सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण आहे. आधी आपले जीवन, आरोग्य सर्वांत महत्वाचे आहे मग इतर सर्वकाही! कारण मृत्यू ही नैसर्गिक गोष्ट आहे पण तो केव्हा येईल याची शाश्वती नसते. आपल्या घरातल्या माणसांची आपल्याला नेहमीच काळजी असते पण मृत्यू अटळ असल्याने त्यावर आपले नियंत्रण नाही. केव्हा काय होईल हे आपल्या हातात नसते. माणूस गेल्यावर घराची, संस्थेची जी हानी होते, त्याची भर पैसा काढून देऊ शकत नाही पण त्याची भीषणता कमी करण्याचं काम आर्थिक पाठबळ करू शकते. या सामाजिक गरजेतून विमा पॉलिसीचा जन्म झाला. म्हणून आजच्या धावपळीच्या युगात दोन प्रकारचे विमा तयार झाले. एक म्हणजे आयुर्विमा (life insurance) आणि दुसरा, स्वास्थ्यविमा (health insurance).
आयुर्विमा काढणे ही आजच्या समाजात अगदीच सामान्य बाब आहे. त्याबद्दल बरीच जागरूकता आहे. कुटुंबातली कमावती व्यक्ती इतर सदस्यांच्या भविष्याचा विचार करून आयुर्विमा काढते. पण त्यासोबतच स्वास्थ्यविमाही अत्यावश्यक झालाय. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माणसाचे जीवनमान आरामदायी झाले परंतु चंगळवादी जीवनशैलीचा परिणाम म्हणून आरोग्याचे संतुलन ढासळू लागले. एकूणच वाढत्या महागाईमुळे औषधोपचार व डॉक्टरांची फी इत्यादी आरोग्य सुविधाही महाग झाल्या. यातूनच स्वास्थ्यविम्याची गरज पुढे आली. परंतु त्यासाठी अनेक गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे.
बऱ्याच कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्वास्थ्यविमा काढला जातो. यातील हफ्त्यांचा काही हिस्सा कंपनी स्वतः खर्च करते आणि उरलेला खर्च कर्मचाऱ्यांच्या खात्यातून जातो. त्यामुळे काही कर्मचारी याशिवाय इतर विमा काढत नाहीत. कुटुंबातील सदस्यांसाठी आयुर्विमा काढत नाहीत. पण कंपनीने दिलेला विमा हा फक्त कर्मचाऱ्यापुरता मर्यादित असतो. त्यामुळे दोघं बाबतीत गल्लत टाळली पाहिजे. तसेच आपण कोणत्या भागाचे रहिवासी आहोत, आपली जीवनशैली कशी आहे व आपण कोणत्या प्रकारच्या शहरात राहतो या सर्व बाबींचा विचार करणेही आवश्यक आहे.
आपला विमा काढणाऱ्या प्रत्येक कंपन्यांचे आपापले नियम व अटी असतात. अर्ज करतांना आपल्याला स्वाक्षरी करण्यापूर्वी त्या वाचायला सांगितले जाते. पण वेळेअभावी अथवा घाई केल्याने आपण ते नियम व अटी वाचण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातले बारकावे आपल्याला लक्षात असावे लागतात. पण त्यामुळे विम्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत व कोणत्या गोष्टी वगळल्या आहेत याची आपल्यास जाणीव राहत नाही. नंतर क्लेम करतांना आपल्याला अडचणी येऊ शकतात. कारण स्वाक्षरी केली की आपण त्यांच्या नियमांशी सहमत आहोत असा अर्थ घेतला जातो. आणि मग आपली गैरसोय होते.
विम्याचा महिन्याकाठी भरणा जास्त असावा. जास्त हफ्ता हा जास्त लाभ मिळवून देऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवे. हा कोणताही खर्च नसून आपण सदस्यांच्या अनिश्चित भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून भक्कम तरतूद करून ठेवत आहोत असा विचार केल्यास हप्ता जास्त की कमी हा गोंधळ कमी होऊ शकेल. विमा कंपनीला आपण जी माहिती पुरवत आहोत त्याची आपणास खात्री असायला हवी. कौटुंबिक माहिती, व्यवसाय व सदस्यांचे आजार असा महत्वपूर्ण तपशील सत्य असायला हवा. आपला अर्ज रद्द होऊ शकतो या भीतीपोटी अवास्तव व खोटी माहिती देऊ नये अथवा लपवून ठेवू नये. या सर्व गोष्टींचे व्यवस्थित पालन केल्यास भविष्यात विमा परतावा मिळण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.