लिलीची लागवड : भाग – १
लिली हे एक महत्त्वाचे कंदवर्गीय फुलझाड आहे. हार, गुच्छ, तोरणे आणि मंडप सजावटीकरिता लिलीच्या फुलांना वर्षभर सतत मागणी असते. लिलीच्या विविध जाती आणि प्रकार असून त्यांचा उपयोग फुलांच्या वैशिष्ट्यानुसार हार, गुच्छ अथवा उद्यानाची शोभा वाढविण्याकरिता ताटवे लावून करतात. लिलीची फुले उत्तम प्रकारची कटफ्लॉवर्स म्हणून वापरली जातात. म्हणून च लिलीच्या लागवडीस भरपूर वाव असून पद्धतशीर लागवड केल्यास या पिकापासून भरपूर उत्पन्न मिळविता येते.
महत्त्व :
लिली हे अत्यंत सुंदर आणि डौलदार फुलझाड असून या फुलझाडाची लागवड उद्यानातील ताटव्यांमध्ये, इमारतीसमोरील प्रांगणात आणि लहान मोठ्या कुंड्यात केली जाते. लिलीच्या फुलांना फुलदाणीत ठेवण्याकरिता, हारतुरे तयार करण्यासाठी आणि तोरणे आणि मंडप सजावटीकरिता वर्षभर मागणी असते. विशेषत: सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत लिलीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो. म्हणून शहराजवळच्या परिसरात लिलीची लागवड फायदेशीर ठरत आहे. चीनसारख्या देशात लिलीच्या काही प्रकारांचे कंद खाण्यासाठी वापरतात. लिलीच्या फुलांना मोठ्या शहरांतून असलेल्या मागणीचा विचार करता या फुलझाडाखालील क्षेत्र वाढविण्यास चांगलाच वाव आहे.
क्षेत्र आणि उत्पादन :
भारतामध्ये निलगिरी पर्वताच्या परिसरात लिलीचे उगमस्थान आहे. भारतामध्ये लिलीची लागवड प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. बायबलमध्येही लिलीचा उल्लेख आढळतो. भारतामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश हिमाचल प्रदेश, पंजाब, काश्मिर, महाराष्ट्र इत्यादी राज्यांत लिलीची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि पुणे या दोन जिल्ह्यांत लिलीची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.
हवामान आणि जमीन:
लिलीचे असंख्य प्रकार असून काही प्रकार कमी सूर्यप्रकाशात चांगले येतात तर काही प्रकार उष्ण-दमट हवामानात चांगले येतात. सरासरी १५ ते ३५ डी. सें. तापमानात लिलीच्या पिकाची चांगली वाढ होऊन भरपूर उत्पादन मिळते. दिर्ध काळ अतिकडक थंडी या पिकाला अपायकारक ठरते.
लिलीच्या लागवडीसाठी सुपीक, काळी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७ इतका असावा. जमिनीत पाणी साचून राहत असल्यास कंदांची कूज होऊन पिकाचे नुकसान होते.
जाती :
लिलीचे असंख्य प्रकार आणि जाती उपलब्ध आहेत. लिलीचे ३०० ते ४०० प्रकार असून त्यापैकी सुमारे १०० प्रकार व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. लिलीचे अॅमरॅलिस (बेलाडोन लिली) आणि हिपॅस्ट्रम (ट्रंटेप लिली) हे दोन प्रकार खूपच प्रचलित आहेत. अमर लिली, स्पाईडर लिली, फायरबॉल लिली, क्रुपरँथम लिली, झिपरँथस लिली, डे लिली, फॉक्स टेल लिली, टायगर लिली, वॉटर लिली, प्लँटेन लिली हे प्रकार महाराष्ट्रात जास्त पसिद्ध आहेत. लिलीमध्ये संकरित जातींचीही सतत भर पडत आहे. ऑरेलियन हायब्रीड, बेलिंगम हायब्रीड, फिस्टा हायब्रीड, गोल्डन चॅलेस हायब्रीड, गोल्डन हारवेस्ट हायब्रीड , ग्रीन माउंटन हायब्रीड , ऑलिंपीक हायब्रीड, पेटेड लेडी हायब्रीड, शेलरोझ हायब्रीड आणि टेंपल हायब्रीड हे प्रमुख संकरित वाण प्रसिद्ध आहेत. लिलीच्या काही प्रचलित जाती आणि त्यांच्या फुलांचे रंग खाली दिले आहेत.
अ.क्र. | जात | फुलांचे रंग |
१) | ब्लंक ड्रॅगान | फुले तुतारीच्या आकाराची, मध्यावर सोनेरी तर पाकळ्या आतील बाजूस सफेद आणि बाहेरील बाजूस गडद लालसर. |
२) | अॅप्रीकॉटग्लो | नारिंगी रंगाची फुले |
३) | ब्रँडीवाईन | पिवळसर नारिंगी रंगाची फुले |
४) | ब्रोकेड | फिक्कट पिवळ्या रंगाची फुले |
५) | डेस्टिनी | लिंबासारख्या पिवळ्या रंगाची फुले |
६) | हेलन कॅरॉल | पिवळ्या रंगाची फुले |
७) | लाईमलाईट | तुतारीच्या आकाराची पिवळी फुले |
८) | सनसेट ग्लो | गुलाबी आणि मध्यभागी पिवळ्या रंगाची फुले |
९) | रॉयल गोल्ड | पिवळ्या धमक रंगाची व मध्यावर लालसर रंगाची फुले |
पुढील माहिती आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
[…] लिलीची लागवड : भाग – १ […]