डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात हापूस आंब्यातील साक्याबाबत बरीच वर्षे संशोधन सुरु आहे व त्यातून काही चांगल्या शिफारशी देण्यात आल्या आहेत. साका हि विकृती कोणत्याही एकाच कारणाने येत नसून अनेक घटक यासाठी कारणीभूत आहेत. फळ पिकण्याच्या पक्रीयेवर अनेक घटकांचे नियंत्रण असते. त्यामुळे साका फक्त आन्य्द्राव्य या एकाच कारणाने होत नाही असे आढळले आहे.
विद्यापीठातील सुरुवातीच्या संशोधनामध्ये साका कशामुळे होतो हे निश्चित करण्यात आले. साका झालेला भाग गोडिला कमी, जास्त आम्लता (दोन पटीने), कमी अॅस्कारबिक अॅसिड (४ पटीने कमी), जास्त स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ आढळतो. अमायलेज या वितंचकाचे (इन्झाइम) प्रमाण बऱ्याच पटीने कमी आढळते. शिवाय साकाग्रस्त फळामध्ये ग्लुटामेट, पेराऑक्सिडेज, कॅटॅलेज यांचे प्रमाण कमी तर इन्व्हेर्टेज चांगल्या पिकलेल्या आंब्यापेक्षा जास्त आढळले.
अन्नद्रव्ये व साका :
अन्नाद्रव्यांमधील नत्राचे प्रमाण वाढल्यास साक्याचे प्रमाण वाढते हे यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. कोकणातील जमिनीत उपलब्ध नत्र, स्फुरद त्याचप्रमाणे झिंक, बोरॉन, कॅल्शिम या अन्नद्रव्यांची कमतरता आढळते. यातील, स्फुरद, पालाश (१५००:५००:५०० ग्रॅम/ प्रत्येक पूर्ण वाढलेले झाड) या मुख्य अन्नद्रव्याची सामान्यपणे आंब्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. वरील सर्व अन्नद्रव्ये फळातील जीव रासायनिक क्रियांमध्ये भाग घेतात. यातील काही अन्नद्रव्ये उदा. झिंक व कॅल्शियम यांचे झाडामध्ये वहन होत नाही. याशिवाय साका कमी करण्याच्या दृष्टीने संजीवकाचा उपयोग अन्नद्रव्याचे फळातील वहन वाढीव होण्याच्या दृष्टीने प्रयोग सुरु आहेत.
आंबा फळांची झाडांवरील पक्वता व साका :
कृषी विद्यापीठाने आंब्यातील साका विकृती टाळण्यासाठी हापूस आंबा फळांची काढणी फळे १४ आणे (८० ते ८५% पक्व) तयार झाल्यावर करावी अशी शिफारस केलेली आहे. प्रयोगामध्ये झाडावर पिकलेल्या सर्वच फळांमध्ये (८० ते १००% ) साका आढळतो तर १६ आणे तयार आंबे काढून पिकवले तर ४० ते ६० % फळांमध्ये साक्याचे प्रमाण अत्यल्प आढळते. म्हणून फळांची काढणी योग्य वेळी काढण्याची शिफारस करण्यात आली आहे.
फळांचे तापमान व साका :
फळांचे तापमान वाढल्यास साक्याचे प्रमाण वाढते असे दिसून आले आहे. एक तास प्रखर उन्हात ठेवली असता ५० ते ६० % फळांमध्ये साका आढळला तर फळे दोन तास उन्हात ठेवली असता सर्वच (१०० %) फळामध्ये साका आढळला यासाठी फळे काढणी सकाळी १० पूर्वी व संध्याकाळी ४ वाजल्यानंतर करावी, अशी शिफारस आहे तसेच फळे उन्हात ठेवू नयेत. फळांची वाहतूक रात्रीचे वेळी करावी आणि पॅकिंगमध्ये फळांचे तापमान वाढणार नाही, अशी काळजी घ्यावी.
कागदी पिशव्या आणि तीव्र डिटर्जेंट याचा वापर व साका :
गेली दोन वर्ष संशोधन केंद्रावर फळे डागी होऊ नयेत, निर्यातक्षम व्हावी यासाठी वेगवेगळ्या कागदी पिशव्या (बटर पेपर, कोबयशी बॅग ) लावण्यात आल्या. यामध्ये फळे डागी होत नाहीत. शिवाय फळांमध्ये साक्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले. फळावरील डाग घालवण्यासाठी ०.०५ % ब्लिचिंग पावडरचे द्रावण वापरले जाते या सर्व बाबींचा विचार करता साका होण्यास फक्त अन्न्द्रव्ये कारणीभूत नसून वरीलप्रमाणे अनेक घटक कारणीभूत आहेत. म्हणून सर्व सबंधित बाबींचा एकत्मित विचार करून साका निवारण्याबाबत केंद्रावर प्रयोग सुरु असून निष्कर्ष आशादायक दिसून येत आहेत.
स्टीकरचा वापर व साका :
अलीकडे देवगड भागातील एका अनुभवी आंबा बागायतदाराकडून काही नमुने आले. त्यामध्ये काही फळांच्या टोकावर डाग पडून असे भाग मऊ होत असल्याचे आढळले. शेतकरी अनेक रसायने एकत्र करून मिसळून फवारताना दिसतात.
सध्या खतांच्या तसेच कीटक नाशकांच्या किमती फार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आंबा बागायतीचा खर्च खूप वाढला आहे. अशा परिस्थतीत अनावश्यक मायक्रोन्युट्रीयंट वापराचा प्रसार केल्यास पदरात काहीच पडत नाही. मात्र उत्पादन खर्च भरमसाठ वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे विभागातील समस्यांचा विचार करता वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामध्ये झालेल्या संशोधनाचा आधार घेऊन बागायतदार शेतकऱ्यांनी बागेचे एकात्मिक व्यवस्थापन करावे व आवश्यकता भासल्यास येथील शास्त्रज्ञांनी चर्चा करून उत्पादन वाढ करून साक्यावर नियंत्रण ठेवावे.
https://krushisamrat.com/mango-bloom-an-important-advice/
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.