साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

0

शेतकर्‍यांची कारवाईची मागणी
प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकार्‍यांकडून पाहणी
माजलगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याच्या बॉयलरच्या चिमणीतून निघणार्‍या राख, भुसा, आणि दुषीत पाण्यामुळे शेतातील ऊस, कापूस, गहू, हरभरा, हळद या पिकांचे मोठे नुकसान होत असून याची सूचना कारखाना प्रशासनाला वारंवार देऊनही कारखाना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे. माजलगाव शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह परिसरातील शेतकर्‍यांनी कारखान्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
याबाबत कारखाण्यामुळे होणारे प्रदूषण थांबवावे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यां समक्ष परिसरातील पिकांची पाहणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, औरंगाबाद यांच्याकडे दि. 10 जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार उपप्रादेशिक क्षेत्र अधिकारी एस. डी. दहिफळे, महेश चलवा यांनी शुक्रवार दि.18 जानेवारी रोजी कारखाना परिसराची पाहणी केली.
केली. या संयुक्त पाहणीत, जय महेश साखर कारखान्याच्या बाहेरील दोन किमी. परिसरात कारखान्याच्या चिमणीतून निघणार्‍या धुळीचे कण शेतकर्‍यांच्या पिकावर आढळून आले आहेत. कारखान्यालगत असणार्‍या कंपाऊंट वॉलमधून दुषीत पाण्याचा प्रवाह आढळून आला. ते पाणी कारखान्यालगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या चारीत जात आहे. त्या पाण्याचे नमूने अडीच लिटरच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. तसेच सर्जेराव ढिसले यांच्या मालकीच्या पवारवाडी शिवारातील गट सर्व्हे नंबर 179 मधील विहिरीत कारखान्याचे प्रदुषित पाणी येत असल्याचे आढळून आल्याचे नमूद केले आहे.
त्याचबरोबर विहीरीच्या दुषीत पाण्याचे नमूने, भाऊराव ढिसले यांच्या बोअरच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले व त्यांच्या उभा असलेल्या ऊसाची पाहणी केली असता ऊस पिकावर कारखान्याच्या चिमणी तून निघणारे धुळीचे कण आढळून आले आहेत. कारखाना गेटजवळ पाहणी केली असता कारखाना ग्राउंडमधील बॅगज हे रस्त्यावर, इतर परिसरात पडत असल्याचे निदर्शनास आले. या कारखान्याच्या बॉयलरच्या चिमणीतून निघणार्‍या राखेमुळे तसेच भुस्यामुळे परिसरात राहणार्‍या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाहणीच्या वेळी मुंजाबा जाधव, संदीप ढिसले, विठ्ठल जाधव, भाऊराव ढिसले, ग्यानबा दिवटे यांच्यासह परिसरातील नागरीक, शेतकरी उपस्थित होते.

सदरील पाहणी अहवाल व दुषीत पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रदुषण नियंत्रण मंडळ वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी औरंगाबाद यांना पाठवणार आहोत. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारखाना प्रशासनावर योग्य कारवाई करण्यात येईल.

 

-एस. डी. दहिफळे,
प्रदुषण नियंत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी,
जालना.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.