हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार

0

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई / प्रतिनिधी
राज्यात कोल्हापूरसह अन्य ज्याज्या ठिकाणी हत्तींच्या उपद्रवामुळे पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होत आहे. अशा ठिकाणी कर्नाटक राज्याच्या सहकार्यातून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील. सात ते आठ ठिकाणी हत्तींना पळवून लावण्यासाठी प्रशिक्षित हत्तींचा गट तयार करून या भागात तो ठेवण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मंत्रालयात मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यासंबंधिच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी साप्रवि. राज्यमंत्री मदन येरावार, आ. प्रकाश आबिटकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हत्तींचा उपद्रव असलेल्या भागातील उपाययोजना निश्‍चित करण्यासाठी नियुक्त समितीने आपला अहवाल दिला असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, या अहवालातील शिफारशींवर शासन स्तरावर काम सुरु आहे. कर्नाटक राज्याकडून वन विभागाच्या कर्मचार्‍यांना यासंबंधीचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. हस्ती गस्ती शिबिराचे आयोजनही केले जाणार आहे. हत्तींचा उपद्रव असलेल्या भागात गस्तीपथक नियुक्त करण्यात येणार असून त्यांना साधाणत: एक महिन्यात वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. याशिवाय जिथे शक्य आहे आणि उपयुक्त ठरू शकेल अशा ठिकाणी सौर कुंपण, हत्ती प्रतिबंधक चर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हत्ती जो चारा किंवा खाद्य खातात त्याची लागवड त्यांचा वावर असलेल्या भागात केल्यास ते इतरत्र जाणार नाहीत हे लक्षात घेऊन केळी, बांबू, ऊस यासह इतर चारा तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथील लोकांमध्येही व्यापक प्रमाणात जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मधमाशांच्या पेट्या असतात तिथे हत्ती येत नाहीत, असा एक अनुभव सांगतो त्याप्रमाणे ही उपाययोजनाही करून पहावी, यासंबंधीचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवावा, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या. महाराष्ट्रात कर्नाटकातून आलेले साधारणत: 7 हत्ती आहेत, कोल्हापूर, गगनबावडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.