- पैठण मेगा फूड पार्कचे धनगावात उद्घाटन
- कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधकांचा सन्मान
- शेतकरी मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन
औरंगाबाद, दिनांक १५- महाराष्ट्रासाठी जवळपास दोन हजार पाचशे कोटींच्या एकूण १०९ अन्न प्रक्रिया उद्योग प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यातून दहा हजार कोटींची गुंतवणूक व रोजगार निर्मिती होईल, असे मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज मांडले. तसेच या क्षेत्रात देशात महाराष्ट्रच अव्वलस्थानी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील धनगाव येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेंतर्गत निर्मित पैठण मेगा फूड पार्कच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती कौर बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संदीपान भुमरे, महापौर नंदकुमार घोडेले, केंद्रीय उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ.राकेश सरवाल, नाथ उद्योग समुहाचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल, कार्यकारी संचालक सतीश कागलीवाल, संचालक आकाश कागलीवाल आदींची उपस्थिती होती.
श्रीमती कौर म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रही झपाट्याने प्रगती करत आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून पैठण मेगा फूड पार्क उभारला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन. महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग वाढतो आहे. महाराष्ट्रात केंद्र शासनाने सातारा, औरंगाबाद आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर ५३ शीतगृहे, १८ अन्न तपासणी प्रयोगशाळा, आठ मिनी फूड पार्क, ११ बकवर्ड फॉरवर्ड लिंकेज आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे, असेही कौर म्हणाल्या. प्रधानमंत्री किसान संपदा, मिनी फूड पार्क, बँकेशिवाय निधी, या योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.
श्री. देसाई म्हणाले, संत एकनाथ, पैठणीमुळे पैठणचे नावलौकिक आहे. परंतु या पार्कमुळे पैठणची नवीन ओळख निर्माण होईल. महाराष्ट्र शासनाकडून उद्योग क्षेत्राला चालना देण्यात येत आहे. मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.म्हणून लवकरच मराठवाड्यात वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येईल. तसेच डीआयएमसीतील सरंक्षण साधने उत्पादन क्षेत्र, मिनी फूड पार्क मधील गुंतवणुकीतून मराठवाड्याचा विकास साधणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले.
खासदार खैरे यांनी फूड पार्कच्या उपयोगाबाबत माहिती दिली. केंद्रीय सरकारच्या सहकार्यातून सातारा आणि धनगाव येथे मेगा फूड पार्क सुरू झाल्याने मोठ्याप्रमाणात शेतकरी हित जोपासले जाणार असल्याचे खासदार दानवे म्हणाले. आमदार भुमरे यांनी पार्कमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे सूचविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर कागलीवाल यांनी केले. संतांची महती सांगत त्यांनी मराठवाडा आणि पंजाबचा जवळचा संबंध असल्याचे यावेळी सांगितले.
सुरवातीला श्रीमती कौर, श्री. देसाई यांनी समुहाच्या प्रक्रिया उद्योगांची पाहणी केली. त्यांनतर पार्कच्या कोनशिलेचे अनावरण केले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ज्येष्ठ संशोधकांचा गौरव
भाजीपाला उत्पादनाची तंत्रशुद्ध माहिती असलेल्या शेतकरी मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचनही यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक यांचाही श्रीमती कौर, श्री. देसाई यांच्याहस्ते गौरव करणात आला.
पैठण मेगा फूड पार्कची वैशिष्ट्ये
- भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेअंतर्गत प्रकल्प.
- नाथ ग्रुप फूड पार्कचे मुख्य प्रवर्तक.
- 100 एकर क्षेत्रावर व्याप्ती.
- आतापर्यंत जवळपास 500 शेतकरी फूड पार्कशी प्रत्यक्षपणे जोडले गेले त्यांच्या माध्यमातून 500 एकरावर मका पिकाची तंत्रशुद्ध लागवड.
- फूड पार्कमध्ये अद्ययावत मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र.
- इसारवाडी, कन्नड आणि आळेफाटा येथे तीन प्राथमिक प्रक्रिया केंद्रे.
- फूड पार्कमध्ये टेस्टींग लॅब, फ्रोझन व कोल्ड स्टोअरेजेस, मॉडर्न वेअर हाऊस, सॉर्टींग व ग्रेडींग लाइन्स, टेट्रापॅक (UHT) दूध प्रक्रिया व दूग्ध पदार्थ तसेच IQF आदी सुविधा.
-हरसिमरत कौर
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!