कडुनिंब एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे. हजारो वर्षांपासून भारतात त्याचा उपयोग केला जातो. भारतात सर्वत्र आढळणारे कडूलिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये तसेच शेती क्षेत्रात याचा उपयोग होत आला आहे. कडुनिंब या झाडाची मुळे, खोड, खोडाची साल, डिंक, पान, फुले, फळे, त्यापासून काढलेले तेल व तेल काढून राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे प्रत्येक भाग कडू असतात. कडुनिंबाच्या पानात बुरशीनाशक व जंतुनाशक गुण आहेत. कडुनिंब वृक्ष वर्षभर हरित असतो. अति उन्हाळ्यात काही झाडांची पानगळती होते. हा वृक्ष साधारणपणे २० ते ३० फूट उंच असतो. कडुनिंब दीर्घायुषी आहे. तो पन्नास-साठ वर्ष जगतो. त्याची पाने सदा हिरवी असतात. कोवळी पाने तांबूस रंगाची असतात. करवतीच्या दात्यासारखे पानांना दाते असतात.
कडू लिंबाच्या झाडांचे अनेक उपयोग असून त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे.
- डासांना तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी त्याच्या पानांचा उपयोग पूर्वीपासून होत आहे.
खोडातून पाझरणारा डिंक औषधी असून त्वचा रोगावर वापरतात. याच्या डिंकाचे लाडू बाळंतपणात देण्यात येतात.
- कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
- कडू लिंबाची पाने व खोड कुष्ठरोगावर औषध म्हणून वापरतात. पोटिस बांधणे, वाफेने शेकणे, मलम तयार करून वापरणे इत्यादीं साठीही पानांचा उपयोग करतात.
- जखमा, त्वचेचे रोग, व्रण, आतड्यातील जंत, मधुमेह इत्यादींवर कडू लिंबाच्या काढ्यांचा उपयोग केला जातो. त्याच्या
- कडुनिंबाच्या डहाळीचा वापर दात घासण्यासाठी पूर्वीपासून केला जात आहे. त्यापासून काढलेला रस दंतधावनाचा (टूथ पेस्टचा) एक घटक म्हणून वापरतात.
- चेहऱ्यावरील तारुण्य पीटिकांवर लिबोणी तेलाचा उपाय परिणामकारक ठरतो. कडुनिंबाचे तेल हे अँटी बॅक्टेरियल, अँटी फन्गल, अँटी मायक्रोबियल असल्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचा रोगांवर हे तेल रामबाण आहे. विशेषत: तेल लावल्यावर ती व्याधी परत उद्भवत नाही. कडुनिंब तेलात फॅटी अॅसिड व ई जिवनसत्त्व आहे व ते त्वचेत सहज व जलदगतीने शोषून घेतले जाते. त्यामुळे खरुज, नायटा यांसारख्या व्याधी सहज बऱ्या होतात.
- पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्याएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.
- अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.
शेतीसाठी उपयोग
- कडुनिंब तेल व कडुलिंब पर्णरस यांचा उपयोग शेतीतही मोठय़ा प्रमाणावर केला जातो, कारण ते जंतुनाशक, कीटकनाशक व बुरशीनाशक आहे.
- शेतकऱ्याला आपल्या शेतावरच पिकावरील रोगप्रतिबंधक व रोगनाशक औषधे निर्माण करता येतात. बाजारातून औषधे विकत आणण्याची गरज नाही.
- कडुनिंबाची पेंड हे नायट्रोजनयुक्त उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे. रासायनिक युरिया खतापेक्षा ते अधिक गुणकारी आहे.
सौ वृषाली खडके
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.