मराठवाड्यातील स्थलांतर : कृषीक्षेत्रातील वाताहतीची झळ

0

जागतिक मंदी, आयटी क्षेत्रातील मंदी, तर कधी रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीवर सर्वच माध्यमे, तज्ज्ञ चिंता करताना आपण पाहतो. आयटीमधील मंदीनंतर भारतात नैराश्याने परतलेल्या इंजिनिअर्सचीही समस्या राष्ट्रीय बातमी झाली. या नैराश्यातून अनेक इंजिनिअर्सनी आत्महत्या केल्या. ही बाब दुर्दैवी आहेच. मात्र, मराठवाड्यासारख्या भागात सातत्याने पावसाने दडी दिल्यामुळे निर्माण झालेला भयावह दुष्काळ व त्यातून आलेली ग्रामीण भागातील मंदी या प्रश्‍नाला कधी तीव्र व गंभीर स्वरूप मिळालेच नाही. झालंच तर दुष्काळामुळे आठवडी बाजार कसा ओस पडला, अशी एक स्टोरी करून माध्यम व वाचक, दर्शक मोकळे होतात. दुष्काळामुळे माणसं बाजारात खरेदीलाच आली नाहीत, म्हणजे काय ते उपाशी झोपले असतील का, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालला असेल, ते काय खात असतील, जिथं अन्नपाण्याचा प्रश्‍न असताना तिथं आरोग्य, शिक्षण, संस्कार, मनोरंजन, विरंगुळा या प्रकारांचे काय होत असेल, हा विचार न केलेला बरा. अशा असंख्य प्रश्‍नांनी ग्रासलेला, पिचलेल्या ग्रामीण भागातील गावकरी या भयावह मंदीला कंटाळून मुंबई, पुणे, औरंगाबादसारख्या शहरांचा रस्ता जवळ करत आहे.

उदास खेडी…बकाल शहरे
अगोदरच बकालीकरणाच्या गर्तेत आडकलेल्या या महानगरांमधील ही अतिरिक्त गर्दी मग शहराला ओझे ठरते. पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्याच्या समस्या इथेही सुटत नाहीत. याउलट गुन्हेगारी, कमी कष्टात जास्त पैसे कमविण्याचा हव्यास, चैनीचे जीवन या गोष्टी आणखी खोलात घेऊन जातात. गावकडं उसाच्या फडात, मोसंबीच्या बागेत छाती फुलवून चालणारे भूमिपुत्र जेव्हा आठ-दहा हजारांच्या नोकरीसाठी कंपनीतल्या साहेबांपुढे स्वाभिमान बाजूला ठेवून वाकतो तेव्हा महात्मा गांधींनी पाहिलेल्या समृद्ध खेड्याचे वैभवच त्याच्या रूपाने क्षीण होऊन लोळत असल्याचे भासते. स्वातंत्र्यानंतर खेडी बकाल होत गेली. आपण ग्रामीण भागात रोजगार, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण उपलब्ध करू शकलो नाहीत म्हणून खेड्यातील माणसं शहराकडे धावली. खेड्यातून रोजगारासाठी पुण्याला गेलेला बेरोजगार कर्वेनगर, सदाशिव पेठेत राहायला तर जाऊच शकत नाही. पुण्याच्या सभोवताली पसरलेल्या विविध झोपडपट्या अथवा उडडाणपूल, बांधकाम सुरू असलेल्या मोठमोठया इमारतीच या लोकांचे निवासाचे ठिकाण. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्याची समस्या इथंही. फरक तो एवढाच इथं हाताला काम आहे व त्यामुळं रात्री पोटात अन्न पडतं. प्रत्येक शहराची रस्ते, पाणी इतर सुविधांसाठीची एक ठरलेली क्षमता आहे. या अनअपेक्षित गर्दीच्या ओझ्याने मग या व्यवस्था कोलमडून जातात. शहर विस्तारलं म्हणजे ते विकसित झालं, असे म्हणता येणार नाही. ही फक्त विकासाची सूज आहे, ती केव्हातरी उतरणारच. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरित होणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण विकासाचा गाडा चालविताना केवळ हे स्थलांतर का होत आहेत, याचा सखोल अभ्यास केला तर गावकर्‍यांना काय हवय व ग्रामविकासाची नेमकी व्याख्या काय, हे स्पष्ट होईल.

मराठवाड्यातील स्थलांतर ः व्यवस्थेचे अपयशच
आपला गाव प्रत्येकाला हवासा असतो. वडिलोपार्जित शेती, पिढ्यान्पिढ्याच्या आठवणी दडलेले घर, मोकळेपणा देणारं शेत-शिवारं कुणाला नकोय. गाव सोडून जाणे म्हणजे एक प्रकारे तिथल्या एकूणच व्यवस्थेचे ते अपयशच म्हणावे लागेल. सततच्या दुष्काळामुळे शेती व्यवसाय मोडीत निघाला. परिणामी यावर अवलंबून असलेले मजूर, कारागीर बेकार झाले. गावातील अर्थचक्र शेतीभोवतीच. शेतकर्‍याकडेच नाही म्हटल्यानंतर गावातील मजूर, कारागीर, व्यवसायिक, दुकानदारांचा धंदा मंदावला. या मंदीतून टेलरिंग व्यवसायापासून ते ज्वेलर्स, किराणा व्यापारी, कापड दुकानदार यासह भाजीपाला व्यवसायिकही यातून सुटला नाही. केवळ पाण्याचे बेसुमार नियोजन आणि निर्सगाने दिलेली दडी यामुळे ग्रामीण भागाचा कणाच मोडून पडला आहे. खेड्यांमधील दहापैकी किमान चार घरांतील सदस्य रोजगाराच्या शोधात तालुका,जिल्हा, प्रसंगी औरंगाबाद, पुणे, मुंबई, हैदराबादलाही स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित कुटुंबातील एक व्यक्ती जनावर व माणसांसाठी पाणी मिळविण्यासाठी वणवण करत आहेत. बँका दारात उभे करण्यास तयार नाहीत, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह, कुटुंबातील आजारपण अशा अनेक समस्यांमधून जमिनीचा दरवर्षी एकेक तुकडा कमी होत आहे. अशा भयंकर अडचणीत असलेल्या या ग्रामीण भागाचा ग्रामविकास करण्याचे आवाहन मायबाप म्हणविणार्‍या सरकारकडेच आहे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा  8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.