* मत्स्यपालनातून आर्थिक समृद्धी
मत्स्यव्यवसाय म्हणजेच मासेमारी हा समुद्रात करायचा व्यवसाय आहे. मच्छीमार तो परंपरेने करत आलेले आहेत. असे असले तरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक तळी, तलाव, पाझर तलाव आणि धरणांची जलाशये यांच्यातही मत्स्यव्यवसाय करणे शक्य झालेले आहे. देशामध्ये होणाऱ्या एकूण मत्स्यव्यवसायात शेतकऱ्यांनी गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाचे प्रमाण वाढवण्यास खूप वाव आहे. परंतु ते प्रमाण तितके वाढत नाही. ते वाढवल्यास मत्स्यव्यवसाय व कोळंबी संवर्धन हा उत्तम शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो.
* मत्स्यव्यवसाय म्हणजे काय?
आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७२% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. केवळ २९% भाग हा जमिनीच्या स्वरुपात आहे. माणूस भूभागावर राहतो. त्यामुळे भूशेती करणे त्याला जास्त सोयीचे आहे. पण लोकसंख्येचा वाढता विस्तार व मासे म्हणून अन्नाची तिची गरज लक्षात घेता जमिनीच्या दुपटीपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या समुद्राच्या पाण्यातून किंवा गोड्या पाण्यातून सजीव पदार्थ मिळवण्याचा व्यवसाय म्हणजे मत्स्यव्यवसाय होय.
१. गावतळ्यातील मत्स्यसंवर्धन
विदर्भात माल-गुजारी तलाव, तर राज्याच्या इतर भागात गावतळी या नावाने बऱ्याच गावांत अशी तळी किंवा तलाव असतात. हे तलाव सार्वजनिक असतात किंवा काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मालकीचे असतात. गावातील लोक एकत्र येवून येथे मत्स्यसंवर्धन करू शकतात. असे तलाव बऱ्याचदा खूप सुपीक असल्यामुळे इथे माशांचे खूप उत्पादन होते.
२. क्षारपड भागात मत्स्यसंवर्धन
राज्यात बऱ्याच शेतजमिनी पाण्याच्या अतिवापरामुळे क्षारपड किंवा चोपण झालेल्या आहेत. या क्षारयुक्त जमिनी नापीक झाल्या आहेत त्यामुळे त्या शेतकामाला उपयुक्त नाहीत. अशा ठिकाणी तलाव खोदून या तलावात झिंगा (कोळंबी) संवर्धन करता येते. राज्याच्या बऱ्याच भागात असे तलाव तयार केले गेले असून त्यात झिंग्यांचे चांगले उत्पादन मिळते. त्यांना बाजारात ३०० रुपये ते ५०० रुपये किलो एवढा भाव मिळतो.
३. शेततळ्यांत मत्स्यसंवर्धन
शेतजमिनीत पाणी साठवण्याकरिता शेततळी बनवण्यास राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. शेततळ्यांचे क्षेत्र ०.०५ ते ०.५ हेक्टर इतके असते. यात योग्य पद्धतीने माशांची पैदास केली तर चांगले उत्पन्न मिळू शकते. महाराष्ट्रातील शेतकरी या शेततळ्यांमध्ये कटला, रोहू, पंकज इत्यादी माशांचे उत्पन्न घेतात. तळ्यांची खोली कमी असेल तर शेततळ्यांत माशांची बोटुकली (लहान आकाराचे मासे) तयार करता येतात.
४. चारमाही तलावात मत्स्यसंवर्धन
राज्याच्या बऱ्याच भागात पावसाळ्याच्या चार-पाच महिन्यांतच छोट्या तळ्यांमध्ये पाणी साठते. इतर महिने कोरडे पडतात. अशा तळ्यांत योग्य व्यवस्थापन केले तर माशांच्या पिल्लांपासून (मत्स्य जिरा) मत्स्य बोटुकली तयार करता येते. ही बोटुकली वाढावी म्हणून मोठ्या जलाशयांत किंवा तलावांत सोडता येते.
* मत्स्यशेतीचे तंत्र-
तळ्यांत योग्य जातीचे मत्स्यबीज योग्य प्रमाणात सोडणे व मासे मोठे झाल्यावर ते पकडणे यालाच मत्स्यशेती म्हणतात असे नसून, मत्स्यबीज वाढीसाठी तळ्यांत अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे त्याचेच एक अंग आहे.
* माशांच्या जाती व निवड-
मत्स्यशेतीसाठी माशांची निवड कशी केली जाते यावर उत्पादन अवलंबून असते. माशांची निवड करतांना काही बाबी लक्षात घ्याव्यात. योग्य हवामान व पाणी सहन करू शकणारे मासे निवडावेत. माशांचे अधिक उत्पादन व्हावे यासाठी जलद वाढणाऱ्या जाती असाव्यात. निवड केलेल्या माशांच्या जातीचे बीज सहज व वेळेवर उपलब्ध असावे. नैसर्गिक खाद्यावर वाढणारे मासे निवडावेत. एकमेकांना खाणाऱ्या माशांच्या जाती निवडू नयेत.
१. कटला
हा मासा झपाट्याने वाढतो. त्याचे तोंड वर वळलेले असते. डोके मोठे व शरीर फुगीर असते. एका महिन्यात हा मासा ७.५ ते १० सेमी वाढू शकतो. पहिल्या वर्षात तो ३८ ते ४६ सेमी लांब व १ ते १.५० किलो वजनाचा होतो. कटला हा मासा १२० सेमीपर्यंत वाढू शकतो. हा पाण्यातील पृष्ठभागावरचे अन्न खातो. तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होणारा हा मासा जून ते ऑगस्ट महिन्यात अंडी घालतो. याचे कृत्रिम प्रजननदेखील शक्य आहे.
२. रोहू
या माशाला जबड्याजवळ दोन मिश्या असतात. पहिल्या वर्षी हा मासा ३५ ते ४० सेमी वाढतो व त्याचे वजन ७०० ते ९०० ग्रॅम होते. हा मासा तळाजवळील खाद्य खाऊ शकतो. चिखलातील अन्नकण व प्लवंग हे माशाचे मुख्य अन्न आहे.
३. मृगळ
हा मासा सडपातळ शरीराचा असतो. कटला व रोहू प्रमाणे त्याची लवकर वाढ होत नाही. प्रथम वर्षाला २५ ते ३० सेमी लांब व ६०० ग्रॅम वजनाचा होतो. दुसऱ्या वर्षी प्रजनन करू शकतो. तळ्यामध्ये प्रजनन अपेक्षित असेल तर वरील तीनही माशांना विणीसाठी मस्तिष्क ग्रंथीच्या अर्काचे इंजेक्शन देवून प्रेरित करावे लागते. या सर्व जाती भारतीय आहेत. याशिवाय विदेशी जातींचे उत्पादनही भारतात घेतले जाते.
* जागेची निवड-
तलाव तयार करायची जमीन सपाट अथवा सखल भागात असावी. त्यामुळे खोदकामाचा खर्च कमी येतो. पाणथळ किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन योग्य असते. मातीमध्ये चिकणमाती व गाळ यांचे मिश्रण जास्त असावे. यासाठी १ एकर ते एक हेक्टर आकारमानाची २ ते ३ मीटर पाण्याची खोली असलेली जागा निश्चित करावी.
* बाजारपेठ-
मासे हे जगातील बऱ्याच संस्कृतींचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणून माशांना मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. तेवढा पुरवठा मात्र होत नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हा व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील कित्येक गावांत आठवडे बाजार भरतो. तिथे लोकांना ताजे मासे हवे असतात. सर्व प्रकारच्या माशांना मागणी असल्याने त्या मानाने पुरवठा कमीच असतो. स्थानिक पातळीवर तर ही विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकते. पण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा चांगल्या जातीच्या व प्रतीच्या माशांना मागणी आहेच, त्यामुळे गावातला मत्स्यशेतकरी लोकल टू ग्लोबल होऊ शकतो. मांसापासून विविध चविष्ट खाद्यपदार्थ बनवणाऱ्या जगप्रसिद्ध कंपन्या थेट मत्स्यशेतीवरून मासे खरेदी करू शकतात कारण त्यामुळे शेतकऱ्याशी थेट संपर्क होतो, खर्च कमी होतो, ताजा माल उपलब्ध होतो. यामुळे मत्स्यशेतीमधून चांगला नफा कमावणे सहज शक्य आहे.
* शासकीय अनुदान व कर्ज-
मत्स्यव्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जसुविधा उपलब्ध आहे. मासे ही नाशवंत वस्तू असल्यामुळे ती खराब न होता लवकरच बाजारपेठेत जावून तिला चांगला भाव मिळावा यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांना राष्ट्रीय सहकार विकास अंतर्गत अनुदान मिळते. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा आणि मासेमारी व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी शासनपातळीवर विविध योजनांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. मच्छिमारांना प्रोत्साहन देणे, जाळे उपलब्ध करून देणे, तांत्रिक व आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे अशा सोयी आहेत. त्याचप्रमाणे, खाऱ्या पाण्यातील मासेमारीबरोबरच गोड्या पाण्यातील मासेमारीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातात. रोजगारनिर्मिती हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
* प्रकल्पासाठी अंदाजे खर्च-
हा उद्योग सुरु करण्यासाठी सुरवातीला ४ ते ५ लाख रुपये खर्च येतो. तसेच क्षमतेनुसार व मागणीनुसार प्रकल्पाची किंमत कमी-अधिक होऊ शकते.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.