जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे आवाहन
औरंगाबाद / प्रतिनिधी
औरंगाबाद येथे दि. 16 जानेवारी ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत नवव्या राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अनुषंगाने 15 जानेवारी 2019 रोजी वाल्मी, औरंगाबाद येथे महाराष्ट्रातील व इतर राज्यातील अंदाजे 150 शेतकरी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यशाळेला उपस्थित राहणार्या शेतकर्यांची राहण्याची व इतर व्यवस्था वाल्मी, औरंगाबाद करणार असून त्यापैकी काही शेतकर्यांना दि. 16 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेस शेतकर्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे. हॉटेल अजंता म्बिसिडोर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, केंद्रीय पाणीपुरवठा विभागाचे संचालक गिरीराज गोयल, केंद्रीय जल समितीचे संचालक अनुज कनवाल आदी उपस्थित होते.
15 जानेवारी रोजी होणार्या कार्यशाळेचे उद्घाटन जलसंधारणमंत्री राम शिंदे करणार असून कृषी सचिव एकनाथ डवले, राजेंद्र पवार, सचिव (लाक्षेवि) उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी डॉ. येल्लारेड्डी, उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय सिंचन व जलनिस्सारण परिषदेचे भारताचे उपाध्यक्ष व राहुरी विद्यापीठाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी कडवंची पाणलोट क्षेत्रास भेट आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने सहभागी शेतकर्यांना या विषयाचे महत्व व त्यामधील अडीअडचणी बाबतही उहापोह केला जाणार आहे. तरी या कार्यशाळेस शेतकर्यांनी मेाठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे वाल्मी, औरंगाबादचे महासंचालक दीपक सिंगला (भा.प्र.से.) यांनी सांगितले आहे.