कृषी उत्पन्‍न घेण्यासाठी आवश्यक क्रिया

0

वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आज वर्षभरात कुठे ना कुठे पिकवला जातो. आपल्या देशातले हवामान सतत बदलत असते. काही प्रांतात थंडी असते, तेव्हा इतर प्रांतात कडक उन्हेही असतात तर कुठे पाऊसही पडत असतो. त्यामुळे भाजीपाला पिकवण्याच्या वेगळ्या जाती-पद्धती हवामान पाहून योजल्या जातात. भाजीपाला पिकवण्याच्या क्रिया-प्रक्रिया बहुधा एकसारख्या असतात.
अ) बी-बियाणे वा रोपटी तयार करण्यासाठी शेत पेरणीयोग्य करणे.
ब ) शेतात योग्य प्रमाणात खत टाकणे.
क) जलसिंचनाची योग्य ती सोय करणे.
ड) वेळेवर मशागत-नांगरणी व खुरपणी करणे.
इ) पिकाची देखरेख करणे.
शेतकर्‍यांनी व हौसेने भाजीपाला पिकवणार्‍या परसबाग मालकांनी या कृषिकार्याची माहिती ठेवलीच पाहिजे. म्हणजेच आपण यशस्वी शेतकरी किंवा बागवान होऊ. पाण्याचा थेंब न् थेंब, मातीचा कण न् कण आणि हवामान तसेच बीजांची अचूक निवड व पेरणी या सर्वांची सांगड घातली तरचआपण शस्वी होणार आहोत. चांगले कृषी उत्पन्‍न घेणार आहोत.

बी-बियाणे वा रोपांसाठी शेती तयार करणे ः-
शेती तयार करणे म्हणजे शेतात काम करून, कष्ट करून मातीचे सोने करणे. शेतातील ढेकळे फोडून शेत नांगरून घेणे. केरकचरा काढणे किंवा जाळून टाकणे, शेतीत लागवडीयोग्य मातीचे गादी वाफे तयार करणे, पाण्यासाठी पाट तयार करणे, माती परीक्षण करून त्यात कोणते पीक घेता येईल याबद्दल तज्ज्ञांचा सल्‍ला घेणे, खताचे प्रमाण, खत किती वापरावे याची माहिती घेणे, माती लागवडीयोग्य तयार करून त्यात बीजारोपण केल्यास पीक, भाजीपाला, फळे चांगली येतील. यासाठी-
1) शेती समतल (सपाट) असावी. म्हणजे शेतीत पाणी सोडले तर ते चौफेर पसरेल व जमीन ओलिताखाली येईल.
2) भाजीपाला कोणताही पिकवायचा असो, त्यासाठी माती योग्य असावी.
3) थंडीत येणार्‍या पालेभाज्या वेळेवर हाताशी येण्यासाठी खोलवर वाळू मिश्रित जमीन उपयुक्‍त असते.
4) उन्हाळ्यात येणार्‍या भाजीपाल्यासाठी व पीक लवकर हाताशी येण्यासाठी चिकण माती व ओल धरून ठेवणारी माती असावी.
5) ज्या शेतकर्‍याला जमिनीच्या ओलाव्याचे गणित जमते, तो शेतकरी यशस्वी होतो व चांगले उत्पन्न मिळवतो.
6) चांगले कृषी उत्पन्न मिळण्यासाठी जमिनीत अधिक आम्ल नसावे व क्षार नसावेत. संतुलित जमीन अधिक चांगली असते. जमिनीतील क्षार व आम्लाचे प्रमाण माती परीक्षणातून समजतात.
7) ज्या भाजीच्या बिया अगदी लहान असतात, त्या बिया पेरण्यासाठी गादी वाफे स्वच्छ असावेत, त्यात अनावश्यक गवत-कचरा नसावा. माती सपाट व ओलसर असावी. म्हणजे ती भाजी चांगली उगवेल.
8) मातीचे गादी वाफे योग्य नसल्यास पीक चांगले येत नाही. तसेच बिया दाट पेरू नयेत. बिया दाट पेरल्यास रोपाची वाढ चांगली होत नाही. पानांच्या वाढीस अडथळा होतो. त्यांना खतांचा खुराक व्यवस्थित मिळत नाही.
9) गादी वाफे समान अंतरावर असावेत तसेच पेरणीसुद्धा योग्य अंतराने करावी. म्हणजे रोपांची निगराणी चांगली होईल.
10) जे शेतकरी खोलवर नांगरणी करून, मातीत खत मिसळतात व गादी वाफे तयार करतात त्यांना पीक घेण्यात अडचणी येत नाहीत.
11) गादी वाफ्यांची माती पेरणीनंतर आठवड्याने सारखी करून घ्यावी . जमीन हलकी व भुसभुशीत करावी. यासाठी खुरपे वापरावे.
12) ज्यांना भरपूर उत्पन्‍न घ्यायचे असते ते शेत जमिनीकडे विशेष लक्ष देतात. खुरप्याने अनावश्यक गवत काढणे व जमीन खणणे अशी कामे करतात. त्यामुळे शेत स्वच्छ राहते.
13 ) खुरपणी केल्यामुळे मातीची उपजण क्षमता वाढते व पीक चांगले येते.
14) शेतकरी खुरपणीकडे कमी लक्ष देतात व जलसिंचन अधिक करतात. खर तर खुरपणीचे काम अधिक करावे. जलसिंचन गरजेइतकेच करावे.
15) धान्याचा खुसा शेतातील पिकात टाकावा व माती खालीवर करावी यामुळे शेताची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पीकही चांगले येते व मातीची गुणवत्ता वाढते.
16) कृषितज्ज्ञांच्या मते काळ्या रंगाच्या 400 गॉज एल्काथीनचा वापर केल्यास जमिनीत ओल राहील तसेच आंगतुक गवत, पाला उगवणीला प्रतिबंध होईल.
शेतात खताचा वापर ः प्रकार/प्रमाण ः-
शेतीत धान्य, भाजीपाला, फळे-फुले यांचे उत्पन्न घेत असताना आपल्याला निव्वळ खतावर विसंबून राहता येत नाही किंवा निव्वळ रासायनिक खतावरही विसंबता येत नाही. या दोन्हींचा वापर करून शेतीत भरपूर उत्पादन घेता येते. रेापवाटिकेत तर रासायनिक खतांचा वापर अधिक केला जातो. परंतु रासायनिक खतांचा वापर करून जे पीक घेतलं जातं, त्याला हल्‍ली विरोध होऊ लागला आहे आणि शेणखत, कंपोस्ट खतांचा वापर करून पिकवलेल्या धान्याचा, भाजीपाल्याचा व फळांचा आग्रह होत आहे. रासायनिक खत वापरल्याने पिके भरभर वाढतात, पण ते मानवी प्रकृतीस अपायकारक आहेत असा विचार पाश्‍चिमात्य देशातील संशोधकांनी मांडला आहे व या विचाराचा प्रसार सर्वत्र झाला आहे. शेतकर्‍यांनी सावधपणे योग्य खताचा योग्य प्रमाणात वापर करून शेतीत उत्पन्न घ्यावे. भाजी व फळांची कोणती जात आपण लावणार आहोत वा लागवड केली आहे. त्या जातीनमुसार खत किती व कसे वापरावे याची माहिती पुढीलप्रमाणे.

नायट्रोजनचा वापर ः-
धान्य व भाजीपाला पिकवण्यासाठी नायट्रोजन महत्त्वाचे मानले जाते. याचा उपयोगाने –
1) पाने व खोड यांची सामान्य वाढ होते.
2) रोपट्यात क्लोरोफिलचे प्रमाण वाढते.
3) जमिनीत नायट्रोजन असल्यास भाजीपाला मांसल (गुदेदार) रसाळ होतो. नायट्रोजन रासायनिक खत रोपट्यांना दोनप्रकारात दिले जाते.
अ ) कार्बनिक ब) अकार्बनिक.
हे रासायनिक खत अमोनियम सल्फेट किंवा अमोनियम नायट्रेट तसेच सोडियम नायट्रेट या स्वरुपात रोपट्यांना देतात. रोपटी नायट्रोजनचे हे खतप्रकार त्वरित ग्रहण करतात व रोपटी वाढीस लागतात.
पालक, कोबी, शेपू, गाजर, नवलकोल, बीट या पालेभाज्यांना व कंदभाज्यांना नायट्रोजन द्रावण स्वरुपात देऊन भरपूर उत्पादन घेतले जाते.
फॉस्फरसचा उपयोग ः-
भाजीपाल्याचे चांगले व भरपूर उत्पन्न घेण्यासाठी फॉस्फरस खताचा उपयोग होतो. सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट या प्रकारात हे खत मिळते.
सर्व प्रकारच्या शेंगभाज्या, सर्व प्रकारच्या कंदभाज्या तसेच मटार, बटाटे, गाजर, नवलकोल यांच्यासाठी फॉस्फरस वापरले जाते. भाजीपाला हिरवागार टवटवीत व वजनदार मिळतो तसेच-
1) मुहांचा तीव्र गतीने विकास होतो.
2) पीक व भाजीपाला लवकर परिपक्व होतो.
3) पिकाची गुणवत्ता वाढते.
4) पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.

पोटॅशचा उपयोग-
1) भाजीपाल्याच्या बागेला/ शेतीला पोटॅश खत पोटशियम सल्फेटच्या स्वरुपात देतात.
2) फुले, फळे, भाजीपाला यांची योग्य वृद्धी होण्यासाठी पोटॅश व फॉस्फेट यांचे मिश्रण देतात.
3) पोटॅश व फॉस्फेट यांचे मिश्रण शेतीला / फळबागेला दिल्यामुळे फळे-भाजीपाला यात पोषकता वाढते. फळात गोडीचे (साखरचे) प्रमाण वाढते.
4) फळे/भाजीपाला लवकर परिपक्‍व होतो.
5) रताळे, कांदा इत्यादी भूमिगत कंद पिकांना पोटॅश व त्याचे मिश्रण देणे लाभदायक असते.
6) जे शेतकरी भाजीपाल्याच्या शेतीला पोटॅश वापरत नाहीत, त्यांच्या भत्तजीची पाने लहान-मोठी होतात. तसेच भाजीचे देठ कमजोर असतात. हे नुकसान टाळण्यासाठी भाजीपाल्याच्या शेतीला / बागेला पोटॅशियम सल्फेट हे रासयनिक खत द्यावे.

नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशच्या कमतरतेचा परिणाम ः-
वरील तीन खतांचा वा त्यांच्या मिश्रणांचा डोस भाजीपाल्याच्या बागेला/ शेतीला न दिल्यास किंवा कमी प्रमाणात दिल्यास रोपट्यांवर खालील दुष्परिणाम दिसतात.
1) मातीत पोटॅश कमी असल्यास रोपट्यांच्या पानांचा रंग सम प्रमाणात हिरवा दिसत नाही.
2) शेतातील मातीत चुन्याचेे प्रमाण अधिक असल्यास पाने जळून गळून पडतात.
3) नायट्रोजन कमी पडल्यास रोपट्यांची वाढ कमी होते. पाने पिवळी पडू लागतात.
4) शेतातील मातीत चुन्याचे प्रमाण कमी असल्यास पाने जरी हिरवी दिसत असली तरी ती गुंडाळली जातात.
5) पोटॅश व सल्फेटचे प्रमाण कमी असता, पाने वेळेआधीच गळून पडतात.
6) नायट्रोजन कमी असल्यास सुद्धा पाने गळू लागतात.
7) पोटॅश व सल्फेट यांच्या कमतरतेमुळे पानांचा रंग धूसर होतो.
8) वरील तिन्ही खतांपैकी एकाचे जरी असंतुलन झाले तरी रोपट्याच्या अवयवांवर काही ना काही परिणाम होतो.
9) बागेत/शेतात जर टोमॅटोचे पीक असेल आणि पोटॅश कमी पडले तर टोमॅटो एकसारखी येत नाहीत. आकरही वेडावाकडा होतो.
10 ) नायट्रोजनचे प्रमाण कमी पडल्यास पाने, फळे जळाल्यासारखी वाढतात.
11) शेताला नायट्रोजन जास्त झाले आणि फॉस्फरस कमी प्रमाणात मिळाला तर रोपट्यांची मुळे, फळातील दाणे व शेंगांची वाढ मंद होते.
12 ) फॉस्फेट व जुना यांचे प्रमाण कमी झाल्यास मुळांची वाढ थांबते.
13 ) कधी कधी पोटॅशच्या अभावामुळे फळांची पक्‍वता होत नाही किंवा फळे फार मंद गतीने पिकू लागतात.

भाजीपाला उत्पादकांनी लक्षात ठेवावे ः-
मोठी परसबाग असो वा गुंठ्या दोन गुंठ्यात भाजीपाला पिकवणारे शेतकरी असोत, त्यांच्यासाठी काही सूचना –
1) मातीत टाकलेले/मिसळलेले खत योग्य पद्धतीने शेतीला मिळावे असे वाटत असेल तर त्यात अत्यंत थोडा चुना मिसळावा.
2) जुना दर 2 ते 3 वर्षांनी शेतात टाकावा. तो कारणी लागतो.
3) प्रति वर्ग मीटरला 100 ग्रॅम जुना विखरून टाकावा.
4) खत टाकण्यापूर्वी एक महिना आधी चुना टाकावा. खताबरोबर जुना टाकू नये.
5. नायट्रोजन ,फॉस्फेट, पोअ‍ॅश यांचा उल्‍लेख आधी केलाच आहे. तसेच शेत जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियमही असावे. नसेल तर ते मातीत टाकावे. यासाठी माती परीक्षण करून घ्यावे म्हणजे कोणते खत किती वापरावे लागेल याचा अंदाज बांधता येईल.
6) शेतात भाजीपाला लावला असेल तर योग्य प्रमाणात मॅग्नेशियम द्यावे. हिरव्या पालेभाज्यांना ते आवश्यक असते. त्यामुळे पीक भरपूर येते. त्याची गुणवत्ताही वाढते. मॅग्‍नेशियममुळे भाजी लवकर तयार होते.
7) थोड्या प्रमाणात तांबे, जस्त, बोरॉन, मॅग्निज यांचे द्रावण वापरले तर भाजीपाला नजरेत भरेल असा येतो. त्याची पौष्टिकता व गुणवत्ता वाढते.
8) मॉलिब्डेनम, तांबे, जस्त, बोरॉन यांना सूक्ष्म खत किंवा पोषकता वाढवणारे द्राव्य मानले जाते. हे थेट वापरता येते किंवा खताबरोबर मिसळून देता येते.
9) वरील सूक्ष्म खते पाण्यात मिसळून ते पाणी झारीने किंवा फवार्‍याने शिंपडावे. रोपट्यांच्या पानांना त्यामुळे चमक वहिरवटपणा येतो.
10 ) कोणतेही खत एकाच प्रकारचे न वापरता ते मिश्रण स्वरुपात द्यावे.

थोडक्यात महत्त्वाचे ः-
परसबाग/ कीचन गार्ड जोपासणार्‍यांनी व शेतकरी बंधूंनी लक्षत्तत ठेवावे की, भाजीपाल्याची, फळांची, वेलींची रोपटी जमिनीतील पोषक तत्त्व (सत्त्व) घेऊन वाढत असतात. यासाठी जमिनीला खत पुरवठा अत्यावश्यक असतो.

जलसिंचनाची सोय ः-
कृषी-क्रिया म्हणजेच शेतकाम. शेतकाम करत असताना वेळोवेळी योग्य प्रमाणात जलसिंचन करणे गरजेचे असते. शेतीतील इतर कामे केली, पण जलसिंचनच केले नाही तर आपण पीक किंवा भाजीपाला यांचे उत्पन्न घेऊ शकणार नाही.
उन्हाळ्यात जर बागेला/शेतीला पाणी दिले नाही तर रोपे वाळून-सुकून जातील. मग त्यावर पाने-फुले-फळे कधी येणार? व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवणार्‍यांनी जलसिंचनासाठी योग्य ती सोय करणे आवश्यक असते. पावसाळ्यात बागेला/शेतीला पावसाचेपाणी मिळते, पण हे पाणी साठवण्याची सोयही असावी. विहीर किंवा पाटपाण्याची सोयही असावी. दीर्घकाळ भाजीपाला देत राहणार्‍या बागेसाठी/शेतीसाठी योग्य आणि वेळेवर जलसिंचन करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात शेतीला/ बागेला दिवसातून दोन वेळा भरपूर पाणी द्यावे लागते. पाणी कमी पडल्यास पिके होरपळतील. विहीर असेल तर किंवा ट्यूबवेल असेल तर फारशी काळजी नसते पण कालवा व पाटपाणी असेल तर जलसिंचनासाठी जागरुक असावे लागते. पाणी योजनेचे पाणी मिळणे दुरापास्त असते. 8-10 दिवसांतून एकदा पाण्याची पाळी मिळते. त्यामुळे पाण्याची जपणूक, साठवणूक आवश्यक असते. जलसिंचनाची सुनिश्‍चित व्यवस्था असावी.
अ) जलसिंचन म्हणजे वरच्यावर झारीने पाणी टाकणे असे नाही.
ब) थंडीच्या दिवसात पाणी जमिनीखाली 10 सें.मी. पर्यंत चिरले पाहिजे.
क) उन्हाळ्यात जमिनीत 15 सें.मी. खोलीपर्यंत पाणी जिरले पाहिजे.
ड) ज्या भाजीच्या जातीची मुळे खूप खोलवर जातात, त्यांना खोलवर पाणी मिळेल असे जलसिंचन करावे लागते तर ज्यांची मुळे कमी खोलीवर वरवर असतात, त्यांना जलसिंचन कमी करावे.

वेळोवेळी खुरपणी करावी ः-
अनावश्यक गवत, कोमेजलेली, अपुर्‍या वाढीची रोपटी काढून टाकण्यासाठी शेतात/बागेत वेळोवेळी खुरपणी करणे व रोपांच्या मुळाशी/ देठाशी माती टाकणे ही कामे करावी लागतात. याबद्दलची माहिती थोडक्यात-
1) जिथे भाजीपाला पिकवला जातो अशा बागेत/शेतात खुरपणी करणे आवश्यक असते.
2) काही शेतकरी जलसिंचनाकडे जास्त लक्ष देतात, पण खुरपणीकडे दुर्लक्ष करतात. खुरपणी केली नाही अपेक्षित उत्पन्न घटते.
3)खुरपणी केल्यामुळे फालतू गवत, काड्या, पालापाचोळा काढून टाकला जातो. त्यामुळे भाजीपाल्याला योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये मिळतात.
4) रोपटी आपल्या मुळांमार्फत श्‍वसन करणे, पाणी शोषून घेणेआणि खत पचवण्याचे कार्य करीत असतात. खुरपण व जलसिंचन केल्यामुळे मुळांना आपले कार्य सहज व सोपे होते.
5) खुरपणी करताना मुळांना धक्‍का लागेल अशी कृती करू नये. मुळे दुखावली तर रोपटे कोमेजून जाईल.
6) खुरपणीमुळे रोपटे जमिनीतील पोषकद्रव्ये सहज घेऊ शकतात. त्यांची नैसर्गिक वाढ होण्यास अडचणी येत नाहीत.

निगरणी ः-
रोपट्याची देखभाल, किडींपासून रोपट्यांचा बचव, रोगराई येऊ नये म्हणून घ्यायची दक्षता, भाजी काढणे/छाटणे, बी-बियाणे जमवणे या बाबी निगराणीत येतात.
1) भाजीपाल्याच्या भरपूर उत्पन्नासाठी खातीशीर बी-बियाणे वापरा.
2)स्थानिक जातीचे साधे बी-बियाणे घेऊ नका.
3) रोगरहित जातीचीच निवड करा.
4) बी-बियांची साठवण व जपणूक काळजीपूर्वक करावी.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा  8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.