• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, January 17, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

आंबा मोहोरावरील कीड / रोग नियंत्रण

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
February 6, 2019
in शेती
0
आंबा मोहोरावरील कीड / रोग नियंत्रण
Share on FacebookShare on WhatsApp

मोहोरावरील तुडतुडे :

तुडतुडे ही आंब्याची महत्त्वाची नुकसानकारक कीड असून या किडीच्या विविध २० ते २२ जातींची नोंद झालेली आहे. पैकी महत्त्वाच्या तीन जाती म्हणजे अॅम्रीटोडस अॅटकिनसोनी, इडिआस्कोपस क्लायपिअॅलीस आणि इडिओस्कोपस निव्हीओस्पार्सस या प्रजाती महाराष्ट्र राज्यात आंबा फळपिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अॅम्रीटोडस अॅटकिनसोनी हे काळसर करड्या रंगाचे, जास्त निमुळते व लांबट असतात. तर इडिओस्कोपस निव्हीओस्पार्सस जातीचे तुडतुडे हिरव्या करड्या रंगाचे, मध्यम आकाराचे आसतात. पाचरीच्या आकाराचे हे किडे त्यांच्या तिरकस चालीवरून सहज ओळखू येतात. किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर झाडाजवळ गेल्यावर या किडीचा उडताना तडतड आवाज सहजपणे ऐकु येतो. या किडीचे मादी तुडतुडे आंब्याच्या झाडाला पालवी फुटू लागल्यावर कोवळ्या पानांच्या आणि मोहोराच्या शिरेमध्ये पानाच्या खालच्या बाजूस अंडी घालतात. हा अंडी घालण्याचा कालावधी डिसेंबर – फेब्रुवारी दरम्यान असतो. एक मादी जवळपास २०० पर्यंत अंडी घालते. अंड्यातून ४ ते ६ दिवसांत या किडीची पिल्ले बाहेर पडतात. या पिल्लांचा रंग पिवळसर किंवा काळपट बदामी असतो. पिल्लावस्था फार खादाड असते. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रथम जून – जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या नवीन पालवीवर आढळून येतो. तुडतुड्यांची पिल्ले व पूर्ण वाढलेले तुडतुडे कोवळ्या पानांमधून रस शोषतात परिणामी पाने वेडीवाकडी होतात. ही पिल्ले १० ते १५ दिवसांत पूर्ण वाढ झालेल्या तुडतुड्यात रूपांतरित होतात. या काळात ते ५ वेळा कात टाकतात. एका पिढीस पूर्ण होण्यास साधारणत: १७ ते २० दिवस लागतात. पालवीचा हंगामा संपल्यानंतर हे तुडतुडे सुप्तावस्थेत जातात. झाडाच्या खोडावरील फांद्यावरील सालीच्या भेगांमध्ये / सांदी सपाटीत हे तुडतुडे सुप्तावस्थेत राहतात. पुढे ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात आंब्याला मोहोर फुटू लागताच हे तुडतुडे जागृतावस्थेत येवून त्यांचा जीवनक्रम पुन्हा सुरू होतो. या काळातच तुडतुडे अधिक प्रमाणात नुकसान करतात. हजारोंच्या संख्येने तुडतुड्यांची पिल्ले आणि पूर्ण वाढ झालेले तुडतुडे आंब्याच्या मोहोराच्या फुलातून, कोवळ्या फळांतून रस शोषून घेतात. परिणामी मोहोराची फुलगळ तसेच फळगळ होते. त्याचबरोबर या किडीची पिल्ले आणि प्रौढ तुडतुडे मधासारखा चिकट द्रव शरीरावाटे सोडतात. अशी प्रादुर्भावित झाडे उन्हात चकाकतांना दिसतात. या चिकट पदार्थमुळे पानांवर, फुलांवर फळांवर काळ्या बुरशीची (कॅप्नोडियम ) वाढ होते. पानांवर काळी बुरशी वाढल्यावर झाडाच्या अन्नरस निर्मितीवर परिणाम होतो. त्यामुळे झाडाच्या वाढीवर आणि फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. फळांवर काळे डाग पडल्यावर फळांची बाजारातील प्रत खालावते. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास संपूर्ण मोहोर करपून जातो आणि जवळपास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत आंबा उत्पादनात घट येते.

नियंत्रणाचे उपाय : १ ) आंब्याची लागवड शिफारस केलेल्या अंतरावरच करावी. जास्त दाटी झालेल्या बागेत कमी सुर्यप्रकाश तसेच कोंदटपण जास्त असतो असे वातावरण किडींच्या वाढीस अनुकूल असते. म्हणून बाग स्वच्छ तणविरहित ठेवावी. झाडाच्या आतल्या भागातील फांद्याची छाटणी करून विरळ कराव्यात जेणेकरून सुर्यप्रकाश संपूर्ण झाडत पोहोचेल.

२) जैविक नियंत्रणांतर्गत निंबोळी अर्क ५% किंवा निमयुक्त किटकनाशकांचा फवारणी करिता अधून – मधून वापर करावा. तसेच व्हर्टीसिलियम लेकॅनी या बुरशीचा या किडीच्या नियंत्रणाकरिता वापर करावा.

३) रासायनिक किटकनाशकांचा वापर पुढे दिलेल्या तक्त्याप्रमाणे करावा.

फुलकिडे : अलिकडील काळात फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आंब्यावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोपवाटिकेतील आंब्याच्या कलमांच्या नवीन फुटीवर, झाडांच्या कोवळ्या पानांवर तसेच मोहोरावर या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. फुलकिडे आकाराने अतिशय सुक्ष्म असल्याने सहजपणे दिसत नाहीत. परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास किंवा मोहोर हाताच्या तळव्यावर झटकून पाहिल्यास असंख्य फुलकिडे हातावर पडलेले दिसून येतात. फुलकिडे पिवळसर आणि काळपट रंगाचे अशा दोन प्रजातीचे आपणास आंब्यावर दिसून येतात.

या किडीची मादी कोवळ्या पानांच्या शिरांमध्ये अंडी घालते. अंड्यामधून ३ ते ८ दिवसांत पिवळसर रंगाची पिल्ले बाहेर पडतात. पिल्लावस्था १४ ते २१ दिवसांनी असते. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ फुलकिडे कोवळ्या पानांचा पृष्ठभाग खरडून आतील रसावर उपजिवीका करतात. प्रादुर्भाव झाल्यास विशेषत: मध्यशीर, उपशिरा तसेच पानांच्या कडा प्रथम विटकरी होतात. पाने वेडीवाकडी होतात. करपतात व पानगळ होते. अलिकडे या किडीचा प्रादुर्भाव मोहोरावर तसेच फळांवर देखील होत आहे. त्यामुळे मोहोराचे नुकसान होते. फळांची साल खरवडल्यामुळे ती खाकी, खडबडीत होते. फळांचा आकार लहान राहतो व बाजारातील प्रत घटते.

नियंत्रणाचे उपाय : फुलकिड्यांच्या नियंत्रणाकरिता किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोयेट ३०% प्रवाही ०.०३ %, फोझॅलोन ५० % प्रवाही ०.०५ %, निंबोळी अर्क ५% यापैकी एका किटकनाशकाची संपूर्ण झाडावर फवारणी करावी. तसेच आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सप्तामृत औषधांची फवारणी वेळापत्रकाप्रमाणे करावी.

शेंडा पोखरणारी अळी : आंबा फळपिकावरील ही एक महत्त्वाची कीड असून या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटीवर तसेच मोहोरावरही आढळून येतो. जेव्हा जेव्हा झाडाला किंवा कलामांना कोवळी फुट निघते. त्यावेळेस या किडीचा प्रादुर्भाव होतो. ज्यावेळी मोहोर सुरू होतो. त्यावेळी मोहोरावर सुद्धा या अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचा पतंग काळसर बदामी रंगाचा असून त्याची लांबी १५ ते २० मि.मि. असते. या किडीची मादी (पतंग) कोवळ्या पानांच्या देठावर तसेच मोहोराच्या देठावर / दांड्यावर अंडी घालते. अंड्यातून ७ ते ८ दिवसांत पिवळ्या रंगाची अळी बाहेर पडते आणि पानाच्या देठातून शेंड्यामध्ये शिरून आतील भाग पोखरून खाते. अळीची वाढ होत असताना तिचा रंग गुलाबी होत जातो व त्यावर पांढरे ठिपके असतात. पानाच्या देठातून शेंड्यात/फांदीत शिरताना ती जे छिद्र पाडते. त्या छिद्रातून विष्ठा बाहेर येताना दिसते. अशी विष्ठा कोवळ्या पालवीवर आढळून आल्यास या किडींचा प्रादुर्भाव झाला असे समजावे. कोवळी पालवी, शेंडे किंवा मोहोर आतून पोखरले गेल्यामुळे सुकतात. बऱ्याचवेळी कीडग्रस्त फांदी झाडावर तशीच राहते आणि तिची जर पुढे वाढ झाली तर प्रादुर्भावाच्या जागी ती फुगीर होते. अशा फांद्या पोकळ राहिल्याने कालांतराने मोडून पडतात. रोपवाटिकेतील नवीन कलमांवर प्रादुर्भाव झाल्यास रोपे मरतात.

नियंत्रणाचे उपाय : नवीन लागवड केलेल्या बागेत या किडीचा उपद्रव जास्त असतो. कारण नवीन बाग वाढीच्या अवस्थेत असताना वारंवार नवीन कोवळी फुट येत असल्याने या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी वेळीच संरक्षण झाले नाही तर झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. म्हणून प्राथमिक अवस्थेतच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच किडग्रस्त शेंडे किडीच्या अवस्थेसह काढून जाळून नष्ट करावेत. कोवळी फुट निघल्यानंतर कार्बारिल ५० % प्रवाही ०.२% किंवा क्विनॉलफॉस २५ % प्रवाही ०.०५ % किंवा निंबोळी अर्क ५% किटकनाशकांची फवारणी करावी. त्याचबरोबर थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५ मिली बरोबर प्रोटेक्टंट ५ ग्रॅमची प्रति लि. पाण्यातून फवारणी करावी.

मोहोरावरील मिजमाशी : ही आंबा फळपिकावरील दुय्यम महत्त्वाची कीड आहे. मात्र अलिकडील काळात मिजमाशींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येते. या किडीमुळे आंबा मोहोराचे होणारे नुकसानही वाढल्याचे दिसून येते. या किडीच्या मुख्यत्वे दोन प्रजाती आढळतात. त्या म्हणजे प्रोसिस्टिफेरस मँजीफेरी आणि इरोसोमिया इंडिका, पैकी इरोसोमिया इंडिका या प्रजातीचा प्रादुर्भाव मोहोरावर तसेच कोवळ्या फुटीवर मोठ्या प्रमाणात आढळतो. मीजमाशीची मादी माशी मोहोर फुटल्यानंतर कोवळ्या दांड्यामध्ये अंडी घालते. या अंड्यातून २ ते ३ दिवसात पिवळसर रंगाची अळी बाहेर आल्यानंतर देठाच्या आतील भाग खाते. देठाच्या खालच्या भागावर गाठ तयार होते. ही गाठ नंतर काळी पडते. अशा प्रकारच्या असंख्य गाठी किंवा काळे ठिपके मोहोराच्या देठावर आढळून येतात. अळी अवस्था ७ ते ८ दिवसांची असते. पूर्ण वाढ झालेली अळी तांबूस रंगाची असते. अळीची पूर्ण वाढ झाल्यावर ती गाठीला भोक पाडून जमिनीवर पडते व मातीमध्ये कोषावस्थेत जाते. कोषावस्था ५ – ७ दिवस असते. एका वर्षात या किडीच्या ३ ते ४ पिढ्या पूर्ण होतात. प्रादुर्भावीत मोहोर वेडावाकडा होतो. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास फुले व फळे गळून पडतात. फळे वाटणायाच्या आकाराची असतांना प्रादुर्भाव झाला तर फळे पिवळी पडून गळतात. दुसरी प्रजात प्रोसिस्टीफेरस मँजीफेरी ही मात्र मोहोरावरच आढळते. या मिजमाशीची अळी फळातील अंडाशय खाते. परिणामी फळधारणा न होता त्याजागी शंकुच्या आकाराची गाठ तयार होते. यालाच स्थानिक भाषेत ‘दोडा’ असे म्हणतात.

नियंत्रणाचे उपाय : मीजमाशीची अळी जमिनीत कोषावस्थेत जाता असल्याने बागेतील झाडाखालील जमीन नांगरावी किंवा कुदळावी किंवा चाळणी करावी. जेणे करून सुप्तावस्थेतील किडीचे कोष उन्हाने तापून मरून जातील किंवा पक्षी वेचून खातील. झाडाखालील जमीन चाळल्यानंतर जमिनीमध्ये मिथील पॅराथिऑन या कीटकनाशकाची २% भुकटी मातीत मिसळावी. म्हणजे झाडाखालील जमिनीतील अळ्या आणि कोषांचे नियंत्रण होईल.

आंब्याचा मोहोर फुटू लागताच फेनीट्रोथिऑन १ मिली किंवा डायमेथोएट १.२५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारणी कारवी.

मोहोरावरील भुरी रोग : आंब्याच्या मोहोरावर येणारा ‘भुरी’ हा एक महत्त्वाचा बुरशीजन्य रोग असून आंब्याला जेव्हा मोहोर येतो त्याचवेळी पडतो. या रोगामुळे मोहोराचा देठ, फुले आणि लहान फळे गळून पडतात आणि फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.

आंबा फळपिकावरील फारच नुकसानकारक असा हा रोग आहे. कोकणातील आंब्याच्या मोहोराचे या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. महाराष्ट्रातील इतर भागातही हवामानातील बदलामुळे या रोगाचा मोहोरावर अनिष्ट परिणाम होताना दिसून येतो. भुरी रोग ‘ओइडियम मॅन्जीफेरी’ या बुरशीमुळे होतो. बुरशीचा रंग पांढरट रंगाची बीजे तयार झाल्यावर पांढरी भुकटी फवारल्यासारखी दिसते. म्हणून या रोगाला ‘भुरी’ रोग असे संबोधतात. उष्ण व दमट हवामानामुळे कोकणात या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. डिसेंबर – जानेवारी या कालावधीत आंब्याला मोहोरे फुटल्यावर या बुरशीची वाढ होते. कोवळ्या पानांवर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. वाऱ्यासोबत या बुरशीचा प्रसार होतो. या भुरी रोगाच्या बुरशीच्या वाढीसाठी तापमान २० ते २५ डी.से. आणि आर्द्रता ८० % हे अनुकूल वातावरण असते. जर ढगाळ वातावरण असेल आणि रात्रीचे तापमान कमी असेल तर भुरी रोगाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा  8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Tags: Mango Seed / Disease Control in Moraआंबा मोहोरावरील कीड / रोग नियंत्रण
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In