ञांचा सल्‍ला घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
7) मातीत क्षार, खनिजद्रव्ये योग्य प्रमाणात असावीत. खनिजद्रव्ये अधिक असणे योग्य नसते. वाळूमिश्रित माती, तलाव वा नदीकाठची माती योग्य असते. कारण ती जैवांशयुक्‍त असते.
8) माती रोगट व पोषकद्रव्य विरहित नसावी.
9) मातीत रोग पसरवणारे जीवाणू, वाळवी, बुरशी नसावी. रोगट मातीत रोपटेसुद्धा रोगट निर्माण होते व रोगाला बळी पडते.

मृदाजनित रोगांपासून बचाव ः-
मृदा म्हणजे माती, मातीत काही वेळा रोग पसरवणारे जीवजंतू, कीड असते. ती रोपट्यांचे नुकसान करते. रोप खाते, पानांच्या मागे पांढरट कीड दिसू लागते. कीड नष्ट करण्याचे काही उपाय/रसायने आहत त्यांची माहिती पुढीलप्रमाणे.
1) शेतात वा बागेत रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून पालापाचोळा, गवत, लाकडे जाळून धूर करावा .
2) मातीचे गादी वाफे, आळे, कुंड्या यांना जंतुविरहित करण्यासाठी पुढील उपाय योजावेत.
अ) फॉर्मलीन हे कीडनाशक शंभर भाग पाण्यात एक भाग फॉर्मलीन मिसळून त्याचे द्रावण तयार करावे. ते मातीत 150 मि.मी. खोलीपर्यंत मिसळावे. हे द्रावण एक वर्ग मीटर मातीत साडेचार लिटर वापरणे योग्य असते. नंतर माती फाटकी पोती, तरट याने झाकून ठेवावी. दोन दिवसानंतर ही माती रोग लागवडीसाठी वापरावी. या प्रयोगामुळे मृदेतील कीड, बुरशी व रोगजंतू नष्ट होतील.
ब) झाकून ठेवलेली माती खोदून, पसरून ठेवावी. म्हणजे त्यातील उग्र वास कमी होईल.
क) माती चाळून, ढेकळे फोडून, खडे काढून वापरावी.
ड) कुंड्या, डबे यांत बीजारोपण करण्यापूर्वी मोठी माती तळाशी अंथरावी व वर चाळलेली बारीक माती पसरावी. कुंड्यांच्या व डब्याच्या काठाशी माती थोडी खाली दाबावी म्हणजे पाणी तुंबून राहणार नाही.

रोपांच्या लागवडीसाठी कुंड्या व डबे ः-
कुंड्यांतून वा डब्यांतून बहुतेकजण फुलझाडांची रोपटी लावतात. भाजीपाल्यासाठी मातीचे गादी वाफे वा गोल आळी जमिनीवर बनविली जातात. पण हल्‍ली हौसेने वा जागेच्या उपलब्धतेनुसार कुंड्या, पत्र्याचे डबे यांत भाजीपाला वा फळभाज्यांचे वेल लावले जात आहेत. ज्यांच्याकडे शेती नाही, पण अंगण, टेरेस वा बाल्कनी आहे ते लोक डब्यात व कुंडीत भाजी पिकवण्याचा आनंद घेत आहेत.
अ) डब्यात बीजारोपण व रोपांचे प्रतिरोपण सहजपणे करता येते.
ब) शेतात पाणी, पाऊस, हवामानाचा बदल वगैरे अडचणी येतात तश्या अडचणी डबे वा कुंड्या वापरून केलेल्या भाजी लागवडीस येत नाहीत.
क) डब्यातील रोपटी उपटणे/ काढणे सोपे असते. त्यामुळे रोपांच्या मुळांचे नुकसान होत नाही.
ड) किचन गार्डन, टेरेस, परसबागेत भाजी उत्पादन घेणार्‍यांनी योग्य आकाराचे डबे, कुंड्या घ्याव्यात. म्हणजे जास्त श्रम होणार नाहीत. जागा कमी लागेल.
इ ) परसबागेसाठी वा टेरेसवरील बागेसाठी जर पत्र्याचे डबे तयार करून घेणार असाल तर 0.5 0.25 असे लांब-रुंद व 7 ते 8 मि.मी. खोल असे डबे तयार करून घ्यावेत.
फ) डब्यात पाणी तुंबून राहू नये यासाठी अगदी लहान छिद्र तळाशी असावे.
ह) पत्र्याच्या डब्यांना हँडल (कड्या) बनवून घ्याव्यात. म्हणजे डबे सहज उचलता येतील. हवामान खराब असेल तेव्हा हे डबे योग्य अशा निवार्‍याला उचलून ठेवता येतील.

चांगली परसबाग/ रोपवाटिका ः-
कुंड्या, पत्र्याचे डबे, पत्र्याच्या बादल्या वापरून चांगल्या प्रकारची रोपवाटिका (नर्सरी) तयार करता येते. खत, पाणी व पाण्याचे नियोजन याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे ः-
अ) माती मऊ, बारीब व डबा/कुंडीत व्यवस्थित समतोल बसलेली असावी. म्हणजे एकसमान अंकुरण होईल. पीक चांगले येण्याचे/घेण्याचे हे योग्य व्यवस्थापन म्हणता येते.
ब) या मातीत बीजारोपण करण्यापूर्वी मातीत कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत योग्य प्रमाणात मिसहावे. त्यानंतर काही दिवसांनी बीजलावावे. चांगले कार्बनिक खत चांगला भाजीपाला देते.
क) कुंड्यांत व डब्यांत भाजीपाल्याचे बीज लावण्यापूर्वी अर्धी माती, अर्धी बारीक वाळू एकजीव करून त्यात कंपोस्ट खत मिसहावे. व वाळू इतके असावे. यांचे एकत्रीकरण करून ते कुंडीत/डब्यात भरावे.
ड) शक्य असल्यास वरील मिश्रणात माती निर्जंतुक करण्याचे द्रावण मिसळावे.
इ) कुंड्यांत व डब्यांत वरीलप्रमाणे तयार केलेली माती भरल्यानंतर ती काठाकाठाने दाबून बसवावी. म्हणजे ती लवकर वाळणार नाही व मातीत ओल राहील.
फ) माती दाबून बसवल्यामुळे सिंचनाचे किंवा पावसाचे पाणी वाळून जाणार नाही व मातीचे ओघळ वाहणार नाहीत.
ह) रोपवाटिकेत जर मातीचे गादी वाफे तयार केले तर ते एक मीटरपेक्षा रुंद असू नयेत. मोठ्या वाफ्यात निराई (गवत वा कमजोर रोपटी काढणे) करताना कष्ट पडतात. गादी वाफे लहान असल्यास जलसिंचन, गवत काढणे, निराई करणे सोपे होते.

बीजारोपण सोपे कसे होईल? ः-
बीज मातीत रोवणे/दाबणे याला बीजारोपण (पेरणी) म्हणतात. शेतात बी-बियाणे पेरणे व ते तेथेच वाढू देणे बर्‍याचदा योग्य असते, कारण तेथे उगवलेल्या रोपट्यांना प्रतिरोपित करण्याची आवश्यकता नसते किंवा ते शक्य नसते. परंतु ज्या बीजापासून रोपटे तयार करून ते प्रतिरोपित करणे आवश्यक असते, तेव्हा बीजांना विशेष प्रकारे तयार केलेल्या मातीच्या गादी वाफ्यात पेरतात. यासंबंधाने अधिक माहिती पुढीलप्रमाणे.
अ) रोपवाटिकेत बीजारोपण करताना ते गादी वाफ्यात अंतरा-अंतराने पेरतात. परंतु बरेच शेतकरी बी-बियाणे मशागत केलेल्या शेतात हाताने विखरून टाकतात. बी अंतरा-अंतराने पेरणे केव्हाही चांगले.
ब ) गादी वाफ्यात बीजारोपण करण्यापूर्वी हवामान ठीक आहे याची खात्री करून घ्या. हवा जोरात वाहत असल्यास बिया हवेने उडून जातील. हवा शांत असेल तेव्हाच पेरणी करावी.
क) बीजारोपण केल्यानंतर लगेच हलकेसे जलसिंचन करावे. पेरलेले बी पाण्याअभावी कोरडे पडता कामा नये.
ड) तुम्ही पेरलेले बी-बियाणे ओलसर हवा , दमटपणा कसाही असू द्या. योग्यवेळी ते अंकुरणारे. मात्र अधिक पाणी गारठा यामुळे अंकुर सडण्याची शक्यता असते. तसेच बियांमध्ये अंतर असावे. म्हणून अंकुरांची गर्दी होणार नाही. बीजारोपण एका ओळीत करोव यू आकाराचे गादीवाफे पेरणीसाठी योग्य असतात.
इ) बीज अंतरा-अंतराने वाढवलेली रोपटी उपटून ती प्रतिरोपित (दुसर्‍या जागी नेऊन लावण्यास) करण्यास सोपे जाईल. रोपांची मुळे तुटणार नाहीत.
ह) कृषि तज्ज्ञ म्हणतात – पत्र्याच्या डब्यातसुद्धा अंतरा-अंतराने बी पेरावे.
ग) रोपवाटिकेत गादी वाफे तयार करून जर बीजारोपण करत असाल तर मातीचा प्रकार, बी कोणत्या जातीचे आहे याचा विचार करूनते किती खोल पेरायचे याचा विचार करा. बियांचा आकार व पेरणी या गोष्टी अनुभवाने साधतात.
प) बी खूप लहान आहे, एकेक करून लावणे अशक्य असते अशावेही बारीक वाळूत त्या बिया एकत्रकरून ते एका ओळीत मातीत काढलेल्या चरीत पेरत जावे. त्यावर माती मिसळलेले शेणखत टाकून बिया झाकाव्यात. खताचा थर पातळ असावा.
भ) माती जाडीभरडी असेल तर शेणखताचाथर पातळच टाकावा वबिया झाकाव्यात आणि जमीन समतल करून घ्यावी.
य) माती व खत यांचे मिश्रण बियांवर चढवण्यासाठी लाकडाची पट्टी वापरण्यास हरकत नाही.
र) बीजारोपण करून झाले. शेणखताचा व मातीचा थर दिल्यानंतर हलके जलसिंचन केले. त्यानंतर त्या कुंड्या व पत्र्याच्या डब्यांना उघडे ठेवू नका. त्यावर सुकलेल्या गवताचा वा सुकलेल्या पानगळीचा थर पसरा. बीज अंकुरण झाले. रोप जमिनीवर दिसू लागले की, झाकलेले गवत/ पानगळीचा थर काढून टाका. हलकेसे जलसिंचन करा. माती वाहून जाईल वा रोपाला धक्‍का लागेल असे जलसिंचन करू नये.
रोपवाटिकेची देखरेख ः-
बीजारोपण केले की आपण निवांत झालो असे समजू नये. तुमचे मन/ध्यान या रोपवाटिकेकडे वा परसबागेकडे असायला हवे. तुम्ही लक्ष दिले नाही तर सगळे कष्ट वाया जातील यासंबंधी.
अ) जेव्हा जेव्हा जलसिंचन कराल किंवा फवारा वापराल तेव्हा पाणी देण्याचा वेग नियंत्रणात ठेवा. माती वाहून जाईल, विस्कटेल वा रोप उघडे पडेल असे जलसिंचन करू नका.
ब) पाणी वेळेवर द्या. विहिरीच्या वा तळ्याच्या जवळ गादी वाफे केले असतील तर पाणी देणे सोपे होते. त्यासाठी पाण्याचे पाट काढले जातात.
क) ज्या दिवशी तुम्ही रोववाटिकेत काम ( श्रम) केले आहेत. त्या दिवशी वातावरण/ हवामान सामान्य असेल तर ठीक आहे. उन्हे कडक पडली असेल व ती रोपट्यांना कोमेजून टाकणारी असतील तर गवताने व पालापाचोळ्याने रोपे झाकावीत.
ड) उन्हाळ्यात मिरची, मेथी, टोमॅटो, शेपू, कोथिंबीर सारखी रोपटी उगवून आलेली असतात, ती नाजूक असतात. कडक उन्हाची झळ या रोपट्यांना लागू नये यासाठी वरील उपाय योजावा व शक्य असल्यास छत्र बांधावे.
इ) कडक उन्हे व पाण्याची कमतरता अशा अवस्थेत रोपटी खुजी, खुरटलेली होतात. याबाबी टाळल्या पाहिजेत.
फ) रोपटी 13-14 मि.मी. उंचीपर्यंत वाढल्यास, त्यांना सतत सावलीत ठेवणेही योग्य नसते. सावलीत रोपटे पातळ, लांब व कमजोर होते. त्यावर पिवळटसर झाक दिसू लागते. अशा कमजोर रोपट्यांवर कीड पडण्याची शक्यता असते. कमजोर रोपटी रोगाला लवकर बळी पडतात. सतत गारठा वा सतत कडक उन्हे या दोन्ही बाबी रोपांना हानिकारक असतात.
ह) रोपटे कोमेजू किंवा सडू लागल्यास ते आर्द्रपतनाचे बळी ठरले आहे, असे समजावे. याकरिता पुढील मुद्दे विचारात घ्या.
1) कोमेजू व सडू लागलेले रोपटे काढून टाका म्हणजे आर्द्रपतनावर नियंत्रण ठेवता येईल व इतर रोपटी बाधित होणार नाहीत.
2) आर्द्रपतन होऊ लागल्यास रोपट्यांवर टाकलेले गवत, पालापाचोळा, पोत्याचे तरट, छप्पर काढून टाका व रोपटी उन्हात ठेवा. तसेच त्यांना खेळती हवा मिळू द्या.
3 ) आर्द्रपतनात रोपट्यांना अधिक पाणी देऊ नये. थोडेच पाणी द्या. म्हणजे रोपट्यांना रोग होणार नाहीत.
ग) मशागतीनंतर शेतात गादी वाफे तयार केले असतील आणि रोपटीही लागवडीयोग्य झाली असल्यास त्यांचे प्रतिरोपण करता येते मात्र यापूर्वी एक आठवडा रोपट्यांना पाणी कमी द्यावे. पाणी कमी कमी दिल्याने रोपटी सहनशील (सहिष्णू) होतील. म्हणजेच एका ठिकाणातून उखडून दुसर्‍या जागी लावण्यापर्यंतचा झटका ते सहन करू शकतील. तसेच प्रतिरोपणानंतर ती सुकणार नाहीत.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.