सध्या आपल्या देशात मशरूम उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. संपूर्ण वर्षात जवळजवळ ७३ हजार टन मशरूम उत्पादन होते. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ म्हटले जाते. पावसाळ्यात येणारी ही वनस्पती आहे. मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकर्यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. अद्ययावत तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो. मशरूम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे शेतीत ज्याला टाकाऊ पदार्थ म्हणून ओळखले जाते अशी सोयाबीन व गव्हाची गुळी, शिवाय साखर कारखान्यात शिल्लक राहिलेला बगॅस (उसाचा रस काढून शिल्लक राहिलेला चोथा) याला सर्वाधिक महत्त्व आहे. २५ दिवसात या कच्च्या मालाचे खत तयार केले जाते. त्यात कोंबडीची विष्ठा, जिप्सम, डिओसी मिसळून त्यानंतर मशरूमचे उत्पादन मिळण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी लागतो. पुढील १५ ते २० दिवस हे उत्पादन विक्रीस उपलब्ध होते. आपल्या देशात १९६८ साली आयसीएआर दिल्ली येथे हिमाचल प्रांतातील सोलन येथे मशरूमचे संशोधन करणारे केंद्र सुरू झाले. मशरूम म्हणजे बुरशीवर्गीय भाजी आहे. जगभरात सुमारे १७ ते १८ हजार याचे प्रकार आहेत. मात्र खाण्यासाठी बटन मशरूम, ऑइस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. उर्वरित प्रकाराचे औषधी व विविध लाभ आहेत.
काड भिजवणे:-
प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे.
निर्जंतुकीकरण:-
निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले काड १ तास ठेवावे. त्यानंतर २ तास निर्जंतुक केलेले काड निथळण्याकरिता ठेवावे.
बी पेरणे:-
प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे. बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा थर, असे करून पिशवी भरावी.
बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे. पिशवी भरल्यावर दोर्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.
उबविणे:-
बुरशीच्या वाढीकरिता उबविणे ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे.
पिशवी काढणे:-
पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. तापमान २० ते ३० अंश सेल्सियस व आद्रता ७०-८५% राहील याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.
काढणी:-
मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.
एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.
साठवण:-
ताज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. ४-५ दिवस फ्रीजमध्ये मशरूम उत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वळते. मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.
योग्य व्यवस्थापन यशाची गुरुकिल्ली
मशरूम उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी :–
१. मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.
२. मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.
३. मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी.
४. खोलीतील तापमान ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०% राहील याची काळजी घ्यावी.
५. आळिंबी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा.
६. नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.
७. काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.
८. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा.
९. मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.
१०. पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे.
११. पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.
१२ .रोग, किडीचा, चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान ( १ मि.मि., १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)
१३. आळिंबीचे स्पॉन विश्वसनीय संस्थेमार्फतच घ्यावे. जुने, काळसर, हिरवी बुरशी असणारे स्पॉन वापरू नये.
१४. भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षण करावे.
१५. मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.
अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
http://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!