खान्देशात धुळे, साक्री भागांतून चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, जामनेर आदी तालुक्यांत स्थलांतर करणाऱ्या मेंढपाळ बांधवांना शेतात खतासाठी मेंढ्या बसविण्यासाठी मिळणारे दर यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यानेमागील हंगामाच्या तुलनेत त्यामानाने कमीच मिळत आहेत. त्यामुळेकमी दरासहित शेतकरयाची किरकोळ शेतीची कामेही करण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे.
खान्देशात धुळे, साक्री भागांत शेकडो मेंढपाळ बांधव असून, ते दिवाळीनंतर चोपडा, यावल, रावेर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर आदी तालुक्यांमध्ये तापी, गिरणाकाठी मेंढ्या चराईसाठी येतात. यंदा दुष्काळ असल्याने शिवारात फारसा चारा नाही. शेतकरीही वित्तीय संकटात आहे. ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे व अधिक क्षेत्र आहे, असे मोठे शेतकरी आपल्या शेतात दोन-तीन दिवस मेंढ्या बसवून घेतात. एका गटात सुमारे १००० ते दीड हजार मेंढ्या असतात. यामुळे शेतात मेंढ्यांच्या लेंड्या, मूत्र पडते व जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे शेतकरी मानतात. मागील हंगामात प्रतिदिन १००० रुपये, असे दर मेंढपाळांना शेतमालक देत होते. या हंगामात किंवा उन्हाळ्यात मात्र हे दर ८०० ते ९०० रुपये प्रतिदिन, असे आहेत.
मेंढपाळ बांधव ज्या गावात येतात, त्या गावातील ९० टक्के शिवार चराईसाठी घेतात. त्यापोटी संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीला मेंढपाळ बांधव निधी देतात. शिवार मोठे असले तर हा निधी एक लाख रुपयांपर्यंत द्यायचा असतो. शिवारातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात ते मेंढ्या चराईसाठी नेतात. सध्या कांदा, बाजरीची मळणी आटोपली आहे. परंतु शेतात पात, ठिबकच्या नळ्या विखुरलेल्या असतात, यामुळे संबंधित क्षेत्रात मेंढपाळ मेंढ्या चराईसाठी नेऊ शकत नाहीत.
तसेच तीव्र चाराटंचाई असल्याकारणाने अशा शेतात मेंढ्या चराईसाठी नेता याव्यात, यासाठी मेंढपाळ बांधव संबंधित शेतातील ठिबकच्या नळ्या, कांदापात गोळा करून देण्याचे कामही मोफत करीत आहेत. केळी, मका पिकाखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रातील नळ्याही ही मंडळी गोळा करून देते. मग त्यात आपल्या मेंढ्या चराईसाठी पाठविल्या जातात. ही स्थिती दुष्काळामुळे तयार झाल्याचे सांगण्यात आले.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.