मधुमक्षिका पालन- शेती उत्पादनवाढीचा नवा मार्ग

2

शेतीचा व्यवसाय आता पूर्वीसारखा निर्मितीक्षम राहिला नाही. सतत नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, शेतोपयोगी वस्तूंची महागाई, निरक्षरता इ. घटकांमुळे शेती करणे जिकीरीचे झाले आहे. आधी शेतजमीन शेतकऱ्यासाठी परोपकाराचा व श्रद्धेचा विषय होता पण कालांतराने स्पर्धेचे युग आले आणि शेतीचे रूपसुद्धा त्या ओघात व्यवसाय म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यातून नफा कमावता न आल्याने तरुणवर्गाने तर शेतीकडे पाठ फिरवली. अशा परिस्थितीत फक्त शेती करून उत्पन्न कमावता येत नाही तर त्याला आधुनिक शेतीची जोड देवून पूरक व्यवसाय केल्यास बदल घडू शकतो असे काही तरुण शेतकरी ओळखून आहेत. त्यामुळे ते आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. त्यांनी अनेक प्रयोग सुरु केले आहेत. त्यातलाच एक अभिनव प्रयोग म्हणजे मधुमक्षिकापालन होय. मधुमक्षिकापालनातून जळगावच्या एरंडोल तालुक्यातील राजू सोनवणे या युवकाने चांगले उत्पन्न कमवून दाखवून आदर्श घालून दिला आहे.

मधमाश्या केवळ मधासाठीच पाळतात हा विचार खोडून, मधमाश्यांचाच वापर परागीभवनाच्या माध्यमातून शेतीउत्पादन वाढवण्यासाठी करता येतो हे त्याने दाखवून दिले आहे. राजू सोनवणे या युवकाने रोजगारासाठी कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता स्वतःची जिद्द व मेहनतीच्या जोरावर गेल्या सहा वर्षांपासून व्यवसायात यश मिळवले आहे. स्वतःचे मधुमक्षिकापालन करण्यासाठी अथवा आपल्या शेतीसाठीच नव्हे तर एरंडोलच्या आजूबाजूच्या तालुक्यात मागणी वाढल्याने मधमाश्यांचे उत्पादन करायला त्यांनी सुरवात केली आहे. शेतीतील पालेभाज्या, फळे, कांदा, लसूण, कापूस, मोहरी इ.च्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आल्याने त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी मधमाश्या पेट्या विकण्याचा व्यवसायही सुरु केला आहे, ज्याद्वारे ते शेतीव्यवसाय व मधुमक्षिकापालन एकाच वेळेस सक्षमपणे हाताळू शकतील.

महाराष्ट्रात सर्वप्रथम लातूर येथील दिनकर पाटील व नंतर पुण्यातील सागर मावकर यांनी मधुमक्षिकापालनाचा व्यवसाय सुरु केला. या दोघांच्या मार्गदर्शनानेच राजू सोनवणे हे या व्यवसायात उतरले. या तरुणांच्या सल्ल्यानुसार राजू सोनवणे यांनी पुण्याच्या महिला खादी ग्रामोद्योग मंडळात प्रशिक्षण घेतले आहे. सुरवातीला स्वतःच्या शेतात वेलवर्गीय भाज्या, फळे, कांदा, लसूण या पिकांच्या बियाण्याच्या उत्पादनवाढीसाठी त्यांनी मधमाश्यांच्या वापर केला. मधमाश्यांमुळे उत्पादन दुपटीने वाढल्याचा त्यांना अनुभव आला. त्यातूनच जळगाव जिल्ह्यातील विविध फळबागांचे परागीभवन मधमाश्यांच्या मदतीने करण्याचे नवे काम श्री. सोनवणे यांनी सुरु केले. आता ते रावेर, सावदा, धरणगाव, पिंप्री, जवखेडा, चोपडा, बेटावद, बोदवड, भडगाव ते थेट गुजरातमधील आणंद त्यानंतर राजस्थान याठिकाणी देखील परागीभवनासाठी मधमाश्यांच्या पेट्या घेऊन जातात. मधमाश्यांच्या साहाय्याने विविध फळांच्या फुलांचे परागीभवन करतात. यासंबंधीची माहिती श्री. सोनवणे यांनी दिली. ते म्हणतात, “मधमाश्यांच्या साहाय्याने परागीभवन घडवून आणण्यासाठी मधमाश्यांच्या वसाहतीत प्रामुख्याने दोन माश्या आवश्यक असतात. राणी माशी व कामकरी माशी.

कामकरी माशीचे आणखी ४ उपप्रकार पडतात. ते म्हणजे दाई माशी, संरक्षक माशी, बांधकाम माशी व साफसफाई करणारी माशी. राणी माशीचे साधारण आयुष्य हे ३ वर्षे इतके असते. तर कामकरी माशीचे सरासरी आयुष्य ३ ते ६ महिने इतके असते. राणी माशी दिवसाला १५०० ते २००० अंडी घालते. कामकरी माश्या फुलांतील मकरंद गोळा करण्याचे काम करतात. या माश्यांची दर सात दिवसांनी तपासणी करावी लागते. त्यात परागकण व मकरंद पुरवठा योग्य प्रमाणात आहे की नाही हे पाहिले जाते.” आजच्या घडीला राजू सोनवणे यांच्याकडे मधमाश्यांच्या २०० पेट्या आहेत. त्यात प्रत्येकी १००० ते २५०० कामकरी माश्यांसह सुमारे ३०००० ते ४०००० इटालियन मेलाफेरा जातीच्या माश्या आहेत. एक एकर डाळिंब फुलोऱ्यात आले की १५ ते २० दिवस परागीभवन करण्यासाठी मधमाश्यांच्या ५ पेट्या तिथे ठेवल्या जातात. त्यासाठी ५००० ते ६००० रुपये शुल्क आकारले जाते. श्री. सोनवणे यांना या व्यवसायातून ९ ते १३ लाख रुपये इतके वार्षिक उत्पन्न मिळते.

गेल्यावर्षी धुळे जिल्ह्यातील ५०० एकर क्षेत्रातील डाळिंब फुलोऱ्यात असतांना बागांमध्ये पाळीव मधमाश्यांच्या साहाय्याने परागीकरण करण्यात आले. त्यामुळे फलधारणेचे प्रमाण खूपच वाढले. फळांचा रंगदेखील चमकदार झाल्याचा अनुभव आला. मधउत्पादनासाठी पाळलेल्या माश्या आता पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठीही मदत करू लागल्या आहेत. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरनंतर हिरव्या चिमण्यांचे आगमन होते. या चिमण्यांचा मधमाश्यांना धोका असतो. त्यामुळे श्री. सोनवणे हे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत मधमाश्या घेवून गुजरातमध्ये जातात. तेथे सूर्यफुलाचे मकरंद घेवून मधमाश्या मधनिर्मिती करतात. १५ डिसेंबरनंतर ते राजस्थानमधील मोहरी उत्पादन होणाऱ्या भागात जातात. मधमाश्यांच्या एका पेटीतून १५ ते २० दिवसांत ५ ते ७ किलो मध मिळतो. मध काढण्यासाठी मधयंत्र असून मधमाश्यांच्या पेटीतील प्लेटचे कॅपिंग करून ती प्लेट मधयंत्रात बसवून ते यंत्र हाताने फिरवले जाते. त्याद्वारे प्लेटमधील मध काढण्यास मदत होते. हे मध पूर्णपणे नैसर्गिक असून त्यात कुठलेही कृत्रिम घटक वापरलेले नसतात. या मधाला २०० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. मधापासून विविध खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या हा मध जागेवरच खरेदी करत असल्याने श्री. सोनवणे यांना विक्रीसाठी अतिरिक्त श्रम करावे लागत नाहीत. या मधमाश्यांमुळे मधनिर्मिती व फळबागांचे परागीभवन असा दुहेरी फायदा होतो. अशाप्रकारे मधमाश्यांचा वापर शेतीसाठी केल्यास पीक उत्पादनात ३०% ते ४०% वाढ करता येते हे राजू सोनवणे यांनी दाखवून दिले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अनेक वेळा त्यांच्या या उपक्रमाला भेट देवून माहिती घेतली आहे.

 

मधुमक्षिका पालन व्यवसाय कसा सुरु करावा?

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. Anonymous says

    5

  2. Anonymous says

    4.5

Leave A Reply

Your email address will not be published.