मका तुटवड्यामुळे पशुखाद्य निर्मिती महागली
दुष्काळी स्थिती,लष्करी अळीचा परिणाम
राज्यातील डेयरी व पोल्ट्री उद्योगासाठी आवश्यक असलेल्या मक्यासाठी यंदा १३०० कोटी रुपये जादा मोजावे लागत आहेत. मक्याच्या टंचाईमुळे डेयरी उद्योगातील ५० किलोच्या पशुखाद्य बॅगची किंमत १०५० रुपयांवरून १२५० रुपये झाली आहे. राज्यातील डेयरी उद्योगाला पशुखाद्यनिर्मितीचा खर्च पाच रुपये प्रतिकिलोने महागला आहे. दुष्काळी स्थिती व लष्करी अळीमुळे खरीप हंगामातील मका उत्पादन घटणार असल्याने डेयरी उद्योग चिंतेत आहे.
दुध व्यवसायातील जाणकारांच्या माहिती नुसार पाच वर्षापूर्वी राज्यात साधारण सव्वा दोन ते अडीच कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत होते. मात्र सततचा दुष्काळ, चारा व पाणीटंचाई, खाद्याचे वाढते दर आणि दुधाला मिळणारे कमी दर या कारणाने दीड कोटी लिटरवर दुधाचे उत्पादन आले आहे. दोन वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे छावण्यातील जनावरांना पुरेसे पोषण खाद्य मिळाले नसल्याने सतत उसाचा चारा खाण्यात येत असल्याने जनावरे कुपोषित झाले असून, त्याचाही दुध व्यवसायावर परिणाम होत आहे आणि यंदा अमेरिकन लष्करी अळीने दुध संकटात भर पडली आहे.
लष्करी अळीमुळे सर्व मका वाया जात आहे. आधीच दुष्काळ, चारा टंचाई आणि आता लष्करी अळीचा हल्ला यामुळे अडचणीत असलेल्या दुध व्यवसायावर आगामी काळात गंभीर संकट येत आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त होऊ शकतो. चारा देणारी पिके जर वाया गेली, तर चारा कोठून आणायचा हा दुष्काळापेक्षाही गंभीर प्रश्न असेल !
उपाययोजनाही ठरल्या कुचकामी
लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर कृषी विभागाने उपाययोजना करीत असल्याचा देखावा केला, मात्र प्रत्यक्षात कोणतीही योजना कामी आली नाही. प्रादुर्भाव रोखण्यात सगळ्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. नुकतीच जिल्हा पशु संवर्धन विभागांनी प्रादुर्भाव झालेल्या मक्याबाबत कृषी विद्यापीठांकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार लष्करी अळीचा प्रादुर्भाव असलेल्या मक्यावर जैविक कीटकनाशकांची शिफारस आहे. रासायनिक फवारणी केल्यानंतर किमान महिनाभर जनावरांना चारा खाऊ घालू नये. मुरघासही एक महिन्यानंतर करावा, असा सल्ला दिला जात आहे.
मक्याचे करायचे काय ?
मका आता काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र लष्करी अळी पडल्याने तो मका बाधित झाला आहे. बहुतांशशेतकरी मक्यापासून मुरघास करतात. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेला मका त्वरित खाऊ घातल्यास जनावरांना विषबाधा होण्याचा धोका आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या मक्याचे करायचे काय असा प्रश्न सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
इतर पिकांवर सुद्धा अळी येण्याची भीती
सध्या मक्यावर असलेली हि अळी आगामी काळात इतर पिकांवर आली तर बिकट परिस्थिती निर्माण होईल. अशी भीती शेतकऱ्यांसह कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनाही भेडसावत आहे. सलग दोन हंगामांपासून मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या तृणधान्यावर अवलंबून असणारी हि अळी उद्या( रब्बीत) गहू, हरभऱ्यावर आली तर समस्या वाढू शकते.
मक्याचाएकरी खर्च ( रुपये ) | |
नांगरणी | १००० |
रोटाव्हेटर | ५०० |
बियाणे | १५०० |
पेरणी खर्च | ७०० |
खत ( दोन वेळा ) | ३००० |
फवारणी ( दोन ) | २००० |
ताण नियंत्रण | १५०० |
कोळपणी | ५०० |
कापणी | २००० |
मळणी | २००० |
इतर | १००० |
एकूण खर्च | १५७०० |
मक्याचे दरवर्षीचेसरासरी उत्पादन | |
एकरी उत्पादन | २० क्विंटल |
मिळणारा सरासरी दर | १३०० |
उत्पन्न | २६००० |
खर्च | १५७०० |
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.