– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
औरंगाबाद / प्रतिनिधी
तमाम शेतकर्यांच्या जीवनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकर्यांसाठी, व्यापार्यांसाठी विश्वस्त म्हणून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सचिव विजय शिरसाठ उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या बाजार समितीने आदर्शवत असे काम करून खर्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीने काम कसे करावे, याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. स्वनिधीतून शेतकरी, व्यापारी, हमाल अशा विविध घटकांसाठी काम करणारी ही पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. खरेतर कृषी उत्पन्न समितीने नीट काम केल्यास शेतकर्यांचे भले होईल. या माध्यमातून शेतीमाल खरेदी केंद्रे चांगल्या प्रकारे चालविली जातील. शेतकरी हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे, त्याची परिस्थिती जेव्हा शेतमालाला भाव नसतो, तेव्हा तो शेतमाल विकतो आणि जेव्हा शेतमालाला भाव चांगला असतो तेव्हा त्याच्याकडे शेतमाल उपलब्ध नसतो, ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र शासनाने ई-नाम (ई-राष्ट्रीय कृषी बाजार) सारखी ऑनलाइन ई-सेवा सुरू केली. त्यातून सिंगल मार्केट ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. या योजनेंतर्गत बाजार समित्यांनी जवळपास पाचशे पंचावन्न कोटींचा व्यवहार केल्याची माहिती दिली.
फडणवीस पुढे म्हणाले, शेतकर्यांनी आपल्या शेतमालाचा दर्जा टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असून बाजार समितीने शेतकरी व मार्केट यांच्यातील दुवा म्हणून काम करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून केंद्र शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या. मागील शासनाच्या काळात अनेक वर्षात फक्त 450 कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी झाली होती. मात्र या शासनाच्या काळात साडेतीन वर्षात तब्बल साडे आठ हजार कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी करण्यात आली. या शासनाने बाजार समितीतील भ्रष्ट कारभार्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखविले. हे शासन शेतकर्यांचा विचार करीत आले आहेत. शेतकर्यांसाठी या शासनाने नेहमीच पारदर्शक कारभार केला आहे. अजूनही शेतकर्यांसाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.