कर्जमाफीत 48 हजारांपैकी 2637 शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज

0

जिल्हा बँकेने दाखवले 38 हजार जणांच्या कर्जांचे वाटप
उस्मानाबाद / प्रतिनिधी
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या राष्ट्रीयीकृत बँकांतील 48 हजार शेतकर्‍यांपैकी केवळ 2637 शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज दिल्याची नोंद सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जमाफीची प्रक्रिया करण्यास व नवीन कर्ज वाटपाला विलंब होत असल्यामुळे त्यांच्याकडून जिल्हा उपनिबंधकांकडे माहितीही दिली नाही. जिल्हा बँकेने 37 हजार 907 शेतकर्‍यांना कर्ज वाटप केल्याचे दाखवले आहे. यामुळे जिल्ह्याचा आकडा फुगून 40 हजार 744 वर गेला आहे.

शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केल्यापासून याच्या अंमलबजावणी होऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळण्यासाठी अनेक अडथळे सुरू आहेत. यामुळे शेतकर्‍यांना म्हणावे तसे समाधान कर्जमाफीमुळे मिळालेले नाही. अनेक अडचणी, क्लिष्ट प्रक्रिया, राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्रक्रियेला होणारा विलंब यामुळे कर्जमाफीच जाचक वाटत असल्याचे वातावरण जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादमध्ये आल्यानंतर आता व पूर्वीही कर्जमाफी झाल्यावर लगेच नवीन कर्ज वितरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला छेद देण्याचे काम बँकांकडून होत आहे.
जिल्हा बँकेने 13 व्या तर राष्ट्रीयीकृत बँकांनी नवव्या ग्रीनलिस्टपर्यंत कर्जमाफी दिली आहे. यामध्ये 99 हजार 20 शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याची नोंद आहे. यामध्ये सुमारे 48 हजार शेतकरी जिल्हा बँक वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँकांचे आहेत. यातील केवळ 2637 शेतकर्‍यांना नवीन कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही आकडेवारीही नवव्या ग्रीनलिस्टपर्यंतची आहे. यानंतर आलेल्या 13 ग्रीनलिस्टपर्यंतची राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वितरणाची प्रक्रियाच केलेली नाही. यामुळे याची माहितीही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात आलेली नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 37 हजार 907 शेतकर्‍यांना कर्ज वितरण झाल्याचे दाखवले आहे.

मात्र, यामध्ये प्रोत्साहनपर लाभ 37 हजार 798 शेतकर्‍यांना देण्यात आलेला आहे. जिल्हा बँकेने केवळ आकडेवारीचा मेळ घालून कर्ज वितरणाचा आकडा फुगवला आहे. जिल्हा बँकेची परिस्थिती सध्याही बिकट आहे. यामुळे बॅक प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हातात मोठ्या कर्जाची रक्कम देऊ शकत नाही. यामुळे खर्‍या अर्थाने राष्ट्रीयीकृत बँकांच कर्ज वितरण करत आहेत. त्यांच्याकडून केवळ 2637 लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.

वितरण वाढवण्याची गरज
सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीतीत कृषी कर्ज, पीक विमा वितरण, अनुदान हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये कृषी कर्जावर अधिक भिस्त आहे. यामुळे तातडीने वितरणाचा जोर वाढवून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा उस्मानाबादची पुन्हा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचा जिल्हा म्हणून ओळख कायम राहण्याचा धोका आहे.

केवळ 27 कोटींचे वितरण
राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ 27 कोटी रुपयांचे नवीन कर्ज वितरित केल्याची नोंद आहे. एकूण कर्ज वितरण 152 कोटी रुपये आहे. त्यामध्ये एकट्या जिल्हा बँकेने 125 कोटी कर्ज वितरित केले असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्याचा कर्ज वितरणातील आकडा वाढला असल्याचे नमूद आहे.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.