भाजीपाला लागवडीच्या पद्धती व त्याचे फायदे

0

भाजीपाल्याची लागवड कशी व का केली जाते? त्याची पद्धती कशी? त्यासाठी लागणारे हवामान, माती, पाणी, खते इत्यादी बाबी आणि शेतीचे प्रकार कोणते? असे अनेक प्रश्‍न सामान्य जणांच्या मनात उद्भवत असतात. अशा प्रश्‍नांची उत्तरे सरळ सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळाल्यास प्रश्‍नकर्त्यांच्या मनाचे समाधान होते. यासाठी प्रमुख चार बाबी प्रथम विचारात घ्याव्या लागतात. 1. आपल्याकडे शेतीची साधणे कोणकोणती आहेत? 3. आपण धान्य लावणार की भाजीपाला हे ठरवावे. 3. हे शेतीकाम प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याकडे कोणती व्यवस्था / उपलब्धता आहे? 4. शेती केल्यानंतर शेतमाल बाजारपेठेकडे पाठविण्यासाठी व विक्रीसाठी आपण काय करणार आहोत? तशी व्यवस्था आहे की नाही?
वरील चार बाबी महत्त्वाच्या आहेत. शेती वा भाजीपाला पिकवण्यासाठी हे लक्षात घेऊन भाजीपाल्याची शेती दोन प्रकारात येते. 1. आपल्या वैयक्‍तिक गरजेसाठी किचन गार्डनमध्ये पिकवला जाणारा भाजीपाला. 2. रोजगार व कमाईसाठी व्यावसायिक शेती.
या शिवायही शेतीसंबंधाने अनेक जोडधंदे असतात. त्याचा सखोल विचार करून नियोजनपूर्वक आपण पैसा मिळवू शकतो. अर्थात त्यासाठी बाजारपेठांची/ मंडईची माहिती, भाजीपाल्याचे दर, मालाची साठवणूक करता येण्यासारखी जागा, याकडे लक्ष दिल्यास व तशी व्यवस्था असल्यास आपण पैसा कमावू शकतो. आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या जमिनीचा व इतर बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
1.शेततळे, तलाव उपलब्ध असेल तर त्यातही भाजीपाल्याचे पीक आपण घेऊ शकतो.
2. काही जण भाजीपाला न विकता भाजीपाल्यापासून उच्च प्रतीचे बी-बियाणे तयार करून ते पॅकिंग करून बाजारात विक्रीस आणतात.
3. काही जण केवळ आपल्या घराच्या, शेताच्या कुंपणासाठी व खाण्यासाठी भाजीपाला लावतात.
4. योग्य ऋतू/हवामान पाहून बहुतेकजण भाजीपाल्याचे उत्पादन घेतात, पण जे ऋतू नसताना बेमोसमी पीक घेतात ते भरपूर आर्थिक कमाई करतात.
किचन गार्डन (गृहवाटिका) मध्ये भाजीपाला पिकवणे
तुमच्या घराच्या अंगणात वा परसदाराशी थोडी जमीन असेल आणि तुम्हाला भाजीपाला पिकवण्याची आवड असेल तर थोड्या कष्टात, आवडीनुसार वेळ देऊन तुम्ही भाजीपाला पिकवू शकता. स्वतः पिकवलेल्या भाजीचे सेवन करताना मनाला आनंद तर मिळतोच, शिवाय आपल्याला स्वास्थ्य लाभही होतो. यामुळे..
अ) कुटुंबाची रोजची भाजीपाल्याची काळजी मिटते.
ब) रोज ताजी भाजी मिळते. अशा भाजीची गुणवत्ता श्रेष्ठ असते.
क) ताजा भाजीपाला स्वास्थ्यलाभ देतो.
ड) घरातील सर्वांनीच या गृहवाटिकेच्या कार्यात लक्ष घातल्यास विविध प्रकारचा भाजीपाला लावता येईल.
इ) हल्‍ली अनेक परिवार गृहवाटिकेच्या कामात रुची घेऊ लागले आहेत. तसेच अधिकाधिक माहिती जमा करून गृहवाटिकेची उपयुक्‍तता वाढवू लागले आहेत.
फ) फावल्या वेळेत गृहिणी आपल्या किचनगार्डनची काळजी घेताना दिसताहेत. त्यांना घरच्याघरी भाजी पिकवण्याचे कार्य आनंददायी वाटू लागले आहे. काहीजणी त्यातून आर्थिक लाभ घेत आहेत.
किचन गार्डनसाठी जागा ः
घरगुती बागेत , उपलब्ध जागेत, भाजी लावण्याची माहिती सर्वांना आहे, असे गृहीत धरू. मोकळी जागा नसेल तर पत्र्याच्या डब्यात, घमेल्यात, कुंडीत किंवा घराच्या छतावरही भाजीपाल्याची लागवड करता येते.
भरपूर जागा असल्यास ः
घराच्या मागे किंवा पुढे, घराच्या डाव्या वा उजव्या बाजूस कोठेही भाजीपाला लावता येतो. भरपूर जागा असेल तर प्रत्येक मोसमात भाजीपाल्याची विविध पिके घेता येतील. त्यामुळे रोज मंडईत जायला नको तसेच आर्थिक बचतही होईल.
जागा मर्यादित असल्यास ः
किचन गार्डन अर्थात गृहवाटिकेसाठी मर्यादित जागा असल्यास फक्‍त मोसमी पालेभाज्या घेता येतात.
कमी जागा असल्यास ः
काही घराभोवती फारच कमी जागा असते, त्यांनी कमी प्रमाणात कुंडीत वा पत्र्याच्या घमेल्यात, डब्यात अल्प प्रमाणात भाजीपाला लावावा. काही फळभाज्यांच्या वेली घरावर वा भिंतीवर चढवून आपली हौस पूर्ण करता येईल.
अनेक मजली इमारतीत ः
आपण जर शहरात फ्लॅटमध्ये राहात असाल तर भाजीपाला लावण्यास जमीन नसणार. तरीसुद्धा आपल्याआडीला मुरड घालू नका. कुंड्या, डबे, मोकळे ड्रम, छतावर वा बाल्कनीत ठेवून काही निवडक भाजीपाला लावू शकतात. यासाठी मिरची, ढब्बू मिरची, भेंडी, पुदिना, कोथिंबीर, कांदे यांची लागवड योग्य होईल.
सावधानी ः
डबे, कुंड्या यात भाजी लावण्यापूर्वी काही सावधानता ठेवावी लागते. 1. जिथे कुंड्या ठेवणार असाल तिथे वॉटरप्रुफ रंग द्यावा, यामुळे सिमेंट उखडले जाणार नाही व चिखलमातीचे ओघळ सहज धुता/पुसता येतील. 2. कुंड्या उन्हात काही तास तरी राहतील याची खबरदारी घ्या. 3. कुंड्यांना धूर वा गॅस यांचा उपद्रव होता कामा नये.
गृहवाटिकेचे फायद
आपण कोणतेही काम काही ना काही फायद्यासाठी वा उपयोगासाठी करत असतो. फायदा मिळणार नसेल तर कोणीही फुकटचा उद्योग करणार नाही. गृहवाटिकेपासून कोणते फायदे होऊ शकतात याची माहिती पुढीलप्रमाणे.
1. गृहवाटिकेत काम केल्याने शरीराला थोडाफार व्यायाम होतो. हा व्यायाम सार्थकी लागतो. त्यामुळे शरीर स्वस्थ राहते.
2. अशा कामामुळे मनोरंजनही होते आणि आपण लावलेल्या रोपट्यांची कशी वाढ होते याकडे लक्ष लागल्याने मनाला आनंद होतो.
3. हा फावल्या वेळेचा शौक मानायला हरकत नाही. गृहिणी व लहान मोठ्या व्यक्‍तीसुद्धा गृहवाटिकेत काम करण्याचा आनंद घेऊ शकतात. यातून आर्थिक लाभही घेता येतो.
4. हा केवळ शारीरिक व्यायाम नव्हे तर मेंदूलाही स्वस्थ ठेवण्याचा व मन गुंतवण्याचा उपाय आहे. घरात वा भोवताली हरित वनस्पती असल्यास बुद्धी अधिक प्रभावी होते.
5. घरच्याघरी आनंद देणारे हे काम आहे. यासाठी कपडे बदलण्याची, नटूनथटून कोठे जाण्याची गरज नाही. दिवसातला तास, अर्धा तास या किचन गार्डनसाठी खर्च केलात तरी पुरे.
6. घरातली कोणीही व्यक्‍ती आपल्या आवडी व सवडीनुसार हे काम करू शकते.
7. ज्याला वनस्पतीच्या रोपट्यांची व मातीकामाची आवड आहे त्याला हे काम चांगले करता येते.
8. घरच्याघरी पिकवलेली भाजी स्वतः काढून वापरण्यात जो आनंद आहे, त्याला सीमा नाही.
9. आपल्या किचन गार्डनची भाजी भरपूर, पौष्टिक स्वादपूर्ण आणि गुणवत्तेत अग्रणी असते.
10. शाळेला जाणार्‍या मुलांनी जर किचन गार्डनमध्ये लक्ष घातले तर त्यांची सर्जनशक्‍ती वाढते. निसर्गाच्या जवळ जाण्याचा व निसर्ग समजून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
11. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या पत्रिकेतील बुध अनिष्ट आहे अशा व्यक्‍तींनी रोपट्यांना दररोज पाणी द्यावे म्हणजे बुध सौम्य होतो व बुद्धी वाढते.
भाजीपाला लागवडीसंबंधी विशेष बाबी
गृहवाटिकेत भाजीपाला लावण्यासंबंधाने काही विशेष बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्व काम नियोजनपूर्वक करण्याची सवय असावी लागते. नियोजन नसेल तर यश येत नाही. नियोजनामुळे कमी श्रम, खर्च कमी व अधिक लाभ होतो. याकरिता पुढील बाबी लक्षात ठेवा.
1. गृहवाटिकेसाठी माती चांगलीच हवी असे नाही. माती कोणतीही असो तिला शेतीयोग्य बनविता येते.
2. तुमच्या मातीत लहान-मोठे खडे असतील तर अशीमाती खडकाळ समजावी. यात रेतीचे प्रमाण कमी असते किंवा ती चिकणमाती असते. अशा मातीत जैविक पदार्थ घालून किंवा रेती मिसळून तिची उगवण शक्‍ती वाढवता येते.
3.आपली गृहवाटिका घराच्या जवळ आहे की थोडी दूर हे लक्षात घ्या. गृहवाटिकेभोवती कुंपण असणे आवश्यक असते. कारण पशू-पक्षी, जनावरे, लहान मुले वा वाटसरुंनी गृहवाटिकेत प्रवेश करता कामा नये. भाजीपाल्याच्या वेळी व रोपटी नाजूक असतात, त्यांना हानी पोचणार नाही याची दक्षता घ्या.
4. गृहवाटिकेतील भाजीपाला सहजपणे घरात आणता येईल अशी व्यवस्था असावी.
5. कुंड्यात, घमेल्यात वा मातीच्या आळ्यात कधीही बादलीने पाणी ओतू नका, माती वाहून जाण्याची शक्यता असते. घराच्या वापरातील खरकटे पाणी गृहवाटिकेच्या रोपट्यांना देऊ शकता, पण त्यात साबण वा केमिकल नसावे. प्लास्टिक पाईप, स्प्रे, झारीने हलक्या हाताने पाणी द्यावे.
6. केळी, अळू यांना मोरीतून वाहणारे वा स्नानगृहातील वापराचे पाणी चालते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
7. गृहवाटिका सावलीत नसावी. सावली असेल तर मेहनतीच्या प्रमाणात यश येत नाही रोपांची वाढ खुंडते. रोपट्यांवर सूर्यप्रकाश राहील अशी जागा असावी.
8. पालेभाज्या, फळभाज्या यांच्या उगवणीचे व वाढीचे मोसम (ऋतू) ठराविक असतात. असे मोसम येण्यापूर्वीच भाजीच्या बियाणांच्या रोपणासाठी मातीची आळी, कुंड्या, घमेल्यातून खत मिश्रित माती भरावी व बिया त्या मातीत रोपाव्यात.
9. आपल्या परिवारातील सदस्यांना कोणती भाजी आवडते ते लक्षात घेऊन बियाण्यांची निवड करावी. तसेच माती कशी आहे, जलसिंचनाची कोणती व्यवस्था आहे, याकडे लक्ष द्या. योग्य वेळी योग्य निर्णय हा शेती व्यवसायाचा मूलमंत्र आहे.
10. गृहवाटिकेला आपण किती वेळ देऊ शकतो, याचा विचार करून तेवढ्याच जागेत भाजीपाला पिकवा. उपलब्ध साधनसामग्री, पाणी याचाही विचार करा. कमी जागेत योग्य नियोजन करून भरपूर उत्पादन घेता येते.
11. कुंड्या असोत वा मोकळ्या जागेतील मातीचे गादी वाफे, त्यात वावरताना अडचणी नसाव्यात. सहजपणे काम करता येईल अशी व्यवस्था करावी.
12. जी भाजी दीर्घकाळ उगवत राहते अशा वेली वा रोपटी गृहवाटिकेच्या मधोमध न लावता ती कडेला लावावीत.
13. जी पिके लवकर काढणीला वा उपयोगाला येतात ती दाट न लावता अंतराने असावीत. अशा पिकांच्या बिया पेरतानाच अंतर ठेवावे.
गृहवाटिकेसाठी खत ः
अ) गृहवाटिका आपण आपल्या परिवारासाठी तयार करतो. यासाठी शेणखत वापरले तर योग्य होईल. तसेच कम्पोस्ट खत गादीवाफ्यांना उपयुक्‍त ठरेल. शेणखत कुजलेले असावे.
ब) कोणतेही खत एकदम शेतात,वाफ्यात टाकू नये. तर ते फोडून मातीसारखे करावेव ते मातीत मिळसून शेतात, वाफ्यांत व कुंड्यात टाकावे.
क) रोपटी उगवल्यानंतर रासायनिक खते योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून रोपांच्या मुळांशी झारीने द्यावीत. हा खुराक रोपवाढीस योग्य होय.
ड) कोणतेही रासायनिक खत रोपांच्या मुळांना वा बियांना थेट पोहोचता कामा नये. रासायनिक खते उष्ण असतात.थेट वापरल्यास बया व रोपटी जळून जातात. ही खते खोडापासून दूर मातीत पाण्याबरोबर द्यावीत.
इ) गृहवाटिकेसाठी कोणते खत पिकानुसार किती प्रमाणात द्यायचे याबद्दल अनेक शेतीतज्ज्ञ अनेक प्रकारे सल्‍ला देतात. सर्वसाधारणपणे माहिती असावी म्हणून खालील मुद्दे लक्षात घ्या. जर गृहवाटिकेत दहा वर्गमीटरचे दहा भूखंड अथवा गादीवाफे असल्यास त्या जमिनीसाठी –
1. अडीच गाड्या किंवा 13 क्‍विंटल शेणखत किंवा कंपोस्ट खत आवश्यक.
2. मातीत पेरणीपूर्वी मिसळण्यासाठी 16 किलो अमोनियम सल्फेट आवश्यक आहे.
3. पेरणीपूर्वी अमोनियम सल्फेट मातीत मिसळणे शक्य न झाल्यास,रोपे उगवून आल्यानंतर त्यांच्या मुळांपासून दूर चारी बाजूंनी अमोनियम नायट्रेट वापरावे.
भाजीपाल्याचे बीजारोपण ः
1) बी-बियाणे उच्च दर्जाचे वा नामवंत कंपन्यांचे असावे. हलक्या जातीचे बीजारोपण केल्यास श्रम वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळ वपैसा व्यर्थ जातो.
2. बीजोरोपणाची वेळ/काळ योग्य असावी. चुकीच्या वेळी जर पेरणी केली तर गृहवाटिकेचे नुकसान होते. काहीही प्राप्ती होत नाही.
3. मातीचा प्रकार कोणता हे बीजारोपण करताना लक्षात घ्यावे.
अ) माती दाट, वजनदार असेल तर बियाणे वरच्यावर पेरावे.
ब) माती हलकी व भुसभुशीत असेल तर बियाणे जरा खोलवर पेरावे.
4. आपण तयार रोपटी आणून लावा किंवा बी पेरा, ते ओलसर मातीने झाकले गेले पाहिजे.
5. बियाणे खोलवर पेरल्यास व अधिक बिया एकाच जागी टाकल्यस पीक किंवा भाजीपाला चांगल्याप्रमाणात घेता येत नाही. कारण त्या बियाणांना त्यांच्या वाटणीचा खताचा खुराक योग्य मात्रेत मिळत नाही. सबब उगवलेले रोपटे स्वस्थ व तंदुरुस्त नसते.
6. जेव्हा अंकुर जमिनीवर दिसू लागतील तेव्हा योग्य वाढ झालेले अंकुर तेवढेच ठेवावेत. निर्बल व अशक्‍त अंकुर काढून टाकावेत. या कृतीला विरळणी म्हणतात.
7. फळभाज्यांची वेल लावणार असाल तर त्याचे बियाणे कुंपणाच्या वा भिंतीच्या कडेला पेरावे. कारण वेल वाढू लागताच तो भिंतीच्या वा कुंपणाच्या आधाराने उंच चढवता येईल. वेल उंच वाढून भिंतीवर वा कुंपणाच्या काठ्यांवर पसरला की उत्पादन चांगले मिळते.
8. गृहवाटिकेत बी-बियाणे पेरतानाच जागेचे योग्य नियोजन करा म्हणजे सर्वत्र दाट भाजीपाला उगवलेला दिसावा. जागा मोकळी राहता कामा नये. भरपूर रोपटी/वेली म्हणजेच उत्पादनही भरपूर.
9. भाजीपाल्याच्या बी-बियाण्यांची माहिती तज्ज्ञांमार्फत घेऊन लवकर उगवणारी व भरपूर उत्पादन देणार्‍या बियाण्यांच्या जाती निवडल्यास दीर्घकाळापर्यंत उत्पादन मिळत राहते. उदा. मटार ही एक शेंगभाजी आहे. याच्या तीन जाती आहेत. त्यांची नावे अरकिल, लखनऊ बिनिया आणि असोजी. यांचे बियाणे मिळवून ऑक्टोबर महिन्याच्या 10 ते 20 तारखेपर्यंत पेरणी केल्यास डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पीक हाताला येते. या शेंगभाजीची वेल लवकर वाढते व दीर्षकाळ उत्पादन देऊ लागते. फेब्रुवारी ते मार्चच्या मध्यापर्यंत वेलीला शेंगा येत राहतात. वेलीची योग्य देखभाल व किडीपासून संरक्षण याची दक्षता घ्यावी लागते.
निगराणी ः
1. पालेभाज्यांच्या शेत जमिनीची नांगरणी फार खोलवर न करता वरचेवर निरंतर झाली पाहिजे.
2. या वरवरच्या नांगरणीने आपण जमीन भुसभुशीत व थंड ठेवू शकतो.
3. पावसाळ्यात माती वाहून जाऊ नये म्हणून योग्य अशी बांधबंदिस्ती करावा.
4. आगंतुक तण वाढू देऊ नये. वाळलेले गवत व केरकचरा काढावा.
5. चिमण्या कोवळ्या अंकुराचे शेंडे तोडतात, यामुळे रोपांची वाढ खुंटते. याकरिता रोपटी सशक्‍त होईपर्यंत देखभाल महत्त्वाची असते.
6. कीड व कीटकांपासून बचाव करण्यासाठी पालेभाज्यांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. त्याकरिता डी.डी.टी., मेलॅथिऑन सेव्हिन, एल्ड्रिन, 10 टक्के बी.एच. सी.वगैरे वापरावेत. याकरिता अधिक माहिती कृषितज्ज्ञ देऊ शकतात.
सावधानी ः
कीटकनाशक कोणतेही वापरले तरी ते विषयुक्‍त असते. किटकनाशक फवारल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. तसेच भाजीपालासुद्धा धुवून शिजवणे. पालेभाज्या किटकांपासून वाचवण्यासाठी रोपटी लहान असताना फवारणी करावी. पालेभाज्या काढण्यापूर्वी दोन आठवडे आधी, त्याही आधी दोन आठवडे कीटकनाशकाची फवारणी करावी म्हणजे कीटकनाशकांचा विषयुक्‍त प्रभाव नगण्य राहील.
छत व कुंड्यातून भाजीपाला लागवड
भाजीपाला लावण्यासाठी जागा जमीन नसल्याने कोणीही व्यक्‍ती कुंड्यातून फुलझाडे वा शोभेची झाडे निवडुंग वगैरे लावतात. त्याऐवजी भाजीपाला लावून आपण आपली गरज काही प्रमाणात भागवू शकतो. छतावरही प्लास्टिकचे कापड अंथरून त्यावर माती पसरवून आपण गादी वाफे तयार करू शकतो. अशा वाफ्यातूनही भाजीपाला घेता येतो.
अनेक मजली इमारतीत फ्लॅट असतात. साहजिकच फ्लॅटमध्ये राहणार्‍यांना जमीन नसतेच. ते बाल्कनीत कुंड्या, पत्र्याचे डबे, जुन्या पेट्या, छत आदींचा वापर करून भाजीपाला लावतात व आपली हौस भागवतात. वनस्पती आसपास असेल तर हवा शुद्ध राहते. काहीवेळा आर्थिक लाभही भाजीपाला विक्रीतून मिळतो.
1. कुंड्या बादलीच्या किंवा वेगवेगळ्या आकारात मिळतात. त्या सहज उचलता येतील व हलवता येतील अशा असाव्यात. मातीच्या कुंड्या यासाठी चांगल्या असतात.
2. सिमेंटच्या कुंड्याही बाजारात मिळतात.परंतु त्या फार जड नसाव्यात.
3. मिरची, टोमॅटो, वांगी, वाल, भेंडी यांची रोपटी दीर्षकाळ उत्पादन देत राहतात. यासाठी कुंड्यांचा वापर करावा.
4. कोथिंबीर, मेथी, पुदिना, शेपू, करडई, पालक यांची लागवड आपण छतावर पसरलेल्या मातीत करू शकतो. यामुळे ताजा भाजीपाला मिळेल. गरज असेल तेव्हा व गरजेपुरताच तो काढता येतो.
5. छत, सज्जा, कुंड्या यातून भाजीपाला लावता येतो. परंतु ओल होता कामा नये. त्यासाठी अ) कुंड्यांना वॉर्निश लावा. ब) पेट्या, पत्र्याचे डबे, प्लॅस्टिकची खोकी यांना हँडल बसवून घ्यावेत म्हणजे सहजपणे उचलता व इकडे-तिकडे नेता/ठेवता येतील. क) पाणी गरजेपुरतेच वापरा, माती वाहून जाईल असे पाणी देऊ नका.
मोठ्या प्रमाणात व्यवसाय व माळीकाम
तुम्हाला बागकामाची आवड, क्षमता, जागा व वेळ असेल तर हा भाजीपाला, फळभाज्या पिकवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करून नफा मिळवू शकता. मात्र हे एकट्याचे काम नाही. नोकर मदतीला घेऊन किंवा घरच्या सदस्यांना मदतीला घेऊन तुम्ही हा व्यवसाय करू शकता. काही वेळेला एकाच वेळी अनेक कामे निघतात किंवा एकाच वेळी खूप काम करावे लागते. म्हणून मदतीची गरज पडते.
1. आपण गावी राहता. कदाचित घराजवळ खूप मोकळी जागा असू शकते किंवा गावापासून 2-4 किलोमीटर अंतरावर तुमची मोकळी जागा असू शकते.
2. येण्या-जाण्यासाठी दुचाकी वाहन किंवा बैलगाडी असेल तर 10-12 किलो मीटरपर्यंत जाऊनही हा व्यवसाय करता येईल.
3. गावात डांबरी रस्ते असतील तर 30-40 कि.मी.पर्यंत वाहनाने जाऊन-येऊन मोठ्या शेतात व्यवसाय म्हणून भाजीपाला पिकवता येईल. अर्थात जमीन कोठे आहे त्यानुसार टेम्पो, ट्रक, बस यापैकी कोणतेही वाहन उपयोगी होऊ शकते. पिकवलेला भाजीपाला मंडईपर्यंत नेण्याची व वाहतूक कमी खर्चात होईल अशी व्यवस्था हवी. तरच हा व्यवसाय व्यावहारिक व नफा मिळवून देणारा होईल.
4. तुम्ही भाडेपट्ट्याने जमीन घेणार असाल तर महाग नसावी. स्वस्तातील जमीन थोडी दूर असली तरी हरकत नाही, पण या जमिनीपर्यंत वाहन जाण्याची सोय असावी. तरच हा व्यवसाय लाभदायक होईल.
5. वरील बाबी ध्यानात घ्या. तसेच भाजीपाला लागवडीसंबंधी आणखी काही मुद्दे पुढीलप्रमाणे…
अ) बी-बियाण्यांची निवड विचारपूर्वक करा. उच्च प्रतीचे बियाणेच उगवते व त्याची रोपटी सशक्‍त असतात.
ब) शेणखत, रासायनिक खत आवश्यक तेवढेच द्या. आणि ते योग्यवेळी वापरा.
क) जलसिंचनाची व्यवस्था चांगली असावी. योग्यवेळी, योग्य प्रमाणात रोपांना/शेतीला पाणी द्या.
ड) शेतमजूर मेहनती असावेत. मातीतून सोने पिकवायचे असेल तर मातीत राबण्याचा कंटाळा नसावा. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.
इ) वाहतुकीची साधने निर्दोष असावीत. शेतमाल नेण्यासाठी वाटेत अडचणी, अडथळे नसावेत. हमाली, वाहन भाडे योग्य दरात असावे. तरच अधिक फायदा होईल.
बागयतीचे पूर्ण ज्ञान मिळवून, नियोजनपूर्वक व्यावसायिक स्तरावर भाजीपाला पिकवला तर समाधान व नफा मिळतो. पिकाचा मोसम नसतानासुद्धा विशिष्ट उत्पादन घेता येते. त्यावेळी मंडईत तो वाण नसतो त्यामुळे अधिक लाभ होतो. याची चर्चा या पुस्तकात पुढे येईल.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.